Breaking News

पेणमध्ये उपसरपंचपदासाठी मोर्चेबांधणी

 

आज निवडप्रक्रिया

पेण: प्रतिनिधी
पेण तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीपैकी एक ग्रामपंचायत बिनविरोध झाली. तालुक्यात 25 ग्रामपंचायतींच्या निवडणुका चुरशीत पार पडल्या. आता तालुक्याच्या ग्रामीण भागातील राजकीय वर्तुळाचे लक्ष उपसरपंच निवडीकडे लागले आहे. या पदासाठी इच्छुक सदस्यांनी फिल्डींग लावली असली तरी निर्णायक स्थितीत सरपंचाच्या विशेष अधिकाराला महत्व असणार आहे. तालुक्यातील उपसरपंचाची निवड प्रक्रिया येत्या 2 जानेवारीला पार पाडण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे इच्छुकांची मोर्चेबांधणी जोरात सुरु आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सरपंचाची निवड थेट जनतेमधून झाली आहे. यामुळे उपसरपंचदासाठी निवडीची प्रक्रिया ग्रामपंचायतीमध्ये पार पाडावी लागणार आहे. यासाठी पहिली सभा ग्रामपंचायतीमध्ये घेतली जाणार आहे. त्यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून राजपत्रित अधिकारी असणार आहे. पहिल्या सभेला अध्यक्ष म्हणून सरपंच असणार आहे. विशेष म्हणजे उपसरपंचपदाची निवड करताना सदस्य म्हणून पहिल्या फेरीत मतदान करण्याचा अधिकार सरपंचांना असणार आहे.
मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर दोन्ही गटात उपसरपंचाला सारखी मते मिळाली तर या प्रकरणात निर्णायक मतदानाचा अधिकार देखील सरपंचांना देण्यात आलेला आहे. यामुळे निर्णायक परिस्थिती निर्माण झाल्यास सरपंचांना दुसर्‍यांदा मतदान करता येणार आहे. यातून गावपातळीवरचा तिढा सुटणार आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून पुन्हा शहानिशादेखील करण्यात आली आहे. त्यानुसार उपसरपंच पदाच्या निवडीच्या प्रक्रियेसाठी सूचना प्रसिद्ध केल्या जाणार आहे.
निवडणूक आटोपल्यानंतर 15 दिवसांच्या आत उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पूर्ण करायची असते. यासंदर्भात जिल्हाधिकारी निर्णय घेतात. त्यानुसार 26 ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पाडणार आहे.
ग्रामपंचायतीमध्ये निवडून आल्यानंतर पहिली सभा ज्या दिवशी होते, त्याच दिवसापासून ग्रामपंचायतीचा कार्यकाळ निश्चित ठरविला जातो. त्यानुसार पाच वर्षाचा कार्यकाळ निश्चित होतो. यामुळे पहिल्या सभेच्या बैठकीला विशेष महत्त्व आहे. तेव्हापासूनच ग्रामपंचायतीचा नवीन कारभार सुरु होणार आहे. सरपंचाना विशेष मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. निर्णायक परिस्थितीत हा अधिकार सरपंचांना वापरता येणार आहे. उपसरपंच पद निवडीची प्रक्रिया 2 जानेवारी रोजी तालुक्यात पूर्ण होणार आहे. त्यासाठी तालुका पातळीवर तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गावनिहाय अधिकार्‍यांची नेमणूक केली आहे, अशी माहिती नायब तहसिलदार प्रसाद कालेकर यांनी दिली.

Check Also

आमदार महेश बालदी यांचा विविध वाड्यांमध्ये प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा प्रचार सभा प्रमुख प्रवीण काळबागे, माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत …

Leave a Reply