सध्याच्या काळात राजकीय वर्तुळातून इतक्या उलटसुलट चर्चा घडताना दिसत आहेत की त्यातली बातमी कुठली आणि वावडी कुठली हे ओळखता येणे कठीण व्हावे. ज्यांच्या मतांसाठी एवढ्या राजकीय घडामोडी घडत असतात त्या मतदारांना कसलाही थांगपत्ता लागत नाही. सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण ढवळून निघाले असून त्यातून वावड्यांचा कचराच अधिक बाहेर येऊ लागला आहे. महाराष्ट्रात लवकरच दोन राजकीय विस्फोट होणार असे भाकित केले जात असून विविध पक्षांच्या नेत्यांची वक्तव्ये त्याला खतपाणी घालत आहेत.
येत्या पंधरा दिवसांत दोन राजकीय स्फोट होणार असून एक दिल्लीत होईल आणि दुसरा मुंबईत, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्यानंतर माध्यमांमधून चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच ‘मातोश्री’वरून उठून थेट ‘सिल्व्हर ओक’ गाठले आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्याशी सव्वा तास चर्चा केली. अर्थात त्यांची ही भेटदेखील बंद दाराआड झाल्यामुळे नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकलेले नाही. तथापि, राष्ट्रवादी काँग्रेसचे धोरण भारतीय जनता पक्षाच्या सोबत जाण्याचे नाही, परंतु तपासयंत्रणांच्या दबावाखाली कुणी व्यक्तिगत निर्णय घेतला तर तो त्यांचा प्रश्न आहे असे पवार यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितल्याचे बाहेर फुटले. ही बातमी फोडणारे ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत हेच होते. आपल्या पक्षाच्या मुखपत्रात त्यांनी हा गौप्यस्फोट केला. तेव्हापासून वातावरण तापू लागले आहे. माजी अर्थमंत्री अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे क्रमांक दोनचे ज्येष्ठ नेते समजले जातात. धडाडीची कार्यक्षमता, निर्णयक्षमता आणि स्पष्टवक्तेपणासाठी त्यांचा लौकिक आहे. साडेतीन वर्षांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी करून अजित पवार यांनी 72 तासांचे अल्पायुषी सरकार स्थापन करण्याचा प्रयोग करून पाहिला होता. सध्या हेच अजित पवार 40 आमदारांच्या पाठबळासह भाजपसोबत सरकार स्थापन करतील अशी चर्चा आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिंदे गटाच्या विरोधात गेल्यास फडणवीस-पवार असे नवे सरकार अस्तित्वात येईल अशा प्रकारच्या वावड्या रोजच्या रोज उठत आहेत. खरे सांगायचे तर ‘ना शेंडा ना बुडखा’ असलेल्या या बिनबुडाच्या अफवाच आहेत असे वाटते. कारण असे काही घडण्यासाठी जे राजकीय वातवरण असावे लागते तेच या घटकेला अस्तित्वात नाही. सरकार बदलण्याची शक्यता केव्हा निर्माण होते? वर्तमानातील सरकार अस्थिर असेल तरच असे बदल संभवू शकतात. शिंदे-फडणवीस सरकार हे अतिशय स्थिर सरकार असून गतिमान कारभार करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही एकदिलाने लोकहिताचे निर्णय घेताना दिसतात. जनतेच्या मनातील सरकार हेच आहे असे असताना चांगले चालणारे सरकार अस्थिर का करावे हा खरा प्रश्न आहे. राजकीय वावड्या वाटेल तेवढ्या उठतात, त्याला किंमत किती द्यायची, हे ज्याचे त्याने ठरवावे. विरोधीपक्ष नेते अजित पवार यांना लक्ष्य करण्याचे कारस्थान कुणी करत आहे का याचा शोध घ्यायला हवा आहे. त्यातूनही महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात स्फोट झालाच तर तो महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचाच असेल याची खात्री बाळगावी. कारण शिंदे-फडणवीस सरकार लोकहिताशी तडजोड करणारे नाही.
RamPrahar – The Panvel Daily Paper