अलिबाग ः प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या अमृत सरोवर अभियान अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 153 तलावांमधील गाळ काढणे, सुशोभीकरण करणे, बळकटीकरण किंवा पुनर्जीवन अशी कामे पूर्ण करण्यात आली आहेत, तर 25 तलावांचे संवर्धन करण्याची कामे प्रगतिपथावर आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.
सरोवर संवर्धन अभियान अंतर्गत एक एकर क्षेत्राचे नवीन तलाव निर्मिती करणे तसेच एक एकर क्षेत्रात अस्तित्त्वात असणार्या तलावातील गाळ काढणे, सुशोभीकरण करणे, बळकटीकरण किंवा पुनर्जीवन करणे यासह तलाव परिसरात वृक्ष लागवड, शौचालय व्यवस्था ही कामे करण्यात आली आहेत.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुका स्तरावरून अस्तित्वात असणार्या 178 तलावांची अमृत सरोवर पोर्टलवर नोंद करण्यात आली असून ग्रामस्थांच्या सहभागातून ग्रामपंचायत 15व्या वित्त आयोग माध्यमातून आणि शासनाच्या विविध योजना तसेच कंपन्यांच्या विकासनिधीतून तलावांची कामे हाती घेण्यात आली होती. यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, महिला बचत गट, नागरिक यांनी तलाव संवर्धन अभियानात आपला सक्रिय सहभाग नोंदवला होता. या सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्यातील 153 तलावांचे संवर्धन करण्यात जिल्हा परिषद प्रशासनाला यश मिळाले असून उर्वरित 25 तलावांचे संवर्धन करण्याचे काम प्रगतिपथावर आहे.
अमृत सरोवर अभियानांतर्गत अलिबाग तालुक्यातील 11 तलावांचे संवर्धन करण्यात आले, तर कर्जत 10, खालापूर 20, महाड 11, माणगाव 14, म्हसळा 7, मुरुड 9, पनवेल 13, पेण 8, पोलादपूर 10, रोहा 13, श्रीवर्धन 5, सुधागड 10, तळा 2, उरण 10 तलावांचे संवर्धन करण्यात आले आहे.
Check Also
महात्मा फुले महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ
मान्यवरांची लाभली उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान …
RamPrahar – The Panvel Daily Paper