नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
अमेरिकन नागरिकांना फसवणारे बोगस अॅमेझॉन कॉल सेंटर नवी मुंबईतून उद्ध्वस्त करण्यात आले आहे. आरोपींकडून 10 लॅपटॉप, दोन राऊटर, आठ मोबाइल फोन, चार हेडफोन जप्त करण्यात आले.रबाळे पोलिसांना शिवशंकर हाईट, से. 20 ऐरोली येथील इमारतीचे फ्लॅटमध्ये अवैधरित्या कॉल सेंटर सुरू असून, त्याद्वारे अमेरिकन नागरिकांची फसवणुक केली जात आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्यानुसार रबाळे पोलिसांनी सायबर एक्सपर्टसह 18 नोव्हेंबर रोजी रात्री छापा टाकला. इमारतीमधील रूम नं. 2901मध्ये एकूण सात व्यक्ती हे 10 लॅपटॉपच्या वापर करून व्हीओआयपीच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांना त्यांचे अॅमेझॉन अकाउंट हॅक झाल्याचे सांगून त्यांना अँटिव्हायरस अथवा सेक्युरिटी सर्व्हिस घेण्यासाठी भाग पाडत असे. त्याकरिता गिफ्ट कार्डद्वारे पैसे स्विकारून ती रक्कम ते प्राप्त करीत असल्याचे दिसुन आले. त्यामुळे आरोपी मेहताब आयुब सय्यद (वय 27,रा.मालाड), हुनेद शब्बीद कोठारी (वय 35, रा.ग्रॅन्ड रोड), सुरज मोहन सिंग (वय 25, रा. कांदिवली), धर्मेश राकेश सालीयन (वय 32, रा. भाईंदर), नौशाद रजी अहमद शेखइ (वय 24, रा. मालाड), सौरभ सुरेश दुबे (वय 26, रा. मिरा-भाईंदर), आसिफ हमीद शेख (वय 23, रा. भाईंदर) या सर्वांना अटक करण्यात आली. आरोपींना 23 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.