Breaking News

राजेश खन्नाची फिल्मी मुहूर्तातील हौस मौज

हा रस्ता ’मजनून ’च्या मुहूर्ताकडे जातो… वांद्रे रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडे उतरताच समोर असं भलं मोठं होर्डींग्स लक्ष वेधून घेते आणि मेहबूब स्टुडिओत जाईपर्यंत अधेमधे हेच सांगणारी होर्डींग्स/बॅनर्स/पोस्टर.
हिंदी चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीत ’मुहूर्ताची पोस्टर रस्तोरस्ती लागण्याचा’ हा दुसरा अनुभव. निर्माते सुभाष देसाई यांनी मनमोहन देसाई दिग्दर्शित ’सुहाग’ (1978)च्या मुहूर्ताची आमच्या गिरगावातील विजेच्या खांबावरही पोस्टर लावल्याची आम्ही मित्रांनी भवन्स कॉलेजमधील कॅन्टीनमध्ये केवढी चर्चा केली. मग लक्षात आले, हे देसाईबंधू गिरगावातील खेतवाडीत राहतात म्हणून ही पोस्टरबाजी.
‘मजनून’ची पोस्टरबाजी म्हणजे राजेश खन्नाला आपला जन्म दिवस (29 डिसेंबर) जनसामान्यांना दाखवून देण्याची हौस मौज आहे लक्षात येत होते. 1979ची ही गोष्ट.
राजेश खन्नाच तो, ’साध्या साध्या गोष्टीत त्याचं मन लागेलच कसे? ’मजनून’चा निर्माता तोच होता. कमाल अमरोही दिग्दर्शक आणि राखी गुलजार नायिका. स्क्रीन साप्ताहिक, ट्रेड पेपर्समध्ये पानभर जाहिरातीत आकर्षक पोस्टर डिझाईन.
मेहबूब स्टुडिओतील फ्लोअर दोनवर मुहूर्तासाठी भला मोठा सेट लागलेला. डिंपल कापडिया फिल्मी पाहुण्यांचे छान हसत हसत स्वागत करतेय. राजेश खन्नाचा वाढदिवस आणि ’मजनून’चा मुहूर्त असा दुहेरी सुखद योग असल्यानेच की काय, अनेक पाहुणे भला मोठा पुष्पगुच्छ घेऊन येत होते. जी.पी. सिप्पी, शक्ती सामंता, राज खोसला, जे.ओम प्रकाश, मोहनकुमार, शोमु मुखर्जी, रुपेशकुमार असे त्या काळातील राजेश खन्ना कॅम्पमधील सगळेच फिल्मवाले एकेक करत आले. माहौल एकदम बदलून गेला. मुहूर्ताच्या आमंत्रणावरील अकरा वाजताची वेळ केव्हाच निघून गेली होती. सेटवर पूजा सुरू होती.
कमाल अमरोही सायलेन्स असे ओरडले तरी वातावरण शांत होण्यास वेळ गेला. पिक्चरचा मुहूर्त बडी ही शान से अशा आपल्या स्वभावानुसार हे घडत होते. अखेर मुहूर्त दृश्य सुरू झाले, ऐतिहासिक पोषाखातील राजेश खन्ना व राखी हे भल्या मोठ्या जळत्या मेणबत्तीच्या सहाय्याने प्रेमाच्या आणाभाका घेतात. संवादावर उर्दूचा विलक्षण प्रभाव जाणवतो.
दृश्य चित्रीत होतेय तोच प्रचंड टाळ्या. मिठाई आणि सॉफ्ट ड्रिंक्सचे भरपूर वाटप. त्या काळात मीडिया म्हणजे फक्त पेनवाले व फोटोग्राफर. अर्थात मुद्रित माध्यमे आणि घाई अशी कोणालाच नाही.
राजेश खन्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी ’मजनून’ या महाखर्चिक चित्रपटाचा भव्य दिमाखदार मुहूर्त असे जोरदार मीडिया कव्हरेज येत राहिले. बरेच दिवस चित्रपटसृष्टी, फिल्म दीवाने आणि मीडियात याच मुहूर्ताची रंगवून खुलवून चर्चा आणि हळूहळू लक्षात येत गेले, या भव्य मुहूर्तावरच ’मजनून’ची प्रगती थांबली ती कायमचीच.
चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीतील ’बंद’ पडलेल्या चित्रपटांच्या ’फ्लॅशबॅक’मध्ये ’मजनून’ची आठवण हुकमी. गंमतीत म्हटलं गेले, ’मजनून’चा कलरफुल मुहूर्त आणि त्याच रात्री जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमधील ग्लॅमरस पार्टी यांच्या अफाट अचाट खर्चात त्या काळातील एक सामाजिक मराठी चित्रपट निर्माण झाला असता.
राजेश खन्नाच्या जन्मदिनानिमित्त त्याच्या अशाच काही चित्रपट निर्मितीच्या विविध टप्प्यांवर बंद पडलेल्या पिक्चर्सवर हा फोकस. यातही एक स्टाईल आहे, करिश्मा आहे, कारण हे राजेश खन्नाचे पडद्यावर न आलेले चित्रपट आहेत.
असाच आणखी एक, आजच्या मल्टीप्लेक्स ओटीटी पिढीला संजय लीला भन्साली दिग्दर्शित ’बाजीराव मस्तानी ’माहित्येय, पण दिग्दर्शक मनमोहन देसाईंचाही ’बाजीराव मस्तानी’ (1978) हा अतिशय भव्य चित्रपट होता. त्यात राजेश खन्ना रोमॅन्टीक हीरो. अर्थात बाजीराव व हेमा मालिनी मस्तानी. परफेक्ट कास्टिंग.
राजेश खन्नाला शक्ती सामंता दिग्दर्शित ’आराधना’ (1969)ने स्टार केले तरी मनमोहन देसाई दिग्दर्शित ’सच्चा झूठा’(1971)ने सुपर स्टार केले. मनजी आणि राजेश खन्ना ’रोटी’(1974)मध्ये पुन्हा एकत्र आले. या चित्रपटाच्या निर्मीतीच्या काळात मनजी आणि राजेश खन्नात प्रचंड मतभेद झाल्याची गॉसिप्स मॅगझिनमधे भरपूर चर्चा रंगली. इतकी की ते पुन्हा एकत्र काम खरंच करतील काय याचीच शंका, पण सिनेमाच्या जगातले सगळेच वाद ’अंतिम फेरी’ नसतात. काही अपवाद हो. हिट आणि फ्लॉपने सगळी गणितेच काय अगदी नातीदेखील बदलतात. इगो बाजूला ठेवून पुन्हा कामाला लागतात. तेथेही उत्तम अभिनय कामाला येतो.
बरं, ’बाजीराव मस्तानी’ची प्रेमकथा म्हणजे ऐतिहासिक पाश्वभूमीवरील उत्कट प्रेम, भव्यदिव्यता आणि यासाठी सत्तर एमएमचाच पडदा हवा. ट्रेड पेपर्समध्ये दोन पाने जाहिरात दिल्याने कुतूहल निर्माण केलेला ’बाजीराव मस्तानी’ त्याच जाहिरातीपुरता रहावा? अरेरे. प्रेम व्यक्त करण्याची राजेश खन्नाची आपली एक स्टाईल होती आणि अशाच रूपेरी पडद्यावरील प्रेमाचा स्वीकार करण्याची हेमा मालिनीची आपली एक अदा होती.
दोन वा तीन भाऊ लहानपणी जत्रेत हरवले गवसले अशाच हुकमी मनोरंजक फॉर्मुलाबाज चित्रपटाचे दिग्दर्शक मनमोहन देसाई यांची रोमॅन्टीक कथा पडद्यावर कशी खुलली हे पाहणे रंजक ठरले असते ना? या चित्रपटात हेमाजी नव्हे राखी गुलजार मस्तानी साकारणार अशीही बातमी होती बरं का?… ते ठीक आहे हो पण काशीबाई कोण असती? रेखा? एकदम जोर का झटकाच. हेही परफेक्ट कास्टिंग हो. पण होता होता राहिले.
आता तुम्हीच सांगा राजेश खन्ना आणि जेम्स बॉण्ड हे समीकरण शक्य होते काय? शोभले असते काय? राजेश खन्नासाठी अनेक युवती पागल झाल्या होत्या. एकदा तर त्याच्या गाडीचं इतक्या जणींनी चुंबन घेतले की गाडीचा रंगच बदलला. काही फॅन युवती त्याला आपल्या रक्ताने पत्र लिहून आपलं प्रेम व्यक्त करीत. युवतींची अशी सपोर्ट सिस्टीम असली म्हणून काय तो जेम्स बॉण्ड?
हिंदी चित्रपटात ’देशी जेम्स बॉण्ड’ पाह्यला मिळालाच नाही असे अजिबात नाही. भले इंग्रजी चित्रपटासारखा तो पॉवरफुल अ‍ॅक्शनबाज नसेल, त्याच्या अवतीभवती पाश्चात्य व्यक्तिमत्वाच्या मोहक, मादक ललना नसतील, त्याच्याकडे आधुनिक पिस्तूल वा घोडा (त्या काळातील हो!) नसेल, कार चेसिंगमध्ये तो स्मार्ट नसेल, पण तो हिंदी चित्रपटाच्या प्रेक्षकांना अपेक्षित ’फॉरेन टच’ (वा फॉरेन रिटर्न) बॉण्ड मसाला सिनेमा असू शकतो. ’फर्ज ’ (जितेंद्र), ’एजन्ट विनोद ’ (महेन्द्र संधु), ’किमत’ (धर्मेंद्र), ’सुरक्षा’ (मिथुन चक्रवर्ती), ’इंटरनॅशनल क्रूक’ (धर्मेंद्र) असे देशी बॉण्डपट चक्क यशस्वी झाले. त्या काळात फाडफाड इंग्रजी चित्रपट पाहू नि समजू न शकणारा पब्लिक अशा हिंदी पिस्तूलबाज देमाल चित्रपटांवर फिदा असे. जोडीला नाचगाण्याची मेजवानी असेच. हिंदी पिक्चर है भाई. हिंदी चित्रपटातील बॉण्ड थोडाच विदेशी असणार? आणि त्या काळात कॉम्प्युटर ग्राफिक्स वगैरे तंत्रज्ञान नव्हतेच. पडद्यावर खरी खुरी वाटावी अशी खोटी खोटी
फायटिंग असे.
राजेश खन्नाची इमेज, पर्सनालिटी आणि देहबोली अ‍ॅक्शन हीरोची नसूनही बॉण्ड साकारू शकतो का? कुछ भी हो सकता है ते जाऊ देत. सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात त्याचा अतिशय ’पडता काळ’ असताना तो ’कमबॅक’साठी अशा काही उचापती करायचा. या चित्रपटाच्या नावातच ’राजेश खन्ना 007’. स्क्रीन साप्ताहिकात पानभर जाहिरात.
या चित्रपटाच्या मुहूर्त दृश्यात तो गाडीतून येत हवेत पिस्तूल चालवतो आणि नायिका पद्मिनी कपिला त्याला छान बिलगते असे दृश्य चित्रीत झाले. (खरंतर ही जोडीच विचित्र होती. पिक्चरचं स्वरूप पाहता झीनत अमान वा परवीन बाबी योग्य होती.)
या चित्रपटाचे दिग्दर्शक नरेन्द्र बेदी आणि राजेश खन्ना अतिशय चांगले मित्र म्हणून ओळखले जात. त्यांच्या ’बंधन’, ’द ट्रेन’, ’महाचोर’ अशा काही चित्रपटात राजेश खन्ना हीरो होता. ‘007’मध्ये असरानी, प्रेम चोप्रा वगैरे होतेच. चित्रपटाचे संवाद कादर खानचे होते.
मुहूर्त जोरदार झाल्याचे मीडियात भरभरून कव्हरेजही आले. त्या काळात ’शूटिंग रिपोर्टींग’ची सदरे वाचनीय होत. हाही चित्रपट बंद पडला आणि त्याचा जोरदार मुहूर्तच तेवढा आठवणीत राहिला हे समजलेच नाही… राजेश खन्नाही तेव्हा ते विसरला असेल.
असेच एकदा 1988 साली एक फिल्मी मुहूर्ताचे आमंत्रण हाती आले. राजेश खन्ना निर्मित ’जय शिव शंकर’ या चित्रपटाचा गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीत मुहूर्त.
चित्रपटाचे दिग्दर्शन एस. व्ही. चंद्रशेखर राव यांचे (ते दक्षिणेकडून आलेले). विशेष म्हणजे या चित्रपटात चक्क राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया हे नायक नायिका. असा योग जुळून आल्याचा हा एकमेव चित्रपट. म्हणून तर मुंबईतील आम्हा काही सिनेपत्रकारांना मुहूर्ताला आवर्जून आमंत्रित केले. चित्रनगरीतील देवळात हा मुहूर्त होता. सेटवरचे प्रफुल्लित वातावरणच सांगत होते, हा राजेश खन्नाचा पिक्चर आहे. असा व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडायला हवाच हो. असं असूनही नारिंगी साडीतील डिंपल अगोदर आली आणि मग राजेश खन्ना आला (त्याचीही चक्क बातमी झाली. तेव्हापासून अशा बातम्या होताहेत.) मुहूर्ताला दिग्दर्शक बी. आर. चोप्रा, विजय आनंद, जे.ओम प्रकाश, मोहनकुमार असे अनेक जण शुभेच्छा द्यायला हजर. हा अगदी मल्टी स्टार कास्ट चित्रपट . जितेंद्र, पूनम धिल्लॉन, चंकी पांडे आणि संगीता बिजलानी असे तेव्हाचे टॉपचे स्टारही या चित्रपटात. रमेश देव आणि सीमा यांच्याही या चित्रपटात भूमिका. राजेश खन्नाचे गीतकार मित्र आनंद बक्षी आणि संगीतकार मित्र राहुल देव बर्मनचे संगीत. असे सगळे व्यवस्थित होते. उटी येथे एक मोठे शूटिंग शेड्युलही झाले. मुंबईतील मीडियाला शूटिंग कव्हरेजसाठी नेलेही. राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया खरं तर त्या काळात वेगळे राहत होते, त्यांच्या संसारातील भांडणे गॉसिप्स मॅगझिनमधून रंगवून खुलवून चघळली जात होती. त्यामुळेच तर या चित्रपटात ते एकत्र आले आहेत याला बरेच महत्त्व. या चित्रपटातील या दोघांच्या रोमॅन्टीक पोझच्या फोटोना तेव्हा भरपूर कव्हरेज मिळाले. दोघांच्याही चाहत्यांना या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता लागली होती आणि राजेश खन्नाच्याच ’आप की कसम’मधील हिट गाण्याचा मुखडा या चित्रपटाचे नाव असल्याने तर आणखीच अपेक्षा, पण हे सगळे मिडियात आणि चाहत्यांमध्येच राहिले. हा चित्रपट पडद्यावर आलाच नाही. त्यामुळेच ’जय शिव शंकर’ असे म्हणताक्षणीच अनेकांना ’आप की कसम ’चे गाणे हमखास आठवते, पण त्या नावाचा चक्क राजेश खन्नाची भूमिका असलेला चित्रपट होता हे आठवत नाही. एखाद्या रिलीज न झालेल्या चित्रपटाची अशीही गोष्ट.
राजेश खन्नाच्या पडद्यावर न आलेल्या चित्रपटांचे प्रगती पुस्तकही बरेच मोठे. काही नावे सांगायला हवीतच. बी.आर. चोप्रा दिग्दर्शित ’सोहनी महिवाल’ (नायिका नीतू सिंग), प्रकाश मेहरा दिग्दर्शित ’जादुगर’ (यात राजेश खन्नासोबत शत्रुघ्न सिन्हा, झीनत अमान, सारिका आणि प्राण) याची ट्रेड पेपरमध्ये भली मोठी जाहिरात आली. पुढे प्रगती इतकीच की, प्रकाश मेहरा स्टार कास्ट बदलून ’जादुगर’ पडद्यावर आणला आणि त्या काळातील अमिताभचा तो अपयशी चित्रपट ठरला. प्रकाश मेहरा दिग्दर्शित ’कायर’ (जोडीला हेमा मालिनी व संजय खान), दिग्दर्शक प्रकाश मेहरा व राजेश खन्ना कधीच एकत्र आले नाहीत हेही विशेषच. रमेश दिग्दर्शित ’नाका’, ’मोहनकुमार दिग्दर्शित ’अपराधी’ (नायिका शबाना आझमी), मनोजकुमार अभिनित व दिग्दर्शित ’नया भारत’ (या चित्रपटाची पटकथा व संवाद सलिम जावेदचे होते), सुरेश ग्रोव्हर दिग्दर्शित ’आप के काबिल’, शम्मी कपूर दिग्दर्शित ’प्यास’, के. हुसेन दिग्दर्शित ’6 डिसेंबर लव्ह स्टोरी’ (जोडीला जॅकी श्रॉफ, नेहा धुपिया), बी.आर. चोप्रा दिग्दर्शित ’पुरुष’ (नायिका शबाना आझमी), विमल चढ्ढा दिग्दर्शित ’साहिब’, बी.आर. चोप्रा दिग्दर्शित ’पुरुष’ (नायिका शबाना आझमी), रामानंद सागर दिग्दर्शित ’अंगारा’ (नायिका शबाना), चेतन आनंद दिग्दर्शित ’संध्या काल’ (नायिका राखी), सुरेन्द मोहन दिग्दर्शित ’वापसी’ (नायिका राखी व झीनत), वगैरे आणखीन काही. यात एक चित्रपट मला विशेष वाटतोय, ’सीमा’. 1968 साली म्हणजे राजेश खन्नाच्या कारकिर्दीचा सुरुवातीचा काळ. चित्रपटात मीनाकुमारी व शशी कपूर. या चित्रपटातील फोटो त्या काळात प्रसिद्ध होत राहिले, पण चित्रपट आलाच नाही.
राजेश खन्नाच्या जन्मदिनानिमित्त अशी त्याच्या पडद्यावर न आलेल्या चित्रपटांचा विशेष फ्लॅशबॅक.
-दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply