Breaking News

रायगडात 58 हजार 203 नवीन मतदारांची नोंदणी

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात 58 हजार 203 नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे, तर 49 हजार 433 मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. जिल्ह्यात एकूण मतदारांची संख्या 23 लाख 16 हजार 515 इतकी झाली आहे. अलिबाग, श्रीवर्धन व महाड या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे. जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात 18 ते 19 वयोगटातील मतदारांची अत्यल्प 0.47 टक्के इतकी आहे, अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दिली.
1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता.रायगड जिल्ह्यातील माहिती देण्यासाठी मंगळवारी (दि. 23) जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी डॉ. म्हसे यांनी ही माहिती दिली. निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे समवेत उपस्थित होत्या.
या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ऑक्टोबर 2023च्या प्रारूप मतदार यादीत 58 हजार 203 मतदारांची नाव नोंदणी झाली तसेच 49 हजार 433 मतदारांची वगळणी करण्यात आली. त्यामुळे अंतिम मतदार यादीत आठ हजार 770 मतदारांची निव्वळ वाढ होऊन एकूण मतदारांची संख्या 23 लाख 16 हजार 515 इतकी झाली आहे. त्यानुसार एक हजार 768 पुरुष मतदारांची सहा हजार 965 स्त्री मतदारांची आणि 37 तृतीयपंथी मतदारांची निव्वळ वाढ झाली आहे. महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, गृहनिर्माण सोसायट्या यांच्या सहकार्यामुळे यंदा महिलांच्या मतदार नोंदणीत लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. त्यामुळे मतदार यादीतील स्त्री पुरुष गुणोत्तर 962 वरुन 966 इतके झाले आहे.
या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये 18 ते 19 वयोगटातील 13 हजार 440 मतदारांची नव्याने भर पडली आहे तसेच 20 ते 29 वयोगटात 18 हजार 494 मतदारांची वाढ झालेली आहे. प्रारूप यादीत 18 ते 19 या वयोगटाची मतदार संख्या 10 हजार 737 म्हणजे 0.47 टक्के होती, ती जानेवारीच्या अंतिम मतदार यादीत 24 हजार 177 म्हणजे 1.04 टक्के इतकी झाली आहे. 20 ते 29 वयोगटाची प्रारूप यादीतील मतदार संख्या चार लाख सात हजार 258 (17.65 टक्के) होती, ती अंतिम यादीत चार लाख 25 हजार 751 (18.38 टक्के) इतकी झाली आहे.
36 हजार 524 मृत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली.त्याचप्रमाणे मतदार याद्यामध्ये 19 हजार 658 एकसारखे फोटो असलेले मतदार असल्याचे निदर्शनास आले, त्यांची सखोल तपासणी करुन विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कालावधीत सहा हजार 517 मतदारांच्या नावांची वगळणी करण्यात आली आहे. मतदार यादीत नाव व इतर काही तपशील समान असलेले नऊ हजार 314 मतदार आढळून आले. त्यांची सखोल तपासणी करून तीन हजार 259 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.
दिव्यांग मतदारांना ये-जा करण्याच्या दृष्टीने 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व मतदान केंद्र तळमजल्यावर आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यंदाच्या पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये मतदार नोंदणीसाठी 1 जानेवारी या नेहमीच्या अर्हता दिनांकासोबत 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर या बहुअर्हता तारखा ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे ऑक्टोबर 2024पर्यंत 18 वर्षे पूर्ण करणार्‍या युवांनाही या मोहिमेत आगाऊ किंवा पूर्व नोंदणी करता आली. पूर्वनोंदणीचे एकूण अर्ज नऊ हजार 72 प्राप्त झालेले आहेत.
त्या-त्या तिमाहीच्या कालावधीत 18 वर्षे पूर्ण होणार्‍या अर्जदारांच्या अर्जावर प्रक्रीया करण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्व नोंदणी केलेल्या युवांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही, मात्र अंतिम यादी प्रसिध्द झाल्यानंतरही मतदार नोंदणीची निरंतर अद्यतन प्रक्रिया सुरू असल्यामुळे अद्याप नाव नोंदणी न केलेल्या युवांना मतदार नोंदणीची अजूनही संधी आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. म्हसे यांनी दिली.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply