Breaking News

पनवेल महापालिकेला मिळणार पाताळगंगा नदीतून वाढीव पाणी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रस्तावास शासनाची मंजुरी

पनवेल : प्रतिनिधी
आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य शासनाला पत्र देऊन पनवेल महानगरपालिकेला पाताळगंगा नदीतून घरगुती कारणासाठी वाढीव 3.65 द.ल.घ.मी. पाणी देण्याची मागणी केली होती. त्या आरक्षण प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पनवेलकरांच्या सन 2051पर्यंतचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
पनवेल शहराला दररोज 28 एमएलडी पाण्याची गरज आहे. त्यापैकी आप्पासाहेब वेदक (देहरंग) धरणातून आठ एमएलडी, एमआयडीसीकडून पाच एमएलडी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून 15 एमएलडी पाणी मिळते. नवी मुंबई विमानतळ, रेल्वे, औद्योगिक वसाहत व नवीन झालेल्या अटल सेतूमुळे मोठ्या प्रमाणात राहण्यासाठी पनवेलला पसंती दिली जात आहे. त्यामुळे पनवेल महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत वाढत आहे. महापालिकेचे स्वतःच्या मालकीचे मोठे धरण नसल्याने पालिका हद्दीतील वाढत्या लोकसंख्येला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
पनवेल महापालिकेची सन 2051पर्यंत लोकसंख्या 35 लाख होईल असे गृहीत धरून त्या वेळी पाण्याची गरज वाढणार आहे. यासाठी पनवेल महापालिकेला जादा पाणी मिळण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात जलसंपदा खात्याचे अधिकारी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, नगरविकास खात्याचे अधिकारी व महापालिका आयुक्त यांच्याबरोबर बैठक घेतली. याशिवाय जलसंपदा खात्याने कुंडलिका नदीतून पाणी पनवेलला द्यावे, असाही प्रस्ताव महापालिकेने पाठवला आहे. त्याची अधिसूचना लवकरच निघणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेप्रमाणे पाताळगंगा नदीतून घरगुती कारणासाठी वाढीव 3.65 द.ल.घ.मी. पाणी पनवेलला देण्याच्या प्रस्तावाला जलसंपदा विभागाने 14 मार्च रोजी मंजुरी दिली. त्यामुळे पनवेल महापालिकेला दररोज 10 एमएलडी पाणी मिळणार आहे. त्यामुळे पालिका हद्दीतील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. याशिवाय न्हावा शेवा योजनाही लवकरच पूर्ण होणार असल्याने त्यातूनदेखील पाणी मिळणार असल्याने पनवेलकरांची पाण्याची चिंता मिटणार आहे. याबद्दल माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले आहेत.

पनवेलकरांना भेडसावणारा पाणीपुरवठ्याचा प्रश्न लक्षात घेता पर्यायी स्रोत निर्माण करणे गरजेचे असल्याने त्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महापालिका आयुक्त व माजी नगरसेवक यांची बैठक घेण्यात आली. पर्यायी स्रोत निर्माण करण्याचाच भाग म्हणून त्यांनी पाताळगंगा नदीवरील जलशुद्धीकरण प्रकल्पातून पनवेल महापालिकेला दररोज 10 एमएलडी पाणी देण्याचा निर्णय घेतला. याबद्दल मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य शासनाचे आभार मानतो.
-प्रशांत ठाकूर, आमदार, पनवेल

पनवेल महापालिकेला पाताळगंगा नदीतून वाढीव पाणी मिळणार असल्याने आज महापालिका हद्दीत जो पाण्याचा विस्कळीतपणा जाणवत होता, तो कमी होऊन नागरिकांना मुबलक पाणी मिळेल.
-गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिका

Check Also

25 एकांकिका राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य …

Leave a Reply