Breaking News

राष्ट्रीय स्पर्धेत ‘नृत्यआराधना’च्या विद्यार्थ्यांचे सुवर्णयश

पनवेल : रामप्रहर वृत्त

बंगळुरू येथे झालेल्या कल्पतरू नॅशनल डान्स कॉम्पिटीशन 2019 या राष्ट्रीय भरतनाट्यम स्पर्धेत पनवेल येथील नृत्यआराधना कला निकेतन संस्थेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून सुवर्णयश संपादन केले आहे. या यशाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, वर्षा ठाकूर यांनी विजेत्यांचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.

राष्ट्रीय स्तरावरील भरतनाट्यम स्पर्धेत देशभरातून शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत पनवेल येथील नृत्यआराधना कला निकेतन संस्थेच्या संचालिका व प्रशिक्षक गुरु अ‍ॅड. दीपिका मनीष सराफ आणि अमिता सचिन सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी खुल्या समूह नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. यात तनया घरत, पूर्वा नलावडे, मृन्मयी ठाणगे, वैदेही पोटे, शिवानी पाचारकर या स्पर्धकांचा सहभाग होता. 16 ते 22 वर्षाखालील एकेरी नृत्य गटात मृन्मयी विनोद ठाणगे हिने तृतीय क्रमांक मिळविला. सहा ते नऊ वर्षाखालील गटातील एकेरी स्पर्धेत ज्वेता सचिन सराफ (वय सहा) हिने तृतीय क्रमांक पटकाविला. विशेष म्हणजे ज्वेता या स्पर्धेतील सर्वात लहान वयाची स्पर्धक होती. त्यामुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला.

नृत्यआराधना कलानिकेतन संस्था गेल्या आठ वर्षांपासून पनवेलमध्ये विद्यार्थ्यांना नृत्याचे धडे देत आहे. अल्पावधीतच या संस्थेच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थी प्रशिक्षित झाले असून, राष्ट्रीय स्पर्धेतून मिळालेल्या यशाने संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply