Breaking News

विरोधकांकडून होणारा अपप्रचार खोडून काढा; लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
लोकसभा निवडणुकीप्रमाणे या विधानसभा निवडणुकीतही विरोधकांकडून स्वार्थापोटी खोटा प्रचार करून जनतेची दिशाभूल करण्याबरोबरच समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे हा खोटा प्रचार हाणून पाडण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सतर्क रहावे, असे मार्गदर्शनपर आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी येथे केले. सेक्टर प्रमुख व सेक्टर प्रभारी यांची बैठक तसेच राज्यपाल नियुक्त आमदार विक्रांत पाटील यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, ऍड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, दीपक बेहेरे, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी महापौर कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक हरेश केणी, तालुका उपाध्यक्ष एस.के. नाईक, संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, सुनील घरत, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, कर्जत अध्यक्ष राजेश भगत, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष कमला देशेकर, शहर अध्यक्ष राजेश्री वावेकर, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह माजी नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सेक्टर प्रमुख व सेक्टर प्रभारी, पदाधिकारी उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुढे म्हटले की, लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव विमानतळाला लागण्यासाठी आपण सर्व प्रकारच्या लढाया लढल्या आहेत. मोर्चे, आंदोलने, बैठका, पाठपुरावा केला आहे. त्या अनुषंगाने ‘दिबां’चे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला आणि ‘दिबा’व्यतिरिक्त इतर कोणाचेही नावाचा प्रस्ताव केंद्राकडे आला नसल्याचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांनी स्पष्ट केले आहे तसेच आमचे सरकार ‘दिबां’च्या आणि आपल्या संघर्षाचा सन्मान करीत असल्याचे त्यांनी सांगून लवकरच ‘दिबां’चे नाव विमानतळाला जाहीर करण्याचे आश्वासनही केंद्र सरकारच्या वतीने त्यांनी दिले आहे. असे स्पष्ट असतानाही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला गेला आणि त्या अनुषंगाने स्व. रतन टाटा यांचे नाव देण्याच्या वावड्या उठवण्यात आल्या. त्यामुळे अशा प्रकारच्या अनेक बाबतीत विरोधाभास निर्माण करून खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जाईल. त्यांच्या भूलथापांना जनता भुलणार नाही, मात्र आपणही त्यांचा अपप्रचार खोडून काढला पाहिजे.
पुढे बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी राज्यपाल नियुक्त आमदार विक्रांत पाटील यांचे कौतुक केले. विक्रांतच्या निमित्ताने आनंदाची बातमी मिळाली. तो आपल्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण असल्याचे अधोरेखित करून संघटनात्मक जबाबदारी पार पाडताना मिळालेला सन्मान असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. विक्रांत पाटील यांचा आचारसंहिता असल्याने आज छोटेखानी सत्कार घेण्यात आला, पण निवडणूक संपल्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील यांचा विजयी भव्य जाहीर सत्कार सोहळा आयोजित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या बैठकीदरम्यान भाजप पक्षश्रेष्ठींकडून उमेदवारी जाहीर झाल्याचे वृत्त प्रसारित झाले. त्याबद्दल विजयी घोषणा देत जल्लोष करण्यात आला. उमेदवारी दिल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षनेतृत्वाचे तसेच पदाधिकारी, कार्यकर्त्याचे व जनतेचे आभार मानले. भाजपच्या कार्यकर्त्याला संधी मिळते त्याचे उदाहरण आमदार विक्रांत पाटील असल्याचे त्यांनी म्हटले. आपल्याला कधी काही मिळेल याची अपेक्षा कार्यकर्ता बाळगत नाही तर काम करत राहायचे हा भाजप कार्यकर्त्याचा पिंड आहे. बाळासाहेब पाटील यांनी गेली 40 वर्षे मेहनत आणि जिद्दीने काम केले, असे सांगतानाच विक्रांत पाटील यांनी केलेली मेहनत फळाला आली असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
खारघर टोलमुक्ती करण्याच्या दृष्टिकोनातून आपण भाजपमध्ये सहभागी झालो. त्या वेळी देवेंद्रजी यांनी आम्हाला टोलमुक्तीचा शब्द दिला होता आणि तो शब्द त्यांनी पूर्ण करून दिला. त्या ऐतिहासिक निर्णयाचा फायदा वाहनचालकांना झाला. त्यानंतर अनेक प्रकल्प, योजना, विकासकामे देवेंद्रजींच्या व महायुतीच्या नेतृत्वामुळे पनवेल क्षेत्रात आली. यापुढीलही काळात विकासाचा महामेरू चालत राहील, असा विश्वासही आमदार प्रशांत ठाकूर यांनी जनतेला दिला.
या वेळी प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील यांनी म्हटले की, लोकनेते रामशेठ ठाकूर विरोधी पक्षात होते तेव्हासुद्धा त्यांच्याप्रती कायम आम्हाला आदर होता. आणि तो आदर भाजपमध्ये वृद्धिंगत झाला. कर्णानंतर दानशूर म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर आहेतम तर आमदार प्रशांत ठाकूर संयमी आणि दिलेली वेळ पाळणारे, सामाजिक जाणीव असलेले लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या पाठीशी सर्वांचे आशीर्वाद असून विजय निश्चित आहे, फक्त भरघोस मतांनी जिंकायचे आहे. त्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आमदार विक्रांत पाटील यांचा झालेला सत्कार राजकीय जीवनातील मोठी अचिव्हमेंट असल्याचेही नमूद केले.
या वेळी आमदार विक्रांत पाटील यांनी आपल्या जीवनातील राजकीय आढावा मांडला. लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी माझा सन्मान केला, त्याबद्दल मी भारावून गेलो आहे. बाहेरचे लोकं कौतुक करतात, पण जेव्हा घरच्या लोकांकडून कौतुकाची थाप मिळते तेव्हा तो आनंद वेगळाच असतो आणि तो आजच्या सत्काराने मला झाला असून हे माझ्यासाठी अभिमानाचे आहे. त्यामुळे मी तुमच्या प्रेमातून कधीही उत्तराई होऊ शकत नाही. लोकनेते रामशेठ ठाकूर हे मार्गदर्शनाचे विद्यापीठ आहे. आपल्या सर्वांचे नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेत. विधायक कार्य, वेळ, पायाला भिंगरी लावून काम करणे अशा अनेक गोष्टी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. आपला नेता शंभर नंबरी आहे. विरोधक वातावरण दूषित करण्याचे काम करतील, पण आपण सर्वानी सजग राहिले पाहिजे. या निवडणुकीत प्रत्येकाने मीच उमेदवार असे समजून काम करा. फक्त विजय नाही तर मतांचा लीड महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी म्हटले.
भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी सांगितले की, विरोधकांकडून अपप्रचार केला जात आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक मंडलात कार्यालय आहे आणि त्या कार्यालयांच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे तसेच विविध योजना लोकापर्यंत पोहचवण्याचे काम केले जाते, मात्र विरोधकांकडे कुठलाही मुद्दा नसल्याने ते आता वेगवेगळ्या क्लुप्त्या करत खोटा प्रचार करत आहेत तसेच लाडकी बहीण किंवा इतर योजना बंद करण्याच्या अफवाही उठवत आहेत. त्या अफवांनाही नागरिकांनी बळी पडू नये.

Check Also

सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघांचे काम प्रेरणादायी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे गौरवोद्गार; वर्धापन दिन उत्साहात पनवेल ः रामप्रहर वृत्त सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी …

Leave a Reply