पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि. 1) पहाटे वडाळे तलाव परिसरात आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमध्ये आनंद गंधर्व पंडित आनंद भाटे आणि सुप्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे यांच्या सुश्राव्य गाण्याने पनवेलकर रसिक मंत्रमुग्ध झाले. या वेळी महापालिकेकडून मतदान जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे, निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी गायक आनंद भाटे यांनी संगीत सौभद्र नाटकामधील राधा धर मधू मिलिंद जय जय, रम्य ही स्वर्गाहून लंका, संगीत मानापमानमधील युवती मना दारूण रण अशी अनेक नाट्यपदे सादर करून रसिक श्रोत्यांची मने जिंकली. याचबरोबर लक्ष्मी बारम्मा, बाजे मुरली या बाजे, बोलावा विठ्ठल, माझे माहेर पंढरी, अवघा रंग झाला, चिन्मया सकल हृदया अशी सुंदर भजने सादर केली.
गायिका प्रियांका बर्वे यांनी कवी सुरेश भट यांची गजल ‘केव्हा तरी पहाटे’ने रसिकांना मंत्रमुग्ध केले. लोकसंगीत सादर करताना जाळीमंदी पिकली करवंद ही लावणी सादर केली तसेच अभंग अवचिता परिमळू, नाट्य संगीतामध्ये नाही मी बोलत हे नाट्यपद सादर केले.
गेल्या काही वर्षांपासून महापालिकेच्या वतीने पनवेलकरांची दिवाळी सुरमयी व्हावी यासाठी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी विधानसभा निवडणूकनिमित्ताने या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वीप कार्यक्रमांत मतदान जनजागृती करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक यांनी नागरिकांना मतदान शपथ दिली तसेच महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी नागरिकांनी येत्या 20 नोंव्हेबरला मतदानाच्या हक्काची अंमलबजावणी करण्यासाठी, सुजाण लोकप्रतिनिधी निवडून आणण्यासाठी नागरिकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन उपस्थितांना केले व उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयुक्तांनी आनंद गंधर्व पंडित आनंद भाटे आणि पार्श्वगायिका गायिका प्रियांका बर्वे, निवेदिका दिप्ती भागवत यांचा स्मृतीचिन्ह व पुप्षगुच्छ देऊन सन्मान केला. उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमासाठी उपायुक्त कैलास गावडे व शहर अभियंता संजय कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका अधिकारी व कर्मचार्यांनी मेहनत घेतली.
कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, सहायक आयुक्त श्रीराम पवार, कार्यकारी अभियंता सुधीर सांळुखे, अधिकारी, पदाधिकारी व हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Check Also
तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड
पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …