Breaking News

शिवकरमधील तरुणाच्या हत्येचे गूढ उकलले; त्रिकूट गजाआड

पनवेल ः वार्ताहर

पनवेल तालुक्यातील शिवकर येथे झालेल्या तरुणाच्या हत्येचा उलगडा झाला आहे. चोरीसाठी आलेल्या आरोपींना या तरुणाने चोरी करताना पाहिल्यामुळे त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना गजाआड केले आहे. शिवकर येथील 19 वर्षीय विनोद पाटील याची पहाटेच्या सुमारास कुर्‍हाडीने हत्या केल्याची घटना घडली होती. या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली होती. गुन्हे शाखा कक्ष 3च्या पथकाने या गुन्ह्याचा उलगडा केला. आरोपी दिनेशकुमार सरोज, वीरेंद्र कुमार सरोज, चंद्रशेखर लालजी हे  गुन्ह्याच्या दिवशी पहाटेच्या सुमारास शिवकर गावात कोंबड्या चोरण्यासाठी आले होते. या वेळी ते विनयच्या घरात मोबाईल चोरण्यासाठी शिरले असता विनयला जाग आली. विनयला पाहून आरोपी पळू लागल्याने त्याने पाठोपाठ घरातून बाहेर पडत चोरांचा पाठलाग सुरू केला. या वेळी या तिन्ही चोरट्यांनी विनयला पकडले आणि पोटात चाकूने वार करून जखमी केले. त्यानंतर कुर्‍हाडीनेही शरीरावर वार केला. यामध्ये विनयचा जागीच मृत्यू झाला. थोड्या वेळानंतर वडील आणि बहिणीला जाग आल्यानंतर त्यांनी विनयचा शोध घेण्यास सुरू केला. या वेळी त्यांना तलावाच्या गणपती घाटाजवळ विनयचा मृतदेह आढळला. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच घटनास्थळी वरिष्ठ अधिकार्‍यांनी भेट दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांची वेगळी पथके तयार करून आरोपीच्या शोधात परिसर पिंजून काढत होते. दरम्यान, गुन्हे शाखा कक्ष 3चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ कोळेकर व पथकाने समांतर तपास सुरू करून त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले व पनवेल शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. याबाबत पनवेल शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Check Also

खारघर येथे रक्तदान महाशिबिर; आमदार प्रशांत ठाकूर यांनीही दिले योगदान

खारघर ः रामप्रहर वृत्तश्री परशुराम जयंतीचे औचित्य साधून खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये रविवारी …

Leave a Reply