आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी
नागपूर : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका हद्दीत अनधिकृत आठवडा बाजार व हातगाड्यांच्या रूपाने ‘नवा अनधिकृत व्यापार जिहाद’ पुकारण्यात आला आहे, या अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा, अशी जोरदार मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात हा विषय मांडताना अनधिकृत आठवडा बाजार व हातगाड्यांमुळे नागरिकांना होणारा नाहक त्रास विषद केला. त्यांनी आपल्या औचित्याच्या मुद्द्यातून सांगितले की, पनवेल विधानसभा मतदारसंघात पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये ठिकठिकाणी आठवडा बाजार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दररोज महापालिका हद्दीतील कुठल्याही शहरामध्ये आठवडा बाजार भरवले जातात. कुठलीही कायदेशीर परवानगी न घेता अवैधपणे व दादागिरीने हे बाजार चालवले जातात आणि त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत आहे. त्याचबरोबर हातगाड्यांचे मोठ्या प्रमाणात पेव फुटून या हातगाड्यांनी शहरातील प्रमुख रस्ते व्यापले आहेत आणि त्यामुळे स्थानिक नागरिक व अधिकृत व्यवसायिक तक्रार करत आहेत, मात्र महापालिकेच्या माध्यमातून तकलादू स्वरूपाची कारवाई केली जाते. या हातगाड्यांवर अनधिकृत धंदेसुद्धा चालवले जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळे होतात अशा प्रकारच्याही तक्रारी वाढत चालल्या आहेत. त्याचबरोबर हातगाड्यांमार्फत आठवडा बाजारात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी लोकं व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले आहे, असेही त्यांनी सभागृहात अधोरेखित करून या विषयावरही शासनाचे लक्ष वेधले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे सांगितले की, बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत आणि त्याचवेळेला येथे कायद्यानुसार परवानग्या, कर भरणार्या, आर्थिक गुंतवणूक, कर्ज घेऊन व्यवसाय करणार्या अशा व्यावसायिक नागरिकांवर मात्र अन्याय होत आहे आणि त्यामुळे या व्यावसायिकांना व्यवसाय करणे कठीण झाले आहे. एकूणच अनधिकृत आठवडा बाजार व हातगाडीमुळे नवा अनधिकृत व्यापार जिहाद पुकारला गेला आहे. त्याच्यावर कायद्याचा बडगा उगारण्याची आवश्यकता आहे आणि त्या अनुषंगाने शासनाने महापालिकेला तातडीने कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत केली.