आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी त्या विमानतळास दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही व्हावी, अशी आग्रही मागणी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना निवेदनही दिले आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोकनेते स्व.दि.बा. पाटीलसाहेब यांचा 13 जानेवारी हा जन्मदिवस. 13 जानेवारी 2025 रोजी स्व.दि.बा. पाटीलसाहेब यांची 99वी जयंती असून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र शासनातर्फे मुंबईला पर्याय म्हणून ठाणे, पनवेल, उरण तालुक्यातील गावांमध्ये नवी मुंबई निर्माण करण्याकरिता प्रकल्प राबविण्यात आला. हा प्रकल्प राबवित असताना येथील स्थानिक कष्टकरी, शेतकरी, प्रकल्पग्रस्त वर्ग विस्थापित न होता त्यांना यथोचित न्याय मिळण्यासाठी स्व.दि.बा. पाटीलसाहेबांनी भूमिपुत्रांसाठी केलेल्या संघर्षाची इतिहासाने नोंद घेतली आहे. केवळ त्यांनी केलेल्या संघर्षामुळेच इथला स्थानिक भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त आज ताठ मानेने उभा आहे व त्याकरिता या तालुक्यांतील प्रकल्पग्रस्त हे कायमस्वरूपी त्यांचे ऋणी आहेत. अशा या दिवंगत लोकनेत्याचे नाव याच परिसरात विकसित होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास द्यावे अशी आग्रही मागणी येथील भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त तसेच लोकप्रतिनिधींकडून सातत्याने होत आहे.
स्व.दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव या विमानतळाला देण्यात यावे याकरिता गेली अनेक वर्षे प्रकल्पग्रस्तांकडून विविध बैठका, पत्रव्यवहार तसेच विविध आंदोलनांमार्फत सरकारचे या मागणीकडे लक्ष वेधण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. या प्रयत्नांमुळेच दि.बा. पाटीलसाहेब यांचा कर्तृत्वाचा योग्य सन्मान होण्याच्या दृष्टीने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ’लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ हे नाव देण्याचा प्रस्ताव आपल्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने केला आहे, असे नमूद करत त्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करत त्यांचे आभारही मानले आहेत.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, या विमानतळाचे काम अतिशय वेगाने चालू असून एप्रिल 2025पर्यंत सर्व कामे पूर्ण होऊन देशांतर्गत विमानसेवा एप्रिलमध्ये चालू होण्याकरिता पूर्ण प्रयत्न चालू आहेत व त्यामध्ये सरकारला यश येईल याबद्दल अजिबात शंका नाही. अशा वेळी विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी या परिसरातील सर्व प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार या विमानतळाला लोकनेते स्व.दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्यात येणार का? याबाबत सर्व प्रकल्पग्रस्त व नागरिकांमध्ये शंका व्यक्त केली जात आहे तसेच काही राजकीय विरोधक निव्वळ राजकारणासाठी याबाबत वेगवेगळ्या बातम्या पसरवून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत. त्यामुळे हा निर्णय लवकर होणे गरजेचे आहे. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची मध्यंतरी भेट घेतली असता त्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे तसेच या प्रस्तावासोबतच अन्य विमानतळाचे प्रस्तावदेखील माननीय पंतप्रधान कार्यालयाकडे प्रस्तावित केले असून या सर्वाबाबत एकत्रित निर्णय होणार असल्याचे समजल्याचे सांगितले. तरी आता हा निर्णय लवकरात लवकर म्हणजेच विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी होणे गरजेचे आहे. त्यामुळेच राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून ही मागणी मंजूर करण्याकरिता केंद्र सरकारला भाग पाडणे आवश्यक आहे.
स्व.दि.बा. पाटीलसाहेब यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सुरुवातीलाच एप्रिल 2025पूर्वी म्हणजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी केंद्र सरकारने या प्रस्तावास मंजूरी दिल्यास ते दि.बा. पाटीलसाहेबांच्या कर्तृत्वास अभिवादन ठरेल व शासनातर्फे त्यांच्या कार्याचा योग्य तो सन्मान केल्याचे जाणवणार आहे. त्यामुळे सर्व प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या भावनांचा विचार करून विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांच्या नावाच्या या प्रस्तावास केंद्र सरकारने मान्यता द्यावी, याकरिता राज्य सरकारतर्फे आवश्यक तो पाठपुरावा करून सर्व प्रकल्पग्रस्तांना हा आनंद मिळवून द्यावा, असेही आमदार प्रशांत ठाकूर या निवेदनात अधोरेखित केले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper