पनवेल ः रामप्रहर वृत्त
क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख असलेल्या लॉर्ड्स मैदानावर दिलीप वेंगसरकर यांनी धावांचे तीनदा शतक झळकावले आहे आणि अशा रत्नपारखी व्यक्तिमत्वाकडून पनवेलच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षण केंद्रातून या खेळातील नवी रत्ने मिळतील, असा विश्वास राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी रविवारी (दि. 27) नवीन पनवेल येथे व्यक्त केला.
पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून व पाठपुराव्यातून तसेच तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख, विद्यमान आयुक्त मंगेश चितळे यांच्या प्रशासकीय अनुभवातून नवीन पनवेल येथे महापालिकेच्या माध्यमातून साकारलेल्या दिलीप वेंगसरकर संचलित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. तत्पूर्वी काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
मंत्री आशिष शेलार यांनी पुढे बोलताना सांगितले की, क्रीडा क्षेत्राच्या अनुषंगाने उभारण्यात आलेल्या या दर्जेदार प्रशिक्षण केंद्राची सुविधा एक नंबरची आहे. विमानतळ आणि क्रिकेट प्रशिक्षण केंद्र यांच्यात चार किलोमीटर अंतर आहे. त्यामुळे कनेक्ट फ्लाईटच्या निमित्ताने या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सरावासाठी येतील. हे प्रशिक्षण केंद्र उत्तम आहेच. तंत्र, एकाग्रता आणि सातत्य टिकवणे महत्त्वाचे असते आणि ते या ठिकाणी होईल. येथील वाढती सुविधा लक्षात घेऊन रोहित शर्मासुद्धा सरावाला येईल, असेही ते म्हणाले.
मी बीसीसीआय, एमसीएमध्ये काम केले आहे. एशियन क्रिकेट कौन्सिलमध्ये काम करीत आहे. त्यामुळे क्रिकेट व आपले नाते अतूट असल्याचे अधोरेखित करीत आजच्या या प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन होत असताना ही सुविधा खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींसाठी उपलब्ध झाली आहे याचा खूप आनंद होत असल्याचेही ना. शेलार यांनी नमूद केले.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या रूपाने जनमानसाला आवश्यक असलेला लोकप्रतिनिधी पुन्हा मिळाला आहे. राजकारणात दुसरी टर्म मिळाल्यावर डोक्यात बडेजावची हवा जाते, पण आमदार प्रशांत ठाकूर चार वेळा आमदार होऊनही त्यांच्या डोक्यात कधीच मोठेपणाची हवा गेली नाही. तेव्हापण आणि आजपण त्यांच्या स्वभावात कुठलाच बदल झाला नाही, असेही त्यांनी म्हटले.
दिलीप वेंगसरकर स्वतः मेहनत घेतात. खेळाडूंचे मनोधैर्य वाढवतात. पुण्यामध्ये दिलीप वेंगसरकर यांच्या माध्यमातून अकादमी उभारली गेली आणि त्यातून गरीब कुटुंबामधील ऋतुराज गायकवाड देशासाठी खेळत आहे. त्या अनुषंगाने या अकादमीतूनही चांगले खेळाडू घडतील, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पनवेल महानगरपालिकेची 2016 साली स्थापना झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 डेज टार्गेट संकल्पना आखली आणि यामध्येही महापालिका यशस्वी ठरली. अल्पावधीतच स्वच्छता पुरस्कार, विविध विकासकामे, नागरिकांशी कनेक्टीव्हिटी, नाविन्यपूर्ण संकल्पना व उपक्रम राबवत पनवेल महापालिकेने राज्यात व देशात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. या आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी आणि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाली आहे. कुस्ती, कबड्डी, क्रिकेट अशा खेळांचे संकुल उभे राहत असतानाच नागरिकांच्या आरोग्यासाठी आरोग्य केंद्रांची साखळी निर्माण झाली आहे.
गावांसाठी मैदाने उपलब्ध झाली पाहिजेत यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणातून या विषयावर लक्ष वेधले. 95 गावांची जागा गावठाण सोडून बाकी जागा सिडको संपादित आहे. नागरी सुविधा कामे तसेच प्रत्येक मैदान मिळाले पाहिजे ही माझी व आमदार महेश बालदी यांची मागणी राहिली आहे. त्यामुळे प्रत्येक गावाला सामाजिक कार्यासाठी व खेळांसाठी मैदान सिडकोच्या माध्यमातून मिळाले पाहिजे, अशी आग्रही पुनर्मागणी या वेळी बोलताना त्यांनी केली. वेंगसरकर अकादमीत अनेक प्रतिभावंत खेळाडू निर्माण झाले आहेत; त्याचप्रमाणे पनवेल केंद्रातूनही दर्जेदार खेळाडू तयार होतील, असे सांगताना मंत्री आशिष शेलार आणि क्रिकेट यांचे अतूट नाते आहे. त्यामुळे या प्रशिक्षण केंद्रावरही त्यांचे कायम प्रेम राहणार असल्याचेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधोरेखित केले.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कर्नल दिलीप वेंगसरकर यांनी सांगितले की, या ठिकाणहून जाताना मैदानात वीटभट्टी, रिक्षा ट्रक पार्किंग दिसायची. आमदार प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर, गणेश देशमुख यांना भेटलो आणि या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा विषय मांडला. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पनवेल परिसरात क्रिकेटविषयी खूप प्रतिभा आहे, मात्र टेनिस क्रिकेटवर जोर आहे. तो दूर करून लेदर क्रिकेटवर भर देण्यासाठी आणि येथून प्रतिभावंत खेळाडू निर्माण करण्यासाठी हे प्रशिक्षण केंद्र काम करणार आहे. सुनील गावसकर, सचिन तेंडुलकरनंतर विराट आणि पुढचा कोण तर तो पनवेलमधून खेळाडू असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त करीत युवा खेळाडूंमध्ये स्फूर्ती निर्माण केली.
या ठिकाणी अनेक टूर्नामेंट होणार असून स्थानिक प्रशिक्षक घेणार असल्याचे सांगत वानखेडे स्टेडियम ज्यांनी तयार केले त्या ठेकेदाराकडून हे काम पूर्ण करण्यात आल्याचेही वेंगसरकर यांनी सांगितले तसेच 1 मेपासून या ठिकाणी प्रशिक्षण सुरू होणार असून दोन ते अडीच हजार युवा खेळाडू येतील आणि त्यामधून 80 ते 100 खेळाडू निवडले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांनी सांगितले की, ही अकादमी पांढरा हत्ती ठरेल अशी शंका निर्माण होत होती, पण ती दूर झाली आहे. नुसते रस्ते, गटारे बांधून विकास होत नाही; तर शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक, कला हेपण तितकेच महत्त्वाचे आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सिडकोकडून हा भूखंड सिडकोकडून हस्तांतरित करण्यात आला आणि या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रशिक्षण अकादमी उभी राहून पनवेलच्या नावलौकिकात भर टाकणारे एक केंद्र साकारले गेले आहे.
पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी म्हटले की, तरुण पिढीमध्ये नवभारत घडवण्याची ऊर्जा आहे. योग्य ऊर्जा जर्मनी, जपानसारखे देश निर्माण करतात, तर अयोग्य ऊर्जा तालिबानसारखा देश घडवतो. योग्य ऊर्जेतून भविष्य निर्माण होते. सकारात्मक ऊर्जा घेत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून हे आतंरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र साकारले आहे. त्याचप्रमाणे पनवेल महानगरपालिका हद्दीतील विविध विभागात टेनिस कोर्ट, कबड्डी, कुस्ती, क्रिकेट व इतर खेळांचे क्रीडांगण उभारण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलली जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री आशिष शेलार यांचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळत असते. त्यामुळे विकासकामांसोबतच क्रीडा संस्कृती चांगल्या पद्धतीने जपण्यात येत आहे. आमदार प्रशांत ठाकूर पनवेलच्या विकासासाठी नेहमी दक्ष असतात, तर मंगेश चितळे, गणेश देशमुख यांच्यासारखे चांगले आयुक्त लाभले. म्हणून विकास झपाट्याने झाले असल्याचेही परेश ठाकूर यांनी सांगितले.
प्रास्ताविकात आयुक्त व प्रशासक मंगेश चितळे यांनी सांगितले की, आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून हे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र साकारले आहे. साडेसात एकरमध्ये केंद्र असून यासाठी 14 कोटी 55 लाख रुपये खर्च झाला आहे. 150 मीटर व्यासाचे क्रिकेट मैदान, पॅव्हेलियन इमारत तसेच इतर आवश्यक सुविधा या ठिकाणी आहेत. प्रत्येक वर्षी 10 ते 19 वयोगटातील 101 विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार असून पनवेल महापालिका हद्दीतील 50 टक्के, उर्वरित जिल्ह्यासाठी 25, तर जिल्ह्याबाहेरील 25 टक्के असा कोटा प्रशिक्षणात असणार आहे तसेच या केंद्राचे मेंटेनन्स वेंगसरकर फाऊंडेशनच्या सीएसआरमधून होणार आहे.
या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी महापौर कविता चौतमोल, सौ. वेंगसरकर, भाजपचे ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत, शिवसेनेचे उपनेते बबन पाटील, जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, अॅड. प्रकाश बिनेदार, उपाध्यक्ष जयंत पगडे, शिवसेनेचे प्रथमेश सोमण, माजी उपमहापौर चारुशीला घरत, सीता पाटील, जगदीश गायकवाड, माजी नगरसेवक अनिल भगत, अॅड. मनोज भुजबळ, विकास घरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सुशीला घरत, रूचिता लोंढे, वर्षा नाईक, वृषाली वाघमारे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्ये, उपायुक्त कैलास गावडे, भाजपचे नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंझारराव, तळोजा मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, नेरे मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, आरपीआयचे शहर अध्यक्ष प्रभाकर कांबळे, मुख्य अभियंता संजय कटेकर यांच्यासह खेळाडू आणि क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी प्रशिक्षक, ज्येष्ठ खेळाडू, प्रतिभावंत ज्युनिअर खेळाडू यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

RamPrahar – The Panvel Daily Paper