ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्त
शेकापचे ज्येष्ठ नेते तथा पनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करत पनवेल, उरण, खालापूरसह रायगडमध्ये राजकीय भूकंप केला. लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या पुढाकारातून हा प्रवेश झाला.
उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर हा पक्षप्रवेश सोहळा भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या जल्लोषात झाला. पक्षप्रवेशाची भली मोठी रांग या वेळी लागली होती. त्यामुळे शेकापला मोठा हादरा बसला आहे.
शेकापचे नेते जे.एम. म्हात्रे, प्रितम म्हात्रे यांच्यासोबत शेकाप जिल्हा चिटणीस व माजी नगरसेवक गणेश कडू, उपाध्यक्ष रविशेठ पाटील, वहाळचे माजी सरपंच व ज्येष्ठ नेते पांडुमामा घरत, ज्येष्ठ नेते हरचंदसिंग सग्गू, ज्येष्ठ नेते रघुशेठ घरत, मनुशेठ कांडपिळे, तालुका सहचिटणीस जितेंद्र म्हात्रे, पुरोगामी युवक संघटनेचे उरण तालुका अध्यक्ष रमाकांत म्हात्रे, लाल ब्रिगेड तालुकाध्यक्ष रमाकांत पाटील, प्रकाश जितेकर, माजी नगरसेविका अनुराधा ठोकळ, सुरेखा मोहोकर, प्रिती जॉर्ज-म्हात्रे, अरुणा दाभणे, सारिका भगत, पुष्पलता मढवी, श्वेता बहिरा, कुसुम पाटील, रेणुका मोहोकर, प्रार्थना वाघे, मंजुळा कातकरी, माजी नगरसेवक रवींद्र भगत, सुनील बहिरा, गणेश पाटील, डी.पी. म्हात्रे, आकाश ठोकळ, माजी जिल्हा परिषद सदस्य राजूशेठ पाटील, जीवन म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य पार्वती पाटील, पंचायत समितीच्या माजी सभापती निशा लक्ष्मण ठाकूर, माजी उपसभापती जगदीश पवार, सीमा घरत, भात गिरणी सहकारी संस्था उपसभापती राजेंद्र घरत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संतोष पाटील, करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे, वहाळचे माजी सरपंच बाळाराम पाटील, अरुण दापोलकर, सुनील पाटील, गणेश पाटील, गव्हाणच्या माजी सरपंच माया भोईर, सचिन घरत, एल.एल. पाटील, कोळखे ग्रामपंचायतीच्या सरपंच मिनल म्हात्रे, उषा अजित अडसुळे, कर्नाळा माजी सरपंच सुषमा पाटील, मानघर सरपंच राजेंद्र पाटील, वावेघर सरपंच गीतांजली गाताडे, तुराडे सरपंच रिया माळी, गुळसुंदे उपसरपंच अरुणा पाटील, माजी सरपंच आर.डी. पाटील, गुरुनाथ माळी, सदस्य काव्या जोशी, दीपाली जगताप, अभिजित पाटील यांच्यासह शेकापच्या हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजपत जाहीर प्रवेश केला.
महाविकास आघाडीने शेकापचा घात केला. त्यामुळे रायगडमध्ये शेकापचे अस्तित्व रसातळाला गेले. अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शेकापची साथ सोडत दुसर्या पक्षाची वाट धरली. त्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडून पक्ष वाढवायचा आग्रह जे.एम. म्हात्रे यांनी पक्षश्रेष्ठींकडे केला होता. गेल्या दीड महिन्यापासून त्यांचा पक्षाकडे मागणीचा रेटा राहिला. त्यांनी या संदर्भात मध्यंतरी पक्षाची बैठक घेतली होती. त्या वेळी महाविकास आघाडीतून बाहेर पडा, आपण पक्ष वाढवू, अशा स्पष्ट भाषेत सांगितले, मात्र तरीही त्यांना साथ न देण्याचा पवित्रा पक्षाने घेतला. त्यामुळे जे.एम. म्हात्रे यांनी अखेर आपला निर्णय जाहीर करत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आणि या निर्णयाला त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी साथ दिली. त्यामुळे त्यांचाही विचार लक्षात घेऊन म्हात्रे यांनी भाजप या राष्ट्रीय पक्षात जाण्याचा निर्णय केला.
माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे गेली 48 वर्षे शेकापचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करीत होते. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी ते प्रामाणिकपणे बजवायचे, पण नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत उरण मतदारसंघातून त्यांचे पुत्र प्रितम म्हात्रे यांच्या विरोधात महाविकास आघाडीने काम केले होते. एकेकाळी अभिमानाने राजकारणात असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला मोठी घरघर लागली, पण शेकापच्या नेतृत्वाने ते कधीही मान्य केले नाही. आणि त्यामुळे शेकापच्या नेत्यांना या कारभाराचा कंटाळा आला. पक्ष क्षीण झाला आणि जनाधारही दिवसेंदिवस घटत चालला. मागील महिन्यात जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडितशेठ पाटील, माजी मंत्री स्व. मीनाक्षीताई पाटील यांचे पुत्र व रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ड. आस्वाद पाटील यांनी हजारो समर्थकांसह भाजपत प्रवेश करत अलिबागमध्ये जोरदार धक्का दिला. त्यानंतर काही दिवसांतच पनवेलमध्ये शेकापला मोठा दणका मिळाला. प्रभूदास भोईर यांनी पंधराशे कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. शेकाप या झटक्यातून सावरत नाही तोच जे.एम.म्हात्रे, प्रितम म्हात्रे यांनी पदाधिकारी व हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करून रायगड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. त्यामुळे पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ शेकापवर आली आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धैर्यशील पाटील, आमदार विक्रांत पाटील, माजी आमदार पंडितशेठ पाटील, माजी आमदार सुरेश लाड, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अॅड. आस्वाद पाटील, ’दिबां’चे पुत्र अतुल पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, रवी भोईर, माजी महापौर कविता चौतमोल, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस अॅड. प्रकाश बिनेदार, दीपक बेहेरे, चारुशीला घरत, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, संजय पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, कामोठे मंडळ अध्यक्ष विकास घरत, कळंबोली मंडळ अध्यक्ष अमर पाटील, पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंझारराव, नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, तळोजा मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, नेरे मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, कर्नाळा मंडळ अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उलवे मंडळ अध्यक्ष रूपेश धुमाळ यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
देशाचे कणखर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची, तर राज्याचे कुशल नेतृत्व मुख्यमंत्री फडणवीस राज्याची ताकद आहे. त्यांच्या नेतृत्वात देश आणि राज्य पुढे यशस्वी मार्गक्रमण करत आहे. तळागाळातील कार्यकर्ते, समाज बांधवांच्या समस्याचे निराकरण करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. सन 2047ला आपला देश महासत्ता होणार आहे. त्यात महाराष्ट्राचा वाटा असला पाहिजे यासाठी सन 2028च्या अगोदर तीन ट्रिलियनची अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट देवेंद्रजींनी ठेवले आहे. त्यामुळे महाराष्ट्र आता कोणत्याही क्षेत्रात कमी पडणार नाही. जे.एम. म्हात्रे, प्रितम म्हात्रे यांनी त्यांच्या असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. अशा या पक्षात तुम्ही आज सहभागी झाला आहात याचा निश्चित तुम्हाला अभिमान वाटेल.
-रवींद्र चव्हाण, कार्यकारी अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश भाजप
2004 साली शेकापतून बाहेर पडलो त्याची आठवण देणारा आजचा पक्षप्रवेश आहे. जे.एम. म्हात्रे, प्रितम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते आज भाजपमध्ये सहभागी झाले याचा मला खूप आनंद आहे. रवींद्र चव्हाण यांनी पाठीवर हात ठेवला की, शंभर टक्के विजय होतो. पनवेल महापालिका निवडणुकीच्या वेळी त्यांनी दिशा दिली, मार्ग दिला. आणि त्या ठिकाणी सहज विजय मिळवत सत्ताही मिळाली. रवींद्र चव्हाण यांचे नेतृत्वामध्ये शक्ती आहे कार्यकर्त्यांना तयार करण्याचा उत्साह आहे. जे.एम. म्हात्रे माझे खास मित्र आहे. राजकारणाच्या दृष्टिकोनातून आमची ताटातूट झाली होती. व्यवसायात कधीही राजकारण आणायचे नसते, मात्र आम्ही व्यावसायिक म्हणून काम करत होतो. या प्रवेशामुळे मोठ्या प्रमाणात ताकद वाढली आहे. विरोधकांना आम्हाला बिनविरोध देण्याशिवाय पर्याय नाही. काम करणार त्याला संधी मिळणार आणि या ठिकाणी जुना नवा असा कोणताही भेदभाव नाही. त्यामुळे आगामी निवडणुका जिंकण्याच्या आणि लोकांची सेवा करण्यासाठी कायम सज्ज राहूया.
– लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार
स्व.भगतसाहेबांच्या पुण्यभूमीत आपण वाढलो आहोत. शेकापने मला पदांवर संधी दिली आणि मी पण पक्षवाढीसाठी तन, मन, धनाने काम केले. महाविकास आघाडीने शेकापवर अन्याय केला. त्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडून शेकाप अबाधित ठेवत कार्यकर्त्याना बळ देऊ, अशी पक्षश्रेष्ठींना विनंती केली, मात्र त्यांच्याकडून साफ इन्कार आला. ज्या महाविकास आघाडीने आपल्याला संपवण्याचा घाट केला आहे. त्यांच्याबरोबर राहून कार्यकर्त्यांचेही भले होणार नाही. त्यामुळे मुख्य प्रवाहात काम करण्याचा निर्णय घेतला आणि आज भाजपमध्ये दाखल झालो. शेकापत ज्याप्रमाणे काम केले, त्याप्रमाणे भाजपत आम्ही सक्रियपणे काम करणार असून हे सर्व रामशेठ ठाकूर यांच्यामुळे शक्य झाले.
-उद्योजक जे.एम. म्हात्रे, माजी नगराध्यक्ष, पनवेल नगर परिषद
माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे व्यक्तिमत्व आहेत. भाजप जिल्हात एक नंबरचा पक्ष बनत आहे. खासदार, आमदार, ते सरपंच, लोकप्रतिनिधी तळागाळातील लोकांसाठी काम करत आहेत. 2018 साली रवींद्र चव्हाण रायगडचे पालकमंत्री झाले आणि जिल्ह्यातील एक एक करत निवडणुका जिंकत गेलो. आता प्रत्येक स्तरावर भाजपचे नेतृत्व आहे. कणखर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार जनतेसाठी अग्रेसरपणे काम करत आहे. देशहितासाठी काम करणार्या पक्षात आलो आहोत याचा तुम्हाला नक्कीच समाधान आणि अभिमान वाटेल. पनवेल, उरण, खालापूरमधून तुमच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांच्या या प्रवेशामुळे पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
-आमदार प्रशांत ठाकूर
प्रितम म्हात्रे हे समाजाला जोडले आहेत, तर जे.एम. म्हात्रे पक्षभेद बाजूला ठेवून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सोबतीने काम करत आहेत. आजच्या या प्रवेशाने ताकद वाढली आहे. आजचा पक्षप्रवेश आणि झेंडा देशप्रेमाचा आहे, त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुका शंभर टक्के जिंकणार याची मला खात्री आहे. पक्षात जुना नवा असा कोणताही विचार न करता एकसंघ काम करत राहू या.
-आमदार महेश बालदी
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे विकासाला मोठी गती मिळाली. विकासाचा ओघ लक्षात घेऊन विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा ओढा वाढत आहे. देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष ज्याचे 14 कोटी सदस्य आहेत आणि सर्वात जास्त लोकप्रतिनिधी आहेत. जिल्ह्यात 2014 साली आमदार प्रशांत ठाकूर यांच्या रूपाने पहिला आमदार, त्यानंतर 2019ला त्यामध्ये महेश बालदी यांच्या रूपाने आणखी एक आमदार आणि आता 2024च्या निवडणुकीतून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार रविशेठ पाटील तसेच खासदार म्हणून धैर्यशील पाटील, विधान परिषद सदस्य म्हणून विक्रांत पाटील अशी एकूण लोकप्रतिनिधींची ताकद वाढली आहे. त्यामुळे जगात, राज्यात आणि रायगडमध्येही भाजप क्रमांक एकचा पक्ष आहे.
-अविनाश कोळी, जिल्हाध्यक्ष, उत्तर रायगड जिल्हा भाजप
RamPrahar – The Panvel Daily Paper