समाजभूषण पुरस्काराने सन्मान
पनवेल ः रामप्रहर वृत्त
आपापसात भांडणे केल्याने कोणाचीही प्रगती होत नाही. म्हणून समाजभेद बाजूला ठेवत ‘हम सब एक हे’ हा नारा देऊन आपण सामाजिक कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी हिंदू लोहार समाज पनवेल तालुका सामाजिक विकास मंडळाच्या वतीने आयोजित सर्वसाधारण सभेत केले. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना लोहार समाजाचा समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
हिंदू लोहार समाज मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात ज्येष्ठ समाजबांधव दत्तात्रेय गजानन मोरे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि. 15) झाली. या सभेला ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, माजी विरोधी पक्षनेेते प्रीतम म्हात्रे, समाजाचे अध्यक्ष गणेश राऊत, अण्णासाहेब जोशी, अॅड. युवराज जाधव, सुरेश मांडवगडे, दिलीप वसव, राजेश सोमवंशी, मंडळाचे अध्यक्ष संतोष जाधव, चंद्रकांत भागीवंत, शैलेश जगताप, अविनाश मोरे, शशिकांत दळवी, अजित मोरे, राजेंद्र पायरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव उपस्थित होते.
या वेळी मनोगत व्यक्त करताना हिंदू लोहार समाजाची गरज ओळखून समाज हॉलसाठी जागा घेण्याकरिता लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 25 लाख रुपये, तर ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे यांनी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली.
या वेळी म्हात्रे यांनी, समाजाची जाण ठेवून सर्वांनी काम करावे, असे प्रतिपादन केले, तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपण समाजाचे काही तरी देणश लागतो ही भावना मनात ठेवून हिंदू लोहार समाज मंडळ सामाजिक कार्य करत आहे, असे गौरवोद्गार काढले.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अॅड. युवराज जाधव, मंदार मने, डॉ. सुरूची जोशी, किरण भागवत आणि दिलीप लोहार यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच विद्यार्थी गुणगौरव आणि लोहारकाम करणार्या समाजबांधवांचा सन्मान या वेळी समाजाच्या वतीने करण्यात आला.
RamPrahar – The Panvel Daily Paper