Breaking News

हवाई सुंदरी मैथिली पाटीलला अखेरचा निरोप

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

पनवेल ः रामप्रहर वृत्त
अहमदाबाद येथे नुकत्याच झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेली पनवेल तालुक्यातील न्हावा गावची सुकन्या, हवाई सुंदरी मैथिली पाटील हिच्या पार्थिवावर मंगळवारी (दि. 17) शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्यासह ग्रामस्थांनी मैथिलीला श्रद्धांजली वाहिली. कृष्णभक्त मैथिलीला ’राधे राधे’ असा आवाज देत अखेरचा निरोप देण्यात आला.
12 जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणार्‍या एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला होता, ज्यात सुमारे पावणेदोनशे जणांचा दुर्दैवी अंत झाला. या मृतांमध्ये मैथिली पाटीलचाही समावेश होता. मैथिली ही गेल्या दोन वर्षांपासून एअर इंडियामध्ये एअर होस्टेस म्हणून कार्यरत होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत तिने आपले स्वप्न पूर्ण केले होते. तिच्या यशाने अनेकांना प्रेरणा मिळाली होती.
डीएनए निश्चितीनंतर मैथिलीचे पार्थिव कुटुंबियांकडे सोपविण्यात आले. त्यानंतर मंगळवारी सकाळी न्हावा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मैथिलीला निरोप देताना उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा येत होत्या. या दुर्दैवी घटनेमुळे मैथिलीच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गाव तिच्या आठवणीत हळहळ व्यक्त करत आहे.

आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी वाहिली श्रद्धांजली

मैथिली पाटील हिचा अपघाती मृत्यू ही केवळ तिच्या कुटुंबीयांसाठीच नव्हे, तर संपूर्ण गावासाठी आणि हवाईसेवेतील तिच्या सहकार्‍यांसाठीही एक मोठी दुःखद घटना आहे. ग्रामीण भागातून संघर्ष करत आपल्या कष्टाच्या जोरावर हवाई सुंदरी होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करणे हे खरंच प्रेरणादायी होते. संकटांशी झुंज देत आकाशाला गवसणी घालणारी मैथिली आज आमच्यात नाही यावर विश्वास बसत नाही. तिचे तेजस्वी हास्य, संघर्षमय आयुष्य आणि तिने मिळवलेली यशोगाथा कायम आमच्या आठवणीत जिवंत राहील. सर्व ग्रामस्थ आणि आम्ही मैथिलीच्या कुटुंबाच्या पाठीशी राहू, अशी प्रतिक्रिया आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी श्रद्धांजली अर्पण करताना दिली.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply