Breaking News

वीजदर कपातीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार -भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
राज्यातील सर्व घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक वीज ग्राहकांसाठी वीज दर कमी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी आभार व्यक्त केले.
राज्य सरकारने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू केल्यामुळे साडेसात एचपीपर्यंतचे पंप असलेल्या राज्यातील 45 लाख शेतकर्‍यांना यापूर्वीच सिंचनासाठी मोफत वीज मिळत आहे, असेही त्यांनी या निमित्ताने सांगितले.
अविनाश कोळी यांनी पुढे सांगितले की, माननीय देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या तीन वर्षात राज्याच्या ऊर्जा विभागाची जबाबदारी पार पाडताना ऊर्जा क्षेत्रात मोठे परिवर्तन घडविले. त्यांच्या नेतृत्वात महावितरण या सरकारी वीज वितरण कंपनीने वीज खरेदी करार करताना रिन्युएबल एनर्जीवर भर दिल्यामुळे कंपनीची वीज खरेदी खर्चात फार मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. याचा लाभ वीज ग्राहकांना करून देण्यासाठी महावितरणने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे सादर केलेल्या वीजदर याचिकेमध्ये इतिहासात प्रथमच वीजदर कमी करण्यास परवानगी मागितली. या याचिकेवर विद्युत नियामक आयोगाने बुधवारी निर्णय दिला असून घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्व ग्राहकांच्या वीजदरात आगामी पाचही वर्षात कपात करण्याचा आदेश दिला आहे.
यापूर्वी दरवर्षी विजेचे दर वाढत होते. या पार्श्वभूमीवर प्रथमच विजेचे दर कमी होणार असून आगामी पाच वर्षे प्रत्येक वर्षी त्यात घट होणार आहे. घरगुती वीज ग्राहकांमध्ये 70 टक्के प्रमाण हे 100 युनिटपर्यंत वीज वापरणार्‍या ग्राहकांचे आहे व त्यांच्यासाठीच्या वीजदरात या वर्षी 10 टक्के घट होणार आहे, तर पाच वर्षांच्या अखेरीस त्यांच्यासाठीचा वीजदर 26 टक्के कमी झालेला असेल. 100 ते 300 युनिट वीज वापरणार्‍या वीज ग्राहकांसाठीच्या दरातही कपात होणार आहे. माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महावितरणने आगामी काळात राज्याला किती विजेची गरज पडेल हे ध्यानात घेऊन रिसोर्स डेक्वसी प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार 2030पर्यंत राज्याची विजेची क्षमता 81 हजार मेगावॅट होण्यासाठी 45 हजार मेगावॅटचे वीजखरेदी करार केले आहेत. त्यापैकी 31 हजार मेगावॅट वीज सौर, पवन अशा रिन्युएबल अर्थात नवीकरणीय ऊर्जास्रोतांमधून मिळणार आहे. ही वीज अत्यंत किफायतशीर दरात मिळणार असल्याने महावितरणच्या वीज खरेदी खर्चात खूप मोठी बचत होणार आहे. त्यामुळे महावितरणला वीजदर कपातीचा प्रस्ताव मांडता आला आणि आयोगानेही त्यानुसार आदेश दिला, असे अविनाश कोळी यांनी सांगितले.
भाजपने निवडणुकीच्या वेळी घरगुती ग्राहकांचे वीजदर कमी करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाचे पालन झाले आहे तसेच उद्योगांसाठीच्या वीजदरात कपात केल्यामुळे राज्यात उद्योगांची वाढ होण्यास मदत होईल, असेही अविनाश कोळी यांनी अधोरेखित केले.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply