Breaking News

भाजप कार्यालयाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवा -आमदार प्रशांत ठाकूर

खोपोली : प्रतिनिधी
खोपोली शहरातील गगनगिरी नगर येथील भाजपचे अविनाश तावडे यांच्या; त्याचप्रमाणे साबळे नगर येथील विक्रम साबळे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 5) करण्यात आले. या वेळी बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवावे. केंद्र व राज्य शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहचवून त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, असे सूचित केले.
या कार्यक्रमास माजी आमदार सुरेश लाड, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस दीपक बेहेरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, संपर्क नेते सुनील घरत, जि.प.चे माजी आरोग्य सभापती नरेश पाटील, आत्करगावचे माजी सरपंच संदीप पाटील, खालापूर तालुकाध्यक्ष सनी यादव, विक्रम साबळे, अविनाश तावडे, खोपोली अध्यक्ष राहुल जाधव, अश्विनी अत्रे, विठ्ठल मोरे आदी उपस्थित होते.
आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून विविध पक्षांचे कार्यकर्ते भाजपमध्ये येऊ शकतात. त्यांना सोबत घेऊन पक्ष संघटना वाढीसाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे. आगामी सर्व निवडणुकांमध्ये भाजप एक नंबरचा पक्ष राहणार आहे, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. त्यांनी साबळे कुटुंबियांच्या तीन पिढ्यांनी सामाजिक योगदान दिल्याचेही सांगितले.
माजी आमदार सुरेश लाड यांनी म्हटले की, पक्ष संघटना वाढत आहे. इतर पक्षांतून मोठ्या प्रमाणात पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये येऊ इच्छितात. त्या सर्वांचे आपण स्वागत करू. हे करीत असताना निष्ठावंतांवर अन्याय होणार नाही याची पक्षश्रेष्ठी दखल घेतील.
जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी, मागील खोपोली नगरपालिका निवडणुकीत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वेळ देऊन प्रयत्न केले. त्या वेळेस संघटनात्मक ताकद कमी असल्याने अपयश आले असले तरी या वेळी समीकरणे वेगळी आहे. मागील काळात सुरेश लाड इतर पक्षात होते, परंतु ते आता आपल्या पक्षात असल्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीचा व अनुभवाचा फायदा घेऊन आपण सर्व निवडणुकांमध्ये चांगले यश प्राप्त करू, असा विश्वास व्यक्त केला.
प्रास्ताविकात खोपोली मंडळ अध्यक्ष राहुल जाधव यांनी पक्षाच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश मरागजे यांनी केले. कार्यक्रमानंतर मान्यवरांनी यशवंत साबळे यांच्या काशी स्पोर्ट क्लबला भेट देऊन तेथील कार्याची ओळख करून घेतली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply