Breaking News

पनवेल-उरणच्या पाणीटंचाईवर आमदार प्रशांत ठाकूर यांचा आक्रमक पवित्रा

ऑटोमायझेशनसाठी दोन महिन्यांत निविदा जाहीर करण्याचे मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन

मुंबई ः रामप्रहर वृत्त
पाणीपुरवठा व वितरणासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत सिडकोच्या कारभावर तीव्र नाराजी आणि आक्रमकपणे भावना व्यक्त केल्यानंतर येत्या दोन महिन्यात पाणी वितरणासाठी ऑटोमायझेशनसाठी (स्वयंचलित यंत्रणा) निविदा जाहीर करण्याचे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले असून या निर्देशानुसार कार्यवाही न केल्यास सिडकोच्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे आश्वासन सभागृहात दिले.
सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईमधील पनवेल आणि उरण तालुक्यातील पाणीसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना उपस्थित केली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेधी सूचना मांडताना नागिरकांच्या भावना आक्रमकपणे प्रकट केल्या तसेच सिडको अधिकार्‍यांच्या कारभारावर संताप व्यक्त करत ताशेरे ओढले.
लक्षवेधी सूचनेवर लेखी उत्तरात मोघम उत्तर देण्यात आले होते. त्यामुळे त्याचा उल्लेख करत आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात बोलताना म्हटले की, न्हावाशेवा टप्पा 3, बाळगंगा, हेटवणे, मोरबे या सगळ्या धरणांचा इतिहास जवळपास लेखी उत्तरात दिला आहे. त्यामुळे पुढे बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेधी सूचनेत म्हणाले की, बाळगंगापासून सर्व प्रकल्प आता अर्धवट स्थितीत आहेत किंवा कामे चालू स्थितीत आहेत. आणि यामधून होणार्‍या पाणीपुरवठ्याचा तुडवडा होत राहतो. पाण्याची पाईपलाईन सातत्याने गळत राहते आणि दोन-दोन, तीन-तीन दिवस पाणी बंद केले जाते. खारघर, कामोठे, कळंबोली, पनवेल, उलवे नोड, करंजाडे, द्रोणागिरी या सर्व वसाहतींमध्ये तुडवडा असल्याने सिडकोच्या विरोधात प्रचंड संताप नागरिकांमध्ये आहे. येथील नागरिक मध्यमवर्गीय आहेत आणि कदाचित त्यांच्या कुटुंबातील दोन्हीही व्यक्ती उद्योगधंदा करतात किंवा नोकरीला जातात. अशा वेळेला पाणीच नसेल तर आंघोळ करू शकत नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे या लोकांची चिडचिड व त्यांना संताप होत असतो. ते आपल्या व्यथा आमच्याकडे सतत मांडत असतात, दिवाळीच्या दिवशीही घरात पाणी नाही असे सांगतात.
कितीही मागणी बैठका घेतल्या तरी अधिकार्‍यांवर याचा काहीही फरक पडत नाही. वरिष्ठ अधिकारी या बाबतीत तर पूर्णपणे उदासीन आहेत आणि ते केवळ वेळ मारून नेतात. आम्ही धरण बांधतोय असे सांगतात, मात्र उपाय निघत नाही. लोकांना आज पाणी हवे आहे आणि अधिकारी उद्या येणार आहे असे सांगतात, तर आजच्या दिवशी काय करायचे हा प्रश्न नागरिकांमध्ये असून पाण्याविषयाच्या बाबतीत सिडकोचे पूर्ण आनंद आहे. टाटा कन्सल्ट एजन्सी नेमली गेली. या एजन्सीने काम केले की त्यांनी पैसे खाल्ले, असा सवाल आमदार प्रशांत ठाकूर यांनी करत एअर इंडियाचे झाले तसे येथेही टाटा कन्सल्टची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गेली सहा महिन्यापासून हे टेंडर निघत नाही. मी तर गेल्या वर्षभरापासून मागणी करत होतो. टाटा कन्सल्टन्ट एजन्सीचा अहवाल सिडकोकडे येऊन दीड वर्ष झाले आहे. मग पुढील कार्यवाही का करत नाही. यासाठी सिडकोकडे पैशाची कमतरता आहे का, असा सवालही उपस्थित केला.
सिडको विमानतळ बांधत आहे, कोट्यवधींचे प्रकल्प उभारत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पुढे होणार्‍या वसाहतींचे पाण्याअभावी काय चित्र राहणार आहे, याचीही कल्पना करायला हवी. पाणी वितरणामध्ये पाईपलाईनची दुरूस्ती करणारे, पम्प हाऊस चालविणारे, टँकर पुरवणारे ठेकेदार तसेच अभियंता सर्व मिळून पैसे खातात. यांचे कोट्यवधी रुपयांचे फ्लॅट होतात आणि वरिष्ठ अधिकार्‍यांना याचे काहीही घेणे देणे नाही. पाणी वितरणाच्या बाबतीत ऑटोमायझेशन झाले पाहिजे यासाठी आम्ही मागणी करून करून थकलो, मात्र सिडकोच्या अधिकार्‍यांना याच्याशी घेणे देणे नाही. अधिकारी राहतात त्या ठिकाणी मॅन्युअल चावी फिरवून भरपूर पाणी आणि ठराविक ठिकाणी मात्र पाणीच नाही. त्यामुळे हे बंद करायचे असेल, तर ऑटोमायझेशनशिवाय पर्याय नाही. टँकरची व्यवस्था ही पर्यायी व्यवस्था आहे. खरंतर पाईपलाईनेच पाणी मिळाले पाहिजे आणि त्यासाठी सिडकोने कोट्यवधी रुपये शुल्क इमारतींकडून वसूल केला आहे. सिडकोची व्यवस्था सदोष आहे हे माझे यापूर्वीही बोलून झाले आहे. वसाहती वाढत चालल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेची 90 हजार घरे या वसाहतीमध्ये उभी राहत आहेत. मग त्यांना पाणी कुठून देणार, असा सवालही आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित करत यावरही शासनाचे लक्ष केंद्रित केले.
रोज नवीन इमारत उभी होते आणि पाणी मिळत नाही अशी ओरड नागरिक लोकप्रतिनिधींकडे करतात. त्यामुळे जर आधीच्याच इमारतींना पाणी मिळत नसेल, तर सिडकोने नव्या सीसी, ओसी देणे थांबवले पाहिजे आणि हाच यावरील उपाय आहे. पाणीपुरवठ्यासंदर्भात अधिकार्‍यांनी मंत्री महोदयांना दिलेली उत्तरे ही केवळ अधिकार्‍यांचा वेळकाढूपणा आहे. लोकं संतप्त आहेत याची जाणीव अधिकार्‍यांना नाही. सीसी, ओसी थांबवली तरच त्याची झळ वरिष्ठ अधिकार्‍यांना लागेल. त्यामुळे या बाबतीत शासनाने गंभीर झाले पाहिजे, अशी जोरदार मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी करत नागरिकांच्या भावना विधीमंडळात मांडल्या.
मंत्री उदय सामंत यांनी उत्तर देताना, आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाण्याच्या संदर्भात तीव्र भावना आक्रमपणे मांडल्या आहेत त्याची दखल शासन घेणार असल्याचे सांगितले. काहीही करा, मॅन्युअल प्रणाली बंद करून ऑटोमायझेशनकडे जात नाही तोपर्यंत यावर योग्य पर्याय निघणार नाही असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सूचित केले आहे. सीसी, ओसी थांबवणे संयुक्तिक होणार नाही, मात्र पाण्याची पातळी, पुरवठा, साठवण या संदर्भात बघितल्यानंतर 319 एमएलडी पाण्याचा आपण पुरवठा करीत आहोत. 23 एमएलडीचा फरक आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे. दोन वर्षांत काही प्रकल्प होणार आहेत, मग ते होईपर्यंत पाण्यासाठी थांबायचे का हे त्यांचे म्हणणे सकारात्मक आणि बरोबर आहे. जोपर्यंत पाणी वितरणाचे ऑटोमायझेशन होत नाही तोपर्यंत त्याला पर्याय निघणार नाही. त्यामुळे दोन महिन्याच्या आत या संदर्भातील निविदा जाहीर करण्याचे निर्देश सिडकोला आजच दिले जातील, असे आश्वासन देणार असल्याचे मंत्री सामंत यांनी आश्वासित केले. त्याचबरोबर यामध्ये अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले, तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलणार असल्याचेही त्यांनी या वेळी आपल्या निर्देशात स्पष्ट केले.

सिडकोच्या कारभारावर तीव्र संताप

विकासकामे असो किंवा नागरिकांना भेडसावणारे प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासन दरबारी मांडून नागरिकांना कायम न्याय मिळवून दिला आहे. वेळ पडल्यास त्यांनी लोकांसाठी आपल्या पदाचा विचार केला नाही. आज त्यांनी सभागृहात बोलताना सिडकोच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला, मात्र त्यासोबतच प्रशासनाचा कारभार राहिला, तर लोकप्रतिनिधींना राजिनामा दिल्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी खंत व्यक्त केली. अभ्यासपूर्ण मांडणीत त्यांनी सिडकोच्या अधिकार्‍यांच्या निष्क्रिय कारभाराचे वाभाडे काढले. त्यामुळे एक कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांच्या वतीने मांडलेला आवाज सभागृह ठणकावून गेला. शासनाने त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येत्या दोन महिन्यांत ऑटोमायझेशन निविदा जाहीर होणार असल्याने पाण्याच्या प्रश्नाला वाचा फुटली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात घेतलेल्या आक्रमक भूमिकेचे नागरिकांतून कौतुक होत असून आभारही व्यक्त केले जात आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply