Breaking News

भाजपच्या आक्रमक भूमिकेमुळे पनवेलच्या मालमत्ता करावरील शास्ती माफीची अभय योजना लागू

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भाजपच्या आक्रमक भूमिकेनंतर पनवेलच्या मालमत्ता करावरील शास्ती माफीची अभय योजना लागू करण्यात आली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे नागरिकांची ही दीर्घकालीन मागणी अखेर मान्य झाली आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रातील मालमत्ता करावरील लावलेली शास्ती तातडीने अभय योजना लागू करून रद्द करावी यासाठी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व माजी नगरसेवक गुरुवारी (दि. 17) आक्रमक झाले. महापालिका आयुक्तांच्या दालनासमोरच या पदाधिकार्‍यांनी ठिय्या मांडला. आयुक्तांविरोधात घोषणाबाजी करून जोपर्यंत शास्ती माफीची योजना लागू करत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील अशी ठाम भूमिका महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी घेतल्यामुळे काही काळ पालिकेत तणावाचे वातावरण होते.
दरम्यान, भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेतली आणि 5 वाजेपर्यंत सकारात्मक निर्णय घ्या; अन्यथा ठिय्या आंदोलन सुरूच राहील, असा आक्रमक पवित्रा घेतला. आयुक्त मंगेश चितळे यांनी या संदर्भात शास्ती माफीची योजना लागू करू अशी भूमिका घेतल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले. या वेळी शास्ती माफीची अभय योजना लागू केल्याबद्दल माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आमदार प्रशांत ठाकूर व आयुक्त मंगेश चितळे यांचे आभार व्यक्त केले.
भाजपच्या आंदोलनाला आलेल्या तातडीच्या यशानंतर आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन चार टप्यात होणार्‍या या शास्ती माफीच्या अभय योजनेची माहिती दिली. यामध्ये पहिल्या महिन्यात थकीत कर भरणार्‍यांना 90 टक्के अशी सर्वाधिक शास्ती माफी मिळणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. पुढील दोन महिन्यांत चार वेगवेगळ्या टप्यात ही शास्ती माफीची अभय योजना लागू केली जाणार आहे. आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयामुळे मागील आठ वर्षांपासून पनवेल महापालिकेच्या थकीत 1200 कोटी मालमत्ता कर वसुलीचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
पनवेल महापालिका क्षेत्रात तीन लाख 64 हजार 174 मालमत्ताधारक आहेत. यापैकी साडेतीन लाखांपेक्षा अधिक मालमत्ताधारकांनी कर भरला नाही. यामध्ये सुमारे 1400 कोटी रुपये मालमत्ता कर आणि तो कर थकविल्याने सुमारे 600 कोटी रुपयांची शास्ती (दंड) करधारकांना लावण्यात आला होता. याविषयी जून महिन्यात नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के.एच. गोविंदराज यांच्या मुख्य उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत करावरील शास्तीमाफीचा विषय आयुक्तांच्या अधिकार क्षेत्रात येत असल्याने त्यांनी याबाबत निर्णय घेण्याची सूचना केली होती. महापालिका आयुक्तांनी याविषयी प्रधान सचिवांच्या बैठकीचे इतिवृत्त व निर्देश प्राप्त झाल्यावर शास्ती माफीची अभय योजना लागू करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आग्रही भूमिका मांडली होती. सर्वोच्च न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयातसुद्धा याचिका दाखल झाल्याने न्यायालयाकडून कोणताही दिलासा पनवेलच्या मालमत्ता करधारकांना मिळू शकला नाही. विरोधी पक्ष विशेषत्वाने शिवसेना ठाकरे गट नेत्या म्हणणार्‍यांनी यामध्ये राजकारण केले. आणि त्यातून निवडणुकीत स्वतःच्या पदरात मते पाडून घेतली. नागरिकांना भडकविण्याचे काम केले. न्यायालयातील याचिकांचा दाखला देत टॅक्स न भरण्याचे आवाहन करत नागरिकांना कर भरण्यास रोखले.
आयुक्तांनी करधारकांना दिलासा देताना एकवेळची विशेष बाब म्हणून ही अभय योजना आणत असल्याचे स्पष्ट केले. जे नागरिक 18 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत कर भरतील अशांना 90 टक्के शास्ती माफी दिली जाणार आहेे तसेच 16 ते 31 ऑगस्टपर्यंत कर भरणार्‍यांना 75 टक्के, तर 1 ते 10 सप्टेंबरपर्यंत कर भरणार्‍यांना 50 टक्के शास्ती माफी आणि 11 ते 20 सप्टेंबरदरम्यान कर भरणार्‍यांना यांना 25 टक्के शास्ती माफी केली जाईल, असेही आयुक्तांनी सांगितले.
शास्तीमाफीच्या काही प्रश्न करदात्यांचे असल्यास महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग कार्यालयात व करसंकलन केंद्रात नागरिक संपर्क साधू शकतील. सर्वाधिक थकीत कराची रक्कम आणि शास्तीची रक्कम औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांची आणि व्यावसायिकांची आहे. त्यामुळे या निर्णयाचा निवासी वापर करणार्‍या करदात्यांसोबत कोट्यवधी रुपयांची शास्ती माफी वाणिज्य व उद्योजकांची होणार आहे.

आमदार प्रशांत ठाकूर यांची महत्त्वपूर्ण भूमिका

आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी स्पष्ट मागणी केली की, महापालिका हद्दीत पालिकेने लावलेला कर हा जुलमी आहे आणि त्यावर लावलेली शास्ती हीदेखील जुलमी आहे. पालिका मालमत्ता कर माफ करू शकत नसेल, तर मालमत्ता करावर लावलेली शास्ती शंभर टक्के माफ करावी. शास्ती आज माफ न झाल्यास सायंकाळी 5नंतर पालिकेच्या गेटवर बसून आंदोलन करून कोणत्याही कर्मचार्‍याला किंवा अधिकार्‍याला बाहेर पडू देणार नाही, असा इशाराही त्यांंनी दिला होता. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या इशार्‍यानंतर पनवेल महापालिकेने अखेर मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये सवलत देणारी अभय योजना जाहीर केली.

पनवेल महापालिकेच्या अ‍ॅपमधून नागरिकांनी कर जमा केल्यास शास्ती माफीच्या योजनेसोबत दोन टक्के सवलतसुद्धा मिळू शकेल. त्यासाठी नागरिकांनी पनवेल कनेक्ट अ‍ॅपच्या माध्यमातून कर जमा करावा. शास्ती माफीची ही अंतिम अभय योजना ही यापुढे राबविली जाणार नाही. यामुळे संबंधित योजनेचा सर्वाधिक करदात्यांना लाभ घ्यावा. एकरकमी सर्व थकीत कर भरल्यास या योजनेचा लाभ नागरिक घेऊ शकतील तसेच चालू आर्थिक वर्षातील कर देयकाचा भरणा केल्यास चालू कर देयकावर पाच टक्के सूट नागरिकांना मिळू शकेल.
-मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महापालिका

Check Also

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला आमदार प्रशांत ठाकूर यांचे जोरदार समर्थन

विधीमंडळ सभागृहात जाहीर केला पाठिंबा मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यात जबदस्तीने किंवा प्रलोभनाव्दारे धर्मांतर रोखण्यासाठी सरकारने …

Leave a Reply