Breaking News

राजेश खन्ना आणि असरानी यांच्या मैत्रीची गोष्ट…

चित्रपटसृष्टीतील मैत्रीच्या नात्याचा रंग काही वेगळाच. राज कपूर आणि राजेंद्रकुमार यांच्यातील मैत्री कायमच चर्चेत असे. मला आठवतंय वांद्रे येथील पाली हिलवरील राजेंद्रकुमारच्या डिंपल बंगल्यातील मिनी थिएटरमध्ये एखाद्या चित्रपटाच्या ट्रायल शोला पाऊल टाकताच राज कपूरची मोठीच फोटो फ्रेम लक्ष वेधून घेत असे…
राजेंद्र कुमार आणि सुनील दत्त यांचीही अशीच घट्ट मैत्री. राजेंद्रकमारचा मुलगा कुमार गौरव याचा विवाह सुनील दत्तची मुलगी नम्रता हिच्याशी झाला आणि ही मैत्री नात्यात बदलली.
रणजित व डॅनी डेन्झोप्पा यांच्यातही छान मैत्री आहे. आजच्या डिजिटल युगात ते एकमेकांना व्हॉट्सअ‍ॅपवर एखादा विनोद वा फोटो पोस्ट करीत असतात आणि दोघांनाही छान रिलीफ मिळतो.
अशा मैत्रीत आणखी एक मैत्री आहे…
ते दिवस वेगळे होते, चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शकाने आपले दृश्य ओके म्हणताच त्याच दिग्दर्शकाचा चौथा वा पाचवा सहाय्यक दिग्दर्शक बोलवायला येईपर्यंत आपल्याच विश्वात रममाण होण्याचे नव्हते. आजच्या युगात सांगायचे तर दिग्दर्शक कट असे म्हणताच व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, फेसबुकच्या विश्वात हरवून जाण्याचे नव्हते. आज तेच तर चाललंय. कलाकारांमधील संवाद हरवलाय. मैत्री दूरच. सेटवरच गप्पांची मैफल जमे, लंच ब्रेकमध्ये सेटवर अथवा सेटबाहेर टेबल लागे. मला आठवतंय, वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओतील जे.ओम प्रकाश दिग्दर्शित आखिर क्यो (1985) या चित्रपटाच्या सेटवर आम्हा सिनेपत्रकारांना शूटिंग रिपोर्टिंगसाठी आमंत्रित करण्यात आले होते. सेटवर राजेश खन्ना व असरानी यांच्यात काही महत्त्वाची दृश्य चित्रित करण्यात येत ह़ोती. साधारण दोन वाजता तेव्हाचा राजेश खन्नाचा सेक्रेटरी अच्छा आनंद सेटवर आला आणि नजरेनेच खाना रेडी है, असे राजेश खन्नाला कळवताच दिग्दर्शक जे. ओम प्रकाश म्हणाले, चलो खाना खाते है म्हणताच सेटवरील दिवे बंद झाले आणि आम्ही सगळेच मेहबूब स्टुडिओच्या बाहेरील हिरवळीवर आलो.
एका बाजूला आम्ही सिनेपत्रकार, तर दुसरीकडे एका मोठ्या टेबलावर राजेश खन्नाच्या घरून आलेला अनेक प्रकारच्या व चवीच्या शाकाहारी व मांसाहारी पदार्थांची भरपूर रेलचेल असलेला डबा. राजेश खन्नाने सर्वप्रथम एक मोठी प्लेट असरानीला दिली, मग एका मोठ्या ताटात काही पदार्थ आमच्याकडे पाठवले आणि मग स्वतः सॅलड घेतले… त्याचा हा गुण महत्त्वाचा. हे सेटवर भटकंती भेटीगाठी निरीक्षण करीत असलेल्या सिनेपत्रकारांनी अनुभवलाय. असरानीच्या निधनाचे वृत्त समजताच मला हा आठवणीतील क्षण पटकन डोळ्यांसमोर आला.
हिंदी चित्रपटसृष्टीत राजेश खन्नाचे असे जवळचे मित्र कायमच चर्चेत राहिले. संगीतकार राहुल देव बर्मन राजेश खन्नाचा अतिशय खास मित्र. सत्तरच्या दशकात राहुल देव बर्मन अन्य एखाद्या निर्माता, दिग्दर्शक वा नायकाच्या चित्रपटासाठी गीत संगीताच्या सिटीगसाठी बसत असे तेव्हा सुचलेल्या काही अतिशय चांगल्या चाली राजेश खन्नाच्या चित्रपटासाठी बाजूला काढत असे. हा बहुचर्चित किस्सा आहे. किशोरकुमारही राजेश खन्नाचा असाच खास मित्र. म्हणून तर राजेश खन्ना चित्रपट निर्मितीत उतरला असता त्याचा पहिला चित्रपट शक्ती सामंता दिग्दर्शित अलग अलग या चित्रपटातील एक गाणे किशोरकुमार चक्क फुकट गायला. किशोरकुमारच्या लहरीपणाच्या किश्यात हा वेगळाच किस्सा. शक्ती सामंता, रुपेशकुमार, असरानी हे राजेश खन्नाचे आणखी काही जवळचे मित्र.
असरानीच्या मित्रामध्ये एकेकाळी जितेंद्र, ऋषी कपूर, राकेश रोशन आणि रणजित हेदेखील होते. ऐंशीच्या दशकात कधी यातील तिघे, तर कधी चौघे एकाच चित्रपटात हमखास दिसतील. त्या काळात एकमेकांची नावे सुचविली जात. निकोप आणि सशक्त वातावरण होते. त्याच वातावरणात राजेश खन्ना व असरानी यांच्यात संबंध वाढत वाढत गेले आणि व्यावसायिक पातळीवरून व्यक्तीगत नातं निर्माण झालं. त्यातूनच एकमेकांसोबत
काम करताना सहजता यैते. दृश्यदेखील खुलते.
असरानीने राजेश खन्नाला सर्वप्रथम पाहिले ते आपल्या सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात. पुणे शहरातील दूरदर्शन व चित्रपट प्रशिक्षण वर्गात पदवी अभ्यासक्रम करीत असतानाच असरानी मुंबईत येऊन एकेका संधीसाठी हिंदी चित्रपटसृष्टीचे दरवाजे ठोठावत होता. अशातच राजेश खन्नाची भूमिका असलेल्या राज खोसला निर्मित व दिग्दर्शित दो रास्ते (1969) या चित्रपटाचा दक्षिण मुंबईतील मेट्रो चित्रपटगृहात प्रीमियर होता. त्यांच्या काही आठवड्यांपूर्वीच शक्ती सामंता निर्मित व दिग्दर्शित आराधना (1969) प्रदर्शित होऊन सुपरहिट हाऊसफुल्ल गर्दीत सुरू होता. रॉक्सी चित्रपटगृहात आराधना एकदम जोरात सुरू असतानाच पलिकडच्याच फूटपाथवरील ऑपेरा हाऊस चित्रपटगृहात दो रास्ते प्रदर्शित करण्यात व्यावसायिक धाडस होते. याचा प्रीमियर मेट्रो चित्रपटगृहात असताना असरानीने राजेश खन्नाच्या जबरदस्त क्रेझचा अनुभव घेतला. राजेश खन्नाच्या स्वागतासाठी युनायटेड मोशन पिक्चर्सचे नऊ निर्माते दिग्दर्शक राजेश खन्नाच्या स्वागतासाठी मेट्रोच्या प्रवेशद्वारावरच होते. त्यात बी.आर. चोप्रा, जी.पी. सिप्पी, चेतन आनंद, नासिर हुसैन, शक्ती सामंता, जे.ओम प्रकाश, मोहनकुमार, सावनकुमार अशा त्या काळातील बड्या निर्मात्यांचा समावेश होता. असरानीसाठी हा एकूणच अनुभव रोमांचक होता. मेट्रोला राजेश खन्नाच्या असंख्य चाहत्यांचा गराडा पडला होताच आणि त्यात हे बडे निर्माते होते. ‘दो रास्ते’चे दिग्दर्शक राज खोसला आणि नायिका मुमताज अगोदरच आले होते. एकूणच उत्साहजनक गर्दीतून वाट काढत काढत पडद्यासमोर पोहचायला राजेश खन्नाला तब्बल चाळीस मिनिटे लागली. हा प्रीमियर खूप गाजला. असरानीच्या मनावर हा अनुभव कायमचा कोरला गेला.
हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘बावर्ची’ (1972)मध्ये असरानीला पहिल्यांदा राजेश खन्नासोबत काम करण्याची संधी मिळाली. हृषिकेश मुखर्जी यांच्या गुड्डी (1971)मध्ये काम करताना असरानीने हृषिकेश मुखर्जीचा विश्वास संपादन केला होता. चित्रपटसृष्टीतील ही गोष्ट खूप महत्त्वाची. ‘बावर्ची’च्या सेटवर दुर्गा खोटे, हरिंद्रनाथ चटोपाध्याय, राजेश खन्ना, उषा किरण, जया भादुरी, ए.के. हनगल असे अनेक तगडे कलाकार होते. असरानी तुलनेत नवखा होता. आता प्रत्यक्ष सेटवर तो राजेश खन्नाच्या वागण्याचा अनुभव घेत होता. असरानीला त्याने फारसे जवळ येवू दिले नाही. या चित्रपटाच्या सेटवर सतत कोणीना कोणी चाहते राजेश खन्नाला भेटायला येत. चित्रीकरण न थांबवता अथवा त्यातून मार्ग काढत काढत राजेश खन्ना त्यांना भेटतोय, त्यांना स्वाक्षरी देतोय, कोणी छोटासा कॅमेरा घेऊन येई, त्यांच्यासोबत फोटो काढत असे. याचा त्यांना भरभरून आनंद मिळत असे हे असरानीने प्रत्यक्षात अनुभवले. राजेश खन्नाचे हे एक प्रकारचे आपल्याला देणे आहे असे असरानी मानत असे.
असरानीला त्यानंतर राजेश खन्नाची भूमिका असलेल्या अनेक चित्रपटांत सातत्याने संधी मिळाली आणि तो राजेश खन्ना व डिंपल यांच्या अगदी निकटवर्तीय झाला. इतका की त्यांच्या थट्टामस्करीतही सहभागी होत असे. चित्रपटाच्या सेटवर एकत्र जेवण करीत असत. एकमेकांची आवडनिवड माहीत झाली होती.
राजेश खन्नाची भूमिका असलेल्या नमक हराम, अजनबी, प्रेम नगर, रोटी, अमरदीप, छैला बाबू, मेहबूबा, धरमकाटा, नौकरी, पल को की छाव मे, बंदीश, अगर तुम न होते, आज का एमएलए रामअवतार, आखिर क्यो, नया कदम इत्यादी चित्रपटांत असरानीची लहान मोठी भूमिका आहे. त्यात रंगत आली ती हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित नमक हराम (1973) या चित्रपटातील कामगार वस्तीतल्या होळीच्या दिवशी भांग पिणे, हे दोघं आणि इतरांनी (रेखा इत्यादींनी) रंगत आणणे, नदीया से दरीया, दरिया से सागर हे त्याच नशेतील गाणे तसेच आणखी काही सुख
दुःखाचे प्रसंग, मै शायर बदनाम मै चला हे गाणं अशा अनेक प्रसंगांत राजेश खन्ना व असरानी एकत्र आहेत. चित्रपटसृष्टीतील काही जमलेल्या जोडीतील ही एक उल्लेखनीय मैत्रीची जोडी.

  • दिलीप ठाकूर, चित्रपट परिक्षक

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply