Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रयतेसाठी सर्वस्व अर्पण केले

रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे गौरवोद्गार

सातारा : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक आणि जनकल्याणकारी कार्यात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले असून त्यांनी रयतेसाठी आपले सर्वस्व अर्पण केले आहे, असे गौरवोद्गार रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी शनिवारी (दि.१३) येथे व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य, थोर दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अमृत महोत्सवी भव्य सत्कार सोहळा आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या ‌‘रयत‌’च्या वतीने सातारा येथील जिल्हा सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार बोलत होते.
मोठ्या उत्साहात, दिमाखदार वातावरणात झालेल्या या सोहळ्यात खासदार शरद पवार यांच्या हस्ते लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर यांचा मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन हजारोफ्लच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, जनरल बॉडी सदस्य, विविध शाखांचे प्रतिनिधी, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, आणि शिक्षणप्रेमी, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्याला प्रमुख मान्यवर म्हणून रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड.भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, खासदार नितीन पाटील, प्रमुख वक्ते ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, आमदार विश्वजित कदम, लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे पुत्र आमदार प्रशांत ठाकूर आणि नगरसेवक परेश ठाकूर, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार प्रभाकर देशमुख, कर्मवीर विद्यापीठाचे कुलगुरू ज्ञानदेव म्हस्के, सहसचिव शिवलिंग मेनकुदळे, उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, जनरल बॉडी सदस्य जे.एम. म्हात्रे, महेंद्र घरत, वाय.टी. देशमुख आणि ठाकूर कुटुंबीयांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
खासदार शरद पवार यांनी पुढे बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जीवनप्रवासाचा आणि समाजासाठी केलेल्या कार्याचा विशेष उल्लेख केला. जीवनातील प्रत्येक टप्प्यावर त्यांनी उत्कृष्ट कार्य करून समाजात वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे सांगत रामशेठ ठाकूर यांच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. रायगड जिल्ह्याच्या विकासात तसेच रयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीत रामशेठ यांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. लोकांच्या समस्या समजून घेऊन त्यांची तत्परतेने सोडवणूक करण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
ज्ञानदानाची कवाडे सर्वसामान्यांसाठी खुली व्हावीत, शिक्षणाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचावा, या ध्येयाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मोठे कार्य उभे केले आहे. रयत शिक्षण संस्थेत शिक्षण घेऊन त्यांनी आपल्या कर्तृत्व, परिश्रम आणि दूरदृष्टीच्या बळावर यश संपादन करत हजारो हातांना सन्मानाने रोजगार व आधार दिला असल्याचेही खासदार पवार यांनी सांगितले.
रयत शिक्षण संस्थेच्या विविध उपक्रमांमध्ये कोणतीही अपेक्षा न ठेवता लोकनेते रामशेठ ठाकूर सातत्याने योगदान देत असतात. समाजातील गरजू, विद्यार्थी, शैक्षणिक संस्था आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख असल्याचे गौरवोदगार खासदार पवार यांनी काढले. रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचा सन्मान करण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना समाजासाठी त्यांचे योगदान प्रेरणादायी असून भावी पिढ्यांसाठी ते आदर्श असल्याचे ते आवर्जून म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी, शिक्षक, आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार मानले. गेल्या ५२ वर्षांपासून आपण रयत शिक्षण संस्थेमध्ये घडत आलो असून या संस्थेनेच आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार दिला, असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. मिळालेल्या प्रेमाने आणि सन्मानाने आपण भारावून गेलो असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. रयत शिक्षण संस्थेशिवाय आपला एकही दिवस जात नाही, असे सांगताना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांची आणि शिकवणीची प्रेरणा आयुष्यभर मार्गदर्शक ठरल्याचे त्यांनी नमूद केले तसेच संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून ते कायम पाठीशी उभे राहिल्याचे सांगितले.
यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ज्येष्ठ विचारवंत एन.डी. पाटील, प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दि.बा. पाटील आणि कष्टकऱ्यांचे द्रष्टे नेते जनार्दन भगत यांच्या आठवणींना उजाळा दिला तसेच आपण रयत शिक्षण संस्था संचलित छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये ‌‘कमवा व शिका‌’ योजनेत शिक्षण घेतले असून या महाविद्यालयानेच आपल्या आयुष्याला नवी दिशा दिली. हेच महाविद्यालय आपल्या जीवनातील टर्निंग पॉईंट ठरल्याचे सांगितले.
आयुष्यात अनेक पुरस्कार मिळाले, मात्र रयत शिक्षण संस्थेकडून प्रदान करण्यात आलेला ‌‘रयत माऊली पुरस्कार‌’ हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि सन्मानाचा पुरस्कार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. आई-वडील आणि शिक्षकांचे संस्कार व मार्गदर्शन लाभल्यामुळेच स्वतःला सामाजिक कार्यासाठी वाहून घेता आले, असेही त्यांनी म्हटले.
“मी घडलो असलो तरी माझे घडणे अजून संपलेले नाही. रयतशिवाय राम घडला नसता,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच रयत शिक्षण संस्थेच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर राहू, अशी ग्वाही देत आपल्या भाषणाचा समारोप केला.
अध्यक्षीय भाषणात रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जीवन प्रवासाचा आणि अफाट कार्याचा आढावा मांडला. त्यांनी पुढे म्हटले की, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यावर विशेष प्रेम असून त्यांच्या समाजाभिमुख कार्यामुळेच रयत शिक्षण संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्याच्या सूचना पवारसाहेबांंनी दिल्या होत्या. आजचा हा सोहळा म्हणजे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याप्रती व्यक्त करण्यात आलेला आदर आणि कृतज्ञतेचा भाव असल्याचे त्यांनी नमूद केले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांची जडणघडण, त्यांचे सामाजिक कार्य आणि जनसेवा सर्वश्रुत असल्याचे सांगत दळवी म्हणाले की, आज सकाळी त्यांनी सहकुटुंब व शेकडो हितचिंतकांसह स्वतः शिक्षण घेतलेल्या महाविद्यालयाला आणि परिसराला भेट देऊन तेथील आठवणींना उजाळा दिला तसेच कर्मवीरांच्या समाधीस्थळाला अभिवादन केले. रयत शिक्षण संस्थेबद्दल त्यांच्या मनात असलेल्या प्रेमाची ही मोठी साक्ष असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या घरी दररोज शेकडो लोक मदतीच्या अपेक्षेने येतात आणि कोणीही रिकाम्या हाताने परत जात नाही, हीच त्यांच्या जीवनकार्याची खरी ओळख असल्याचे दळवी यांनी सांगितले. रयत शिक्षण संस्थेसाठी त्यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय असून त्यांनी दिलेल्या शेकडो कोटी रुपयांच्या देणग्यांचा हिशोब ठेवणेही कठीण असल्याची प्रांजळ कबुली त्यांनी दिली.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शिक्षण, समाजकारण आणि लोकसेवा या क्षेत्रांत केलेले कार्य अफाट असून त्यातून त्यांनी मोठा नावलौकिक मिळविला आहे. कर्मवीर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांवर त्यांचा विश्वास असून त्या विचारांचा वारसा त्यांनी आपल्या कार्यातून जपला आहे, असे गौरवोद्गार दळवी यांनी यावेळी काढले.
आमदार विश्वजित कदम यांनी आपल्या मनोगतात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या दातृत्वपूर्ण कार्याचा गौरव करताना. “दातृत्वाचे मोठे आणि पहिले नाव म्हणजे लोकनेते रामशेठ ठाकूर,” असे गौरवोद्गार काढले. छत्रपती शिवाजी महाराज आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आदर्शांचा वारसा जपत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी समाजकारण आणि शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी समाजासाठी केलेले कार्य कोणत्याही शब्दांत मोजता येणार नाही. विशेष म्हणजे त्यांच्या दातृत्वाला आजही पूर्णविराम लागलेला नाही. गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करण्याची त्यांची वृत्ती आणि मनाचा मोठेपणा हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खरे वैशिष्ट्य असल्याचे कदम यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नावाने विमानतळाचे नामकरण व्हावे यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घेतलेल्या पुढाकाराचाही विशेष उल्लेख केला तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर आणि त्यांचे वडील पतंगराव कदम हे दोघेही रयत शिक्षण संस्था परिवारातील विद्यार्थी व पदाधिकारी असून त्यांच्यात जिव्हाळ्याचे मैत्रीपूर्ण संबंध होते, अशी आठवण त्यांनी सांगितली.
“मी जेव्हा रामशेठ ठाकूर यांच्या पाया पडतो, तेव्हा विधायक कार्य करण्याची नवी ऊर्जा मिळते. त्यामुळे हा केवळ त्यांचा अमृत महोत्सव नसून जनतेच्या प्रेमाचा आणि कृतज्ञतेचा लोकोत्सव आहे,” अशा भावनिक शब्दांत आमदार विश्वजित कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले थोर विचारवंत आणि ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा जीवनप्रवास आपल्या मनोगतातून विस्तृतपणे मांडला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांची वाटचाल मांडताना अनेक उदाहरणे आणि किस्से सांगत एकप्रकारे जीवनपट त्यांनी अधोरेखित केला. ‌‘रयत‌’च्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे लोकनेते रामशेठ ठाकूर हे आहेत, असे त्यांनी नमूद केले.
उपस्थित मान्यवरांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांचे योगदान भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. रयत शिक्षण संस्थेच्या इतिहासात हा सोहळा एक संस्मरणीय पर्व ठरले असून लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे शिक्षण, समाजकारण आणि दानशूरतेतील कार्य पुढील अनेक वर्षे प्रेरणास्रोत राहील, अशी भावना या सोहळ्यातून अधोरेखित झाली.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विक्रमाचे पनवेलमध्ये जल्लोषात स्वागत

नेहरूंना मागे टाकत सलग सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय लोकशाहीच्या इतिहासात १० जून …

Leave a Reply