Breaking News

लगान @२५ वर्षे; क्लासिक चित्रपट, ऑस्करला नामांकन…

काळ १८९३चा. म्हणजे आपल्या अखंड हिन्दुस्थानचा. दीडशे वर्षांपूर्वीचा…
स्थळ आपल्या देशातील मध्य भागातील चंपानेर हे अतिशय दुर्गम भागातील रखरखीत उन्हाचे खेडेगाव. या खेड्यात जे पिकतेय ते विकले जाऊन गरीब शेतकऱ्यांची गुजरण सुरू आहे. अशातच एका वर्षी पाऊस खूपच लांबला आहे, शेतकरी आकाशाकडे डोळे लावून आहे, सुका दुष्काळ पडला आहे. पाऊस यावा यासाठी सगळे गावकरी मिळून प्रार्थना करतात. उत्पन्न नाही आणि अशातच शेतसारा (लगान) भरण्याची वेळ येते. तो भरायचा कसा हा मोठाच प्रश्न. इंग्रजकालीन काळ आहे. गावाबाहेर राहत असलेले इंग्रज क्रिकेट शौकीन आहेत. त्यांचा तो चेंडू फळीचा खेळ पाहून खेडूत अचंबित होतात. त्यांच्यासाठी हे सगळे कुतुहल निर्माण करणारे असते, पण याच इंग्रजांना क्रिकेट सामन्यात पराभूत केले तर त्यांना शेतसारा अर्थात लगान माफ केला जाईल असे इंग्रज अधिकारी सांगतो. ज्या खेळाची आपणास फारशी माहिती नाही तो खेळ आत्मसात कसा करायचा आणि या खेळात पारंगत असलेल्या इंग्रज संघाला पराभूत कसं करावं असा खेडुतांना प्रश्न असतो. यष्टी म्हणजे काय हेही त्यांना माहीत नाही, पण त्यांचा म्होरक्या भुवन (आमिर खान) हे आव्हान स्वीकारायचे ठरवतो. चेंडू फळीचा कसलाच अनुभव नसलेल्या एकेका शेतकऱ्याला हा खेळ समजावून सांगणे, त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, त्याचा न्यूनगंड घालवणे, क्रिकेट खेळाची गोडी निर्माण करणे आणि या सगळ्यातून अकरा जणांचा क्रिकेट संघ तयार करणे या कामात भुवन स्वतःला झोकून देतो. आपल्या खेड्यातील खेडूताचा क्रिकेट संघ तयार करतो आणि मग हे खेडूत आणि इंग्रजांचा संघ असा क्रिकेट सामना रंगतो….
आमिर खान प्रॉडक्शनच्या आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’ या चित्रपटाचे हे मध्यवर्ती कथासूत्र. १५ जून २००१ रोजी हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला, त्याला पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. मुंबईत या चित्रपटाचे मुख्य चित्रपटगृह इरॉस हे होते. याच चित्रपटाच्या स्पर्धेत झी सिनेमा निर्मित आणि अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर एक प्रेमकथा’ हाही चित्रपट प्रदर्शित झाला. स्पर्धा जोरात होती. दोन्ही देशभक्तीवरील चित्रपट. ‘लगान’ एक काल्पनिक कथा, पण काय सांगावे, त्या काळात देशाच्या कोणत्या तरी भागात, गावात अशा पध्दतीने संघ रचना करून एकोप्याने इंग्रजांना पराभूत केले गेले असावे. खरंच असं घडलं असावं असा विश्वास हा चित्रपट पाहताना होतो हे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर याचे यश. गदर एक प्रेमकथा हा १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी झाली त्यावरचा रक्तरंजित जोरदार शोरदार चित्रपट. दोन्ही देशभक्तीवरील चित्रपट आणि दोन्ही चित्रपटांना घसघशीत यश प्राप्त झाले. असा शुक्रवार सिनेमावाल्याना कायमच सुखावतो.
या चित्रपटाच्या निर्मितीची प्रक्रिया अगदी वेगळी. तशी ती जवळपास प्रत्येक चित्रपटाची वेगळीच असते. तो एका पुस्तकाचा अथवा. मालिकेचा विषय आहे.
आशुतोष गोवारीकरच्या दिग्दर्शनातील पहला नशा (१९९३) आणि बाजी (१९९५)नंतरचा हा चित्रपट. मुळात तो अभिनेता. मराठी व हिंदी चित्रपटातून भूमिका साकारत असतानाच त्याने दिग्दर्शनात पाऊल टाकले. ‌‘लगान‌’ची तयारी सुरू करण्यापूर्वी त्याने हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एक अभ्यासपूर्ण नजर टाकताना त्याच्या लक्षात आले, ग्रामीण जीवनावरील चित्रपट जनसामान्यांना जास्त भावतात. उदाहरणार्थ, चित्रपती व्ही शांताराम दिग्दर्शित दो आँखें बारह हाथ, बिमल रॉय दिग्दर्शित दो बिघा जमीन, नितीन बोस दिग्दर्शित गंगा जमुना, मेहबूब खान दिग्दर्शित मदर इंडिया, बी. आर. चोप्रा दिग्दर्शित नया दौर. वगैरे वगैरे. आशुतोष गोवारीकरने निर्णय घेतला आपल्या चित्रपटाची कथा ग्रामीण भागात घडेल. त्यातून त्याला ‘लगान’ चे कथासूत्र सुचलं. त्याने सर्वप्रथम ते आमिर खानला ऐकवलं, पण त्याला ते फारसं आवडलं नाही. म्हणून आशुतोष गोवारीकर शाहरुख खानला भेटला. शाहरुखने या चित्रपटातील भुवन साकारावा अशी आशुतोष गोवारीकरची इच्छा होती, पण त्याला हे कथानक फारसं काही आवडलं नाही. आशुतोषने कथा विस्तार करत पुन्हा आमिर खानची भेट घेतली आणि आमिर खानने होकार दिला. खरंतर आमिर खान आपले पिता ताहिर हुसैन यांच्या टी.व्ही. फिल्म या बॅनरखाली ‘लगान’ निर्माण करू शकला असता (ताहिर हुसैन यांनी रघुनाथ झालानी दिग्दर्शित अनामिका, राजा ठाकूर दिग्दर्शित जख्मी अशा अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे), पण त्याने आमिर खान प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेची स्थापना केली आणि लगानच्या निर्मिती प्रक्रियेची बहुस्तरीय सुरुवात झाली. सर्वप्रथम पटकथा संवाद लेखन, मग विषयानुसार चित्रीकरणाचे स्पॉट आणि आमिर खानची नायिका आणि अन्य कलाकारांची निवड. ते अनेक आहेत.
आमिर खानची नायिका कोण हा फार महत्त्वाचा झालेला प्रश्न. बरेच दिवस रानी मुखर्जीचे नाव चर्चेत होते. विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘गुलाम'(१९९८) मध्ये ही जोडी छान जमली, शोभली आहे आणि पिक्चर सुपर डुपर हिट ठरल्याने रानी मुखर्जीला नवीन ऑफर येणं अगदी स्वाभाविक. ‘लगान’ साठी भरपूर तारखा द्यायला हव्यात. ते कसं जमणार? आणि बरेच दिवस चित्रीकरण आहे म्हटल्यावर आघाडीची अभिनेत्री मिळणं अवघड. त्यापेक्षा नवीन चेहरा निवडला तर? ग्रेसी सिंगची निवड करण्यात आली. तिने तोपर्यंत एखाद्या मालिकेत आणि हम आपके दिल में रहते है (१९९९) या चित्रपटात छोटी भूमिका साकारली होती. आमिर खानची नायिका ही तिच्यासाठी मोठीच संधी.
कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी गुजरात राज्यातील कच्छ भागात भूजपासून सोळा किलोमीटर अंतरावरील कुनारिया गावात भला मोठा सेट लावला आणि लगानचे चित्रीकरण सुरू झाले. या चित्रपटाची पटकथा आशुतोष गोवारीकर, कुमार देव आणि संजय दायमा यांची, छायाचित्रण अनिल मेहता यांचे तर संकलन बल्लू सलुजा यांचे, वेशभूषा भानू अथ्थया यांची! भले मोठे युनिट घेऊन चित्रपट आकार घेत घेत गेला. चित्रपटातील विदेशी कलाकार रैचेल शैली, पॉल ब्लॅकथार्न हे हिंदीत न बोलता (अर्थात डब करून) इंग्रजीतच बोलतील आणि ते स्वाभाविक ठरेल असे आशुतोष गोवारीकरला मनोमन वाटले. या चित्रपटातील गाणी जावेद अख्तर यांनी लिहिली आणि ए.आर. रेहमान यांचे संगीत आहे आणि सगळीच गाणी श्रवणीय. घनन घनन, मितवा, राधा कैसे जले, ओ रे छोरी, चलो चलो, ओ पालन हारे… पटकथेच्या ओघात गाणी येतात आणि चित्रपट पुढे सरकत सरकत जातो. येथेही दिग्दर्शक दिसतो.
मुंबईतील आम्हा चित्रपट समीक्षकांसाठी महालक्ष्मी येथील फेमस स्टुडिओतील मिनी थिएटरमध्ये ‘लगान’ च्या खास खेळाचे आयोजन करण्यात आले… सेन्सॉर प्रमाणपत्र झाले आणि अमिताभ बच्चनच्या धीरगंभीर आवाजात निवेदन सुरू होते आणि आपण या चित्रपटात गुंतत गुरफटत जातो. एका वेगळ्या प्रकारच्या अनुभवात शिरतो, एक सकस कलाकृती आपण पाहतोय आणि त्यात आपले मनोरंजनही होत आहे याची जाणीव होत होत जाते.
नवीन दशकाच्या सुरुवातीला चित्रचौकटीचा भन्नाट अनुभव या चित्रपटाने दिला आणि मुंबईत इरॉस चित्रपटगृहाबाहेर अनेक आठवडे हाऊसफुल्लचा फलक दिसू लागला.
…आणि एक दिवस बातमी आली, ऑस्कर पुरस्कारासाठीची भारतीय चित्रपटाची अधिकृत प्रवेशिका म्हणून ‘लगान’ ची निवड झाली. तशी ती निवड दरवर्षी व्हायची, वृत्तपत्रात पहिल्या पानावर बातमी यायची. पण पुढे काय? आशुतोष गोवारीकर स्वतः अमेरिकेत गेला. त्याने ऑस्करच्या परीक्षकासाठी कशा पद्धतीने शोचे आयोजन करण्यात येते, त्याचे गुण कसे दिले जातात, वगैरे कार्यपद्धती समजून घेतली. तो याबाबत सकारात्मक दृष्टिकोनातून वाटचाल करीत असताना आमिर खान अमेरिकेत गेला. तोपर्यंत कदाचित त्याला वाटले असेल, लगान ऑस्करच्या शर्यतीत मागे पडेल. प्रत्यक्षात मात्र ऑस्करच्या विदेशी चित्रपटाच्या अंतिम फेरीत नामांकन मिळाले आणि एक महत्त्वाचे असे पुढचं पाऊल पडले. हा एकूणच भारतीय चित्रपटाचा गौरव होता. पाच विदेशी चित्रपटांत ‘लगान’ होता.
ऑस्करचा सोहळा अमेरिकेत सुरू होतो, तेव्हा आपल्या देशात पहाट सुरू झालेली असते. लगानला विदेशी चित्रपटांत पुरस्कार प्राप्त व्हावा अशी चित्रपटसृष्टी आणि चित्रपट रसिकांची मनापासून इच्छा होती, लगानची टीम आमिर खानच्या कार्यालयात पहाटेपासून दूरचित्रवाणीवर डोळे लावून बसली, पण पुरस्कार हुकला.
लगानची ही झेप विशेष उल्लेखनीय आहे. तोपर्यंत ऑस्करच्या शर्यतीत विदेशी चित्रपट विभागात मेहबूब खान दिग्दर्शित मदर इंडिया आणि मीरा नायर दिग्दर्शित सलाम बॉम्बे या दोन हिंदी चित्रपटांनी मजल मारली होती.
लगान हा एकूणच भारतीय चित्रपटसृष्टीतील एक माईल स्टोन चित्रपट आहे. एक क्लासिक अनुभव आहे. उत्तम आशय ( सांघिक भावना असावी) आणि मनोरंजन यांचा यात उत्तम ताळमेळ आहे. हा चित्रपट तीन तास, चव्वैचाळीस मिनिटे आणि एकोणतीस सेकंद असा लांबलचक असूनही तो आपल्याला पडद्यावरील विश्वात रममाण करतो हे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरचे यश. लगान वन्स अपॉन ए टाईम इन इंडिया असे नामकरण करण्यात येऊन हा एका विशिष्ट कालखंडावरचा चित्रपट आहे हे अधोरेखित केले हे उत्तम.

  • दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विक्रमाचे पनवेलमध्ये जल्लोषात स्वागत

नेहरूंना मागे टाकत सलग सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय लोकशाहीच्या इतिहासात १० जून …

Leave a Reply