Breaking News

उरणमधील मच्छीमारांना मोंथा चक्रीवादळाचा फटका

नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार -आमदार महेश बालदी

उरण : रामप्रहर वृत्त
मोंथा चक्रीवादळाचा उरण तालुक्यातील मच्छीमारांनाही फटका बसला आहे. सुदैवाने बोटीवरील सर्व खलाशी सुखरूप परतले असले तरी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार महेश बालदी यांनी करंजा बंदरावर कोळी बांधवांशी संवाद साधत या नैसर्गिक संकटात तुमच्या पाठिशी असल्याचे सांगत धीर दिला तसेच नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी राज्य शासनाकडे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
मोंथा चक्रीवादळामुळे उरण तालुक्यातील सात मच्छीमारी बोटींचा संपर्क तुटल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते, परंतु बुधवारी या सर्व बोटी व त्यावरील खलाशांशी संपर्क झाला
असून सगळे सुखरूप असल्याची माहिती आमदार महेश बालदी यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, चक्रीवादळामुळे खोल समुद्रातून वाट काढत काही बोटी परत आल्या. यात मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. एक बोट समुद्रात मच्छीमारीसाठी गेल्यावर जर नैसर्गिक आपत्तीमुळे परत यावे लागले, तर दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान होते. या वेळीही मच्छीमार बांधवांना त्याच प्रकारच्या मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे.
राज्य सरकारने नुकताच मच्छीमारांसाठी मोठा निर्णय घेत मत्स्यव्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा दिला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांप्रमाणेच मच्छीमारांनाही नैसर्गिक संकटात नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता या धोरणामुळे कोळी बांधवांचे नुकसान भरून निघणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मत्स्यव्यवसायमंत्री नितेश राणे यांच्याकडे या संदर्भात झालेल्या नुकसानीचा अहवाल देऊन तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी ठोस मागणी करणार आहे. अस्मानी संकटाच्या काळात कोळी बांधवांना आधार देणारे सरकार राज्यात देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली काम करीत आहे. आम्ही त्या अनुषंगाने शासनाकडे पाठपुरावा करू, असेही आमदार महेश बालदी यांनी सांगितले.
या वेळी मच्छीमार सोसायटीचे चेअरमन प्रदीप नाखवा, राजेश नाखवा, भारत नाखवा, रमेश नाखवा, जयविन कोळी, नारायण नाखवा, उमेश भगत, महेंद्र कोळी, ऋषिराज कोळी, राजेंद्र नाखवा आदी उपस्थित होते.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply