लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड वॉरियर्स आयोजित रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटी यांच्या सहकार्याने आणि ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स लि. पुरस्कृत रोटरी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या पाचव्या सत्रातील अंतिम फेरीचे सामने रविवारी (दि. 16) नवीन पनवेलच्या वेंगसरकर अकॅडमी येथे खेळविण्यात आले. या स्पर्धेत तीन वेगवेगळ्या चषकांसाठी अंतिम लढती झाल्या, ज्यात रेवल विनर्स, प्राईम दादा इलेव्हन आणि बाश्री ब्लास्टर्स या संघांनी विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी त्यांनी विजेते संघ व खेळाडूंचे अभिनंदन केले तसेच पनवेलमधील इतर खेळाडूंसाठी अशा स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात, असे प्रतिपादन केले. दरम्यान, स्पर्धेला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
बक्षीस वितरण समारंभास पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, पनवेल उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे अध्यक्ष अनिल ठकेकर, रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटीचे अध्यक्ष डॉ. रोहित जाधव, भारत विकास परिषदेचे अध्यक्ष कमांडर जांभेकर, रोटरी प्रांत 3131चे माजी स्पोर्ट्स संचालक संतोष घोडिंदे, गणेश कडू यांच्यासह रायगड वॉरियर्सचे पदाधिकारी, सर्व टीमचे मालक, खेळाडू आणि प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सर्व महापालिका अधिकारी, स्पर्धा आयोजक, मैदानावरील कर्मचारी आणि सहभागी खेळाडूंचे आभार मानून स्पर्धेची सांगता केली.
RamPrahar – The Panvel Daily Paper