नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
वाहनांची चोरी करून त्याची देशभरात विक्री करणार्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून चोरीच्या 20 कार जप्त करण्यात आल्या आहेत. या कार त्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे विकल्या होत्या.
जुलै महिन्यात गुन्हे शाखा पोलिसांनी वाहनचोरी करणार्या दोघांना अटक केली होती. या गुन्ह्यात अधिक तपास करून सलग सहा महिन्यांच्या प्रयत्नांनंतर इतर पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांच्याकडून चोरीच्या एकूण 20 कार जप्त करण्यात आल्या आहेत. या कार गुजरात, सुरत, पश्चिम बंगाल, कोलकाता, झारखंड या ठिकाणी विकण्यात आल्या होत्या.
जुलै महिन्यात दोघांना अटक केल्यानंतर त्यांचा सहभाग देशभरातील वाहनचोरीच्या गुन्ह्यांशी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याद्वारे पोलिसांनी सुरत, कोलकाता व मुंबई याठिकाणी छापे टाकून पाच जणांना अटक केली. मनीष चोवटिया, जमालुद्दीन शहा, नौशाद अन्सारी, राशिद अली व सुमित जालान अशी त्यांची नावे आहेत, तर मोहंमद तौफिक हबिबुल्ला व मनोज गुप्ता अशी यापूर्वी अटक केलेल्यांची नावे आहेत.