उरण मोरा येथे भाजप महायुतीची प्रचारसभा
उरण : रामप्रहर वृत्त
उरण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 1 मधील मोरा गावात भाजप महायुतीतर्फे आयोजित भव्य प्रचारसभा मोठ्या उत्साहात आणि प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. कोळी समाजाचा अभूतपूर्व सहभाग, महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि तरुणाईची जोशपूर्ण उपस्थिती पाहता या निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे स्पष्टपणे जाणवत होते.
सभेला आमदार महेश बालदी आणि पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार शोभा कोळी-शाह यांना मिळत असलेला जबरदस्त लोकसमर्थन या वेळी ठळकपणे जाणवत होते.
सभेला संबोधित करताना आमदार महेश बालदी यांनी थेट विरोधकांना निशाणा साधत त्यांची दिशाभूल करणारी अफवा मोहीम उघड केली. ते म्हणाले की, विरोधक उरण नगरपालिकेच्या मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. शोभा कोळी-शाह या इथल्या मातीतल्या नाहीत, अशा प्रकारची राजकीय बदनामी विरोधक करत आहेत. यावर पलटवार करत आमदार महेश बालदी म्हणाले, शोभा कोळी या मोरा गावातील भवनशेठ कोळी यांची मुलगी आहे. त्या या मातीतल्या नाहीत, मग कुठल्या? लंडनहून आल्या आहेत काय? विरोधकांनी लोकांच्या बुद्धीचा अपमान करण्याचे काम बंद करावे.
त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, गेल्या पन्नास वर्षांपासून कोळी समाजाशी त्यांचे दृढ आणि सक्ेहपूर्ण संबंध आहेत. मोरा गावात ते जेव्हा जेव्हा आले, तेव्हा प्रत्येक वेळी विकासाच्या विजयासह परत गेले आहेत. त्यामुळे उरण नगरपालिका भाजप महायुतीकडेच जाणार असल्याची त्यांनी खात्री व्यक्त केली. उरण नगरपालिका आपण जिंकल्याशिवाय राहत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असे ठाम शब्दांत त्यांनी सांगितले.
आमदार महेश बालदी म्हणाले की, उरण नगरपालिकेच्या शंभर वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच थेट नगराध्यक्षपद मिळण्याचा मान कोळी समाजाच्या मोरा गावाला मिळत आहे. हा क्षण ऐतिहासिक आहे आणि कोळी समाजाच्या राजकीय सबलीकरणाचा मोठा टप्पा असल्याचेही त्यांनी सांगितले.
पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनीही महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन करत विरोधकांच्या निष्क्रियतेवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, भाजप महायुतीने कोळी समाजाचा सन्मान राखत शोभाताईंना उमेदवारी देऊन समाजाला न्याय दिला आहे. विकास करायचा असेल तर सत्ता असणे गरजेचे आहे.
सत्ता असेल तर विकासाला वेग मिळतो. विरोधी पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी आजवर कधी कोणाला मदत केली आहे का? त्यांच्या कार्याबाबत लोकांना काहीच आठवत नाही.
प्रीतम म्हात्रे पुढे म्हणाले की, शोभाताईंचा आपला विजय निश्चित आहे. दोन्ही उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाच्या कोळी समाजाच्या उमेदवारांना मोठ्या मतांनी आघाडी मिळवून द्या. मोरा गावातील एकही मत कमळाच्या निशाण्यापासून दूर जाणार नाही, याची जबाबदारी आपण सर्वांनी घ्यावी.
सभेला उरण नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व प्रभाग क्रमांक चे नगरसेवक पदाचे उमेदवार जंविद्र कोळी, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शोभा कोळी-शाह, नगरसेविका पदाच्या उमेदवार रंजनी कोळी, तसेच प्रदीप नाखवा, राजेश कोळी, सूर्यकांत कोळी, राजेश दत्ताराम कोळी यांच्यासह कोळी समाजातील प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोरा गावातील महिला आणि युवकांची उत्स्फूर्त गर्दी पाहता संपूर्ण परिसरात भाजप महायुतीच्या बाजूने जोरदार लाट असल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते.
सभेच्या शेवटी महायुतीच्या उमेदवारांना दणदणीत विजय मिळवून देण्यासाठी कोळी समाजाने एकदिलाने पाठिंबा जाहीर केला. या उत्साहपूर्ण वातावरणामुळे प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजप महायुतीचा विजय निश्चित असल्याचे राजकीय जाणकारांनीही मत व्यक्त केले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper