पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्या आणि लाखो निसर्गप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेल्या पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथील रामबाग या अतिसुंदर उद्यानाचा तृतीय वर्धापन दिन सोहळा हजारो नागरिकांच्या साक्षीने मान्यवरांच्या उपस्थिती मोठ्या उत्साहात सोमवारी (दि. 22) सायंकाळी साजरा झाला.
या सोहळ्याला खासदार धैयशील पाटील, माजी मंत्री व विद्यमान आमदार रविशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, ‘दिबा’साहेबांचे पुत्र अतुल पाटील, पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी शहराध्यक्ष अनिल भगत, सरपंच विजेंद्र पाटील, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, रामबाग व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सागर ठाकूर, श्री म्हसेश्वर मंदिर कमिटीचे अध्यक्ष सी.एल. ठाकूर यांच्यासह इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाला स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी हजर होते.
वर्धापन दिनानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई, उत्तम नियोजन आणि लहानग्यांपासून युवक, महिला, ज्येष्ठांच्या उपस्थितीने रामबाग नंदनवनाप्रमाणे फुलली होती. सोबत पारंपरिक आगरी-कोळीगीतांच्या बहारदार कार्यक्रमाने वातावरणात स्फूर्ती आणली. स्वतःच्या संपत्तीतून लोकांच्या सेवेसाठी उभारलेली रामबाग ही वास्तू न्हावे पंचक्रोशीतीलच नव्हे तर पनवेल, उरण, रायगड नवी मुंबई आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या गौरवाची ठरली आहे. विशेष म्हणजे रामबाग आता पर्यटनस्थळ म्हणून उदयास आले आहे. थोर दानशूर व्यक्तिमत्व आणि सर्व समाजाचे आधारस्तंभ असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त न्हावे व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, म्हसेश्वर मंदिर समिती आणि रामबाग व्यवस्थापन कमिटीच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा हृदय सत्कार करून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यात आला.
वर्धापन दिनानिमित्त आयोजित श्री सत्यनारायण महापूजेचे हजारो नागरिकांनी दर्शन तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला. या वेळी झालेल्या पप्पू सूर्यराव, स्टेप आर्ट इंटरटेन्मेन्ट निर्मित व सनी संते प्रस्तुत हिच खरी आगरी कोळ्यांची दौलत या पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांच्या बहारदार कार्यक्रमाने वर्धापनदिनी रंगत आली.
मी लहानपणापासून रामशेठ काकांना पाहिलेले आहे. त्यांच्या 75व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आपल्याला उपस्थितीत राहता आले हे माझ्यासाठी भाग्य आहे. समाजामध्ये अनेक माणसे असतात. कुणी राजकारणात यशस्वी असतो, पण सामाजिक कार्यात नसतो. एखादा व्यवसायात यशस्वी असतो, पण समाजकार्यात नसतो. एखादा समाजकार्यात यशस्वी असतो, पण संस्थात्मक राजकारणात कुठेच नसतो आणि एखादा व्यक्ती या सगळ्यात असतो, पण नातीगोती आणि माणसे सांभाळण्यात कमी असतो, परंतु सर्व क्षेत्रात यशस्वी आणि सर्व बाबींना स्पर्श केलेले एकमेव व्यक्तिमत्व आहेत ते म्हणजे रामशेठकाका. धनवान खूप आहेत, पण आपले ऐश्वर्य लोकांच्या उपयोगी येईल याचा विचार ते करतात. 14 एकरच्या या जागेत कधीही झाडे उगवली नसतील, ती उगविण्याचे काम होत माणसाच्या आनंदाची इको सिस्टीम या ठिकाणी तयार झाली आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर आपल्या सर्वांसाठी आदर्श असून या विभागाचा ते कणा आहेत.
-धैर्यशील पाटील, खासदार
रामबाग शब्दाने या परिसराला दिशा देणारा मार्ग केला आहे आणि या रामबागेमुळे ग्रामीण भागात चैतन्य निर्माण केले आहे ते लोकनेते रामशेठ ठाकूर या दानशूर व्यक्तीमत्वाने. स्वतःच्या पैशाचा उपयोग ते जनतेच्या हितासाठी करतात. रामबाग या परिसराच्या नव्हे तर जिल्ह्याच्या अग्रस्थानी आहे. या परिसराच्या विकासाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी योगदान दिले आहे आणि या उद्यानाने आकर्षणाची सर्वांवर भुरळ घातली आहे. त्यामुळे दरवर्षी या ठिकाणी येत असतो. रामबाग हे निसर्गरम्य असे पर्यटनस्थळ आहे. लोकांसाठी उभारलेल्या या उद्यानाचा खर्च ते स्वतः करत आहेत. त्यामुळे असे दानशूर व्यक्तिमत्व कुठेही भेटणार नाही. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा गोरगरिबांच्या सेवेसाठी उपयोग होत आहे, त्यामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!
-रविशेठ पाटील, आमदार
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा जन्म आणि बालपण न्हावाखाडी येथे झाले. गावाला काही तरी दिले पाहिजे या भावनेतून आणि ग्रामस्थ, म्हसेश्वर मंदिर कमिटीच्या संकल्पनेतून रामबागची उभारणी झाली. अटल सेतूमुळे हा भाग मुंबईशी जवळ जोडला गेला. निसर्गरम्य सौंदर्य या ठिकाणी असल्याने येथून ये-जा करणार्या लोकांना रामबागचे आकर्षण झाले आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अविरतपणे सामाजिक कार्य सुरु आहे. या परिसराच्या विकासासाठी सर्वांचे सहकार्य लाभले आहे आहे आणि ते यापुढेही मिळत राहील.
-प्रशांत ठाकूर, आमदार
लोकनेते रामशेठ ठाकूर हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत. त्यांनी लोकांसाठी लोकसेवेचे साम्राज्य उभारले. लोकांसाठी दुबईच्या धर्तीवर असलेल्या मिरॅकल गार्डनची प्रतिकृती उभारली आहे. शाळा हे व्यवसाय म्हणून काही जण बघतात, पण लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शिक्षणाचे जाळे गोरगरिबांसाठी केले आहे. ते शिक्षणमहर्षी, शिक्षणतपस्वी आहेत हा अभिमान आपल्यासाठी खूप मोठा वाटतो. माणसे आणि समाज तोच असतो, पण माणसे जोडण्याची ताकद लागते. ते माणसे जोडणारे व्यक्तिमत्व आहेत. त्यामागे प्रचंड तपश्चर्या आहे आणि त्याचे सर्वजण साक्षीदार आहोत. जीवन तीन पानांचे असते. पहिले पान म्हणजे आपला जन्म जो ईश्वराने लिहून आपल्याला दिलेला असतो. तिसरे पान म्हणजे मृत्यू तोसुद्धा ईश्वराने आधीच निश्चित केलेला असतो, पण यामधील एक महत्त्वाचे पान आपल्या हातात असते ते म्हणजे मधले पान आपले आयुष्य कसे घडवायचे, कसे जगायचे आणि काय मागे ठेवायचे हे ठरवणारे पान आहे. हे मधले पान आपण कशा प्रकारे भरतो यावर आपल्या व्यक्तिमत्त्वाची किंमत ठरते. काही लोक हे पान रिकामे ठेवतात, काही साध्या ओळीत भरतात, तर काही थोर व्यक्ती आपल्या कर्माने, विचाराने आणि कार्याने हे पान सुवर्णाक्षरांनी भरून ठेवतात आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भरभरून ठेवले असून त्याचा आदर्श त्यांच्याकडून घ्यावा लागेल.
-बाळासाहेब पाटील, माजी सभापती, कोकण म्हाडा
RamPrahar – The Panvel Daily Paper