Breaking News

पायलची आत्महत्या नव्हे, हत्याच

मुंबई ः प्रतिनिधी

नायर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील डॉ. पायल तडवी हिच्या मृत्यूबद्दल तिच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे. पायलने आत्महत्या केली नसावी. तिची हत्या झाली असावी, असा आरोप तिच्या पतीने केला आहे.

वरिष्ठ महिला डॉक्टरांकडून होत असलेल्या रॅगिंगला कंटाळून डॉ. पायल तडवी हिने आत्महत्या केली होती. या प्रकरणातील आरोपी डॉक्टरांवर सोमवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली, मात्र त्या अद्याप फरार आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी व आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी पायलच्या कुटुंबीयांसह विविध संघटनांनी काल नायर रुग्णालयाबाहेर निदर्शने केली.

वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी निदर्शकांची व पायलच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पायलच्या कुटुंबीयांचे म्हणणे रास्त आहे. त्यादृष्टीने संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल व दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. कुणीही सुटणार नाही, असे महाजन यांनी स्पष्ट केले. या वेळी माध्यमांशी बोलताना पायलच्या पतीने या संपूर्ण प्रकरणाबाबत संशय व्यक्त केला आहे. पायलने आत्महत्या केली तेव्हा आरोपी डॉक्टर तिथे काय करीत होत्या, पोलिसांच्या परवानगीशिवाय तिचा मृतदेह त्यांनी खाली कसा आणला, असा प्रश्न पायलच्या पतीने उपस्थित केला. एकूण घडामोडी पाहता हे प्रकरण संशयास्पद आहे, असेही त्यांनी सांगितले.

Check Also

अजितदादांच्या निधनाने कबड्डी खेळाचे मोठे नुकसान -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्तमातीतल्या खेळांपैकी एक कबड्डीचा आधारस्तंभ असलेले अजितदादा पवार यांच्या निधनामुळे या खेळाचे …

Leave a Reply