Breaking News

पनवेल मनपा महापौर आणि उपमहापौरांचा पदग्रहण समारंभ उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील यांनी गुरुवारी (दि.12) अधिकृतरित्या मुख्यालयातील महापौर व उपमहापौर दालनाचा पदभार स्वीकारला. राजकीय दिग्गज आणि कार्यकर्त्यांच्या अलोट गर्दीत हा पदग्रहण सोहळा पार पडला.
या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे.एम म्हात्रे, भाजप ज्येष्ठ नेते वाय टी. देशमुख, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, माजी नगरसेवक अनिल भगत, भाजपचे सर्व महापालिका सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
महापौर व उपमहापौरांनी पदभार स्वीकारताच मालमत्ता कर, पाणीपुरवठा, शिक्षण विभाग, अतिक्रमण विभाग या अनुषंगाने विविध विषयांवरती आढावा बैठक घेतली. या बैठकिस सर्व महापालिका सदस्य, अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे, अतिरीक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे, उपायुक्त स्वरूप खारगे, उपायुक्त नानासाहेब कामठे, शहर अभियंता संजय कटेकर, सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर, डॉ. रूपाली माने, शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, महापालिका अधिकारी उपस्थित होते.
महापालिका क्षेत्रात पाण्याचा मोठा प्रश्न भेडसावतो आहे. खारघर, कामोठे, ग्रामीण भाग, कळंबोली, अशा सर्वच ठिकाणी पाण्याची कमतरता जाणवत आहे. यावरील उपाय योजनेवरती या वेळी चर्चा करण्यात आली. या अनुषंगाने महाराष्ट्र जलप्राधिकरण, सिडको, शिलार प्रकल्प, भविष्यकालीन मागणी, यासर्वांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
महापालिका कामोठे व तळोजा याठिकाणी नवीन शाळा बांधणार आहे. याचबरोबर खारघर, कळंबोली, ग्रामीण भाग, नवीन पनवेल अशा नवीन चार शाळा बांधण्याच्या विषयांवर चर्चा झाली.
अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून आठवडा बाजारांवर जोरदार कारवाई करावी अशा सूचना उपस्थित सदस्यांनी यावेळी केल्या. अतिक्रमण कर्मचारी वाढवून त्यासाठी वाहने घेऊन कारवाई करावी अशा सूचना यावेळी सदस्यांनी दिल्या. नोडनिहाय बैठका घेऊन यावर कठोर कारवाई करण्याबाबत अधिकार्‍यांना सूचित करण्यात आले.
दरम्यान, महापौर आणि उपमहापौर यांनी आपल्या दालनातील खुर्चीत बसण्यापूर्वी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले. पक्षनेतृत्वावर विश्वास दर्शवत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहराची प्रगती साधण्याचा निर्धार दोन्ही पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला.

जनतेच्या समस्या सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देणार आहे. रखडलेले प्रकल्प मार्गी लावून शहराचा कायापालट करण्याचा आमचा मानस आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाला महापालिका आपली वाटली पाहिजे, असे लोकाभिमुख शासन देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
-नितीन पाटील, महापौर

Check Also

पनवेल महापालिकेच्या महापौरपदी नितीन पाटील आणि उपमहापौरपदी प्रमिला पाटील बिनविरोध

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या महापौरपदी भाजप महायुतीचे नितीन जयराम पाटील यांची, तर उपमहापौरपदी प्रमिला …

Leave a Reply