पनवेल ः रामप्रहर वृत्त
‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणा देत, ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीमच्या तालावर गुरुवार (दि. 19) संपूर्ण पनवेल नगरी दुमदुमली. निमित्त होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396व्या जयंती सोहळ्याचे. महापालिकेच्या वतीने लोकसहभागातून आयोजित करण्यात आलेल्या भव्य-दिव्य मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या शिवजयंती सोहळ्यात आमदार प्रशांत ठाकूर, महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, आयुक्त मंगेश चितळे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह इतर मान्यवर, पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मिरवणुकीची सुरुवात सकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि महाराष्ट्र गीताच्या गायनाने झाली. पारंपरिक वेशभूषेतील महिला, पुरुष आणि विद्यार्थ्यांनी या मिरवणुकीत उत्साहाने सहभाग नोंदवला. शिवरायांच्या जीवनचरित्रातील प्रसंगांवर आधारित सात चित्ररथ, विविध शाळांची 14 लेझीम पथके, ढोल आणि बॅन्जो पथके हे या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. मिरवणुकीच्या मार्गावर पाच वेगवेगळ्या ठिकाणी दांडपट्टा, तलवारबाजी आणि लेझीम अशा शिवकालीन मैदानी खेळांचे थरारक सादरीकरण करण्यात आले, ज्याने उपस्थित जनसमुदायाची मने जिंकली.
अश्वारूढ शिवपुतळ्यापासून मिरवणूक सुरू होऊन हुतात्मा स्मारक, लाईन आळी, गावदेवी मंदिर आणि महापालिका कार्यालय या मार्गे टपाल नाका येथील अर्धाकृती पुतळ्याजवळ विसर्जित झाली. त्यानंतर आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मुख्य सोहळा पार पडला. या ठिकाणी शाहीर यशवंत जाधव यांच्या पहाडी आवाजातील पोवाड्याने आणि महापालिका मालमत्ता कर विभागाने सादर केलेल्या शिवराज्याभिषेक नाटकाने संपूर्ण वातावरण शिवमय झाले. विशेष म्हणजे, या नाटकात उपायुक्त स्वरूप खारगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारली.
याच कार्यक्रमात पनवेल महापालिकेच्या यशाचा गौरव करण्यात आला. माझी वसुंधरा 5.0 अभियानात राज्यात सलग दुसर्यांदा प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल आणि ई-गव्हर्नन्समध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल आयुक्त मंगेश चितळे यांचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
लोकसहभागातून साजरा झालेल्या या उत्सवासाठी महापौर नितीन पाटील, माजी सभागृह नेते परेश ठाकूर व माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांची रक्कम दिली, त्याबद्दल त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी मिरवणुकीतील विजेत्या चित्ररथांना आणि लेझीम पथकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यातील चित्ररथ स्पर्धेत महापालिका शिक्षण विभागाने प्रथम, तर लेझीम स्पर्धेत आगरी शिक्षण संस्था आणि महापालिका शाळा क्रमांक 6 यांनी आपापल्या गटात अव्वल स्थान पटकावले. उत्कृष्ट वेशभूषेचा मान इंदुबाई वाजेकर स्कूलने मिळवला.
या सोहळ्यास नगरसेवक राजू सोनी, अजय बहिरा, सुमित झुंजारराव, माजी नगरसेविका दर्शना भोईर, प्रीती जॉर्ज, रूचिता लोंढे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयवंत पगडे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक अनिल भगत, सुनील बहिरा, मुकीत काझी, संदीप पाटील, सतीश पाटील, शशिकांत शेळके, प्रांत अधिकारी पवन चांडक, संजय भगत, इक्बाल काझी यांच्यासह पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 अभंगांचे व्हिडीओ चित्रिकरण
नादब्रह्म साधना मंडळाचा उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्तथोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …
RamPrahar – The Panvel Daily Paper