दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज
पनवेल : रामप्रहर वृत्त
हिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी चादर’ श्री गुरू तेग बहादूर साहिब यांच्या 350व्या शहिदी समागमानिमित खारघर येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ओेवे येथील मैदानात होणार्या कार्यक्रमासाठी मान्यवरांसह देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या तयारीचा अल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ, भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर तसेच शासकीय अधिकार्यांनी आढावा घेतला.
कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थितांना संबोधित करणार आहेत तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्यासह इतर विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नेतेमंडळी, योगगुरू बाबा रामदेव, बागेश्वर धाम पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री, दिदी साध्वी ऋतंभरा उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर शिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन तसेच भगत नामदेव संप्रदाय या समाजातील संत आणि रागी जत्थेदार उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने ’नगारा फतेह दा’ या धार्मिक गीताचे लोकर्पण यावेळी झाले. राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांनी दोन दिवसीय कार्यक्रमाच्या आयोजनाच्या अनुषंगाने पाहणी करून आढावा घेतला. त्यांच्यासमवेत पनवेलचे महापौर नितीन पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, कोकण विभागीय आयुक्त विजय सुर्यवंशी, नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे, पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे, उपमहापौर प्रमिला पाटील, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, समाजाचे नेते जसपाल सिंग सिद्धू, हॅप्पी सिंग, मलकीत सिंग, हरजीत सिद्धू, समन्वयक रामेश्वर नाईक, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष प्रिया मुकादम, नगरसेवक, नगरसेविका, शासकीय अधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशासाठी बलिदान देणार्यांची गाथा समाज आणि युवा पिढीला ज्ञात झाली पाहिजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण आहे. देशप्रेम कायम जागरूक ठेवण्याचे काम मोदीजी करत असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष दिले आहे, तर आमदार प्रशांत ठाकूर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यरत आहेत, असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी यावेळी नमूद केले. त्याचप्रमाणे सर्व समाजाचे नेते, प्रतिनिधी, विविध संस्था-संघटना आणि शासकीय अधिकारी, पदाधिकारी काम करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कार्यक्रमाच्या भव्य दिव्य आयोजनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरकारचे आभार व्यक्त केले. इ.स. 1675मध्ये औरंगजेबाच्या काळात काश्मिरी पंडितांवर जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा दबाव टाकण्यात आला. त्यांच्या संरक्षणासाठी गुरू तेग बहादुर यांनी स्वतः पुढाकार घेतला व त्यांनी देशासाठी बलिदान दिले. त्यांच्या महान बलिदानामुळे त्यांना हिंद दी चादर असे म्हटले जाते. त्यामुळे देशासाठी बलिदान देणारे गुरू तेग बहादुर यांचे या कार्यक्रमातून कायम स्मरण होत राहणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.

RamPrahar – The Panvel Daily Paper