Breaking News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात

आमदार प्रशांत ठाकूर यांनीही केले रक्तदान

पनवेल ः रामप्रहर वृत्त
महाराष्ट्राचे अष्टपैलू, कार्यकुशल, विकासाभिमुख आणि लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर विविध समाजोपयोगी उपक्रम उत्साहात राबविण्यात येत आहेत. या निमित्ताने पनवेलमध्ये भाजप पूर्व मंडळाच्या वतीने बुधवारी (दि.२२) आयोजित भव्य रक्तदान शिबिरात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा आमदार प्रशांत ठाकूर यांनी रक्तदान करून समाजसेवेचा प्रेरणादायी संदेश दिला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने विकासाची नवी उंची गाठली असून पायाभूत सुविधा, उद्योग, गुंतवणूक, रोजगार, शेती, महिला सक्षमीकरण आणि सुशासन अशा प्रत्येक क्षेत्रात राज्याने उल्लेखनीय प्रगती केली आहे. राज्यातील महिला त्यांना प्रेमाने ‘देवाभाऊ’ म्हणून संबोधतात, तर पायाभूत सुविधांच्या विकासाला दिलेल्या अभूतपूर्व गतीमुळे त्यांची ‘विकसित महाराष्ट्राचे इन्फ्रा मॅन’ अशी ओळख निर्माण झाली आहे.
महाराष्ट्राला २०४७पर्यंत पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे महत्त्वाकांक्षी ध्येय ठेवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासमोर ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ हा दूरदर्शी विकास आराखडा मांडला आहे. जागतिक स्पर्धा, तंत्रज्ञानातील वेगवान बदल, हवामान बदल, वाढते शहरीकरण आणि बदलत्या आर्थिक आव्हानांचा विचार करून तयार करण्यात आलेला हा आराखडा केवळ आर्थिक विकासापुरता मर्यादित नसून रोजगारनिर्मिती, उद्योगविकास, आधुनिक शेती, तंत्रज्ञान, पर्यटन, महिला सक्षमीकरण, गुणवत्तापूर्ण शिक्षण, मजबूत पायाभूत सुविधा आणि पारदर्शक सुशासनाचा व्यापक संकल्प आहे. पुढील पिढ्यांसाठी समृद्ध, सक्षम, आधुनिक आणि आत्मनिर्भर महाराष्ट्र घडविण्याची ताकद या व्हिजनमध्ये आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजप पूर्व मंडळाच्या वतीने मंडळ अध्यक्ष तथा पनवेल पंचायत समितीचे उपसभापती भूपेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुकापूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात आमदार प्रशांत ठाकूर यांनी रक्तदान करून मुख्यमंत्र्यांच्या समाजहिताच्या विचारांना कृतीतून शुभेच्छा दिल्या. त्यांच्या प्रेरणेने भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक आणि नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली. दुपारपर्यंत ७३ जणांनी रक्तदान केले.
या शिबिरास पनवेल पंचायत समितीचे उपसभापती भूपेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य आत्माराम भस्मा, प्राची जाधव, कमला देशेकर, पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील, वर्षा केवारे, वैशाली सावंत, योगिता लहाने, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, किशोर सुरते, सरपंच प्रमोद भिंगारकर, विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, विश्वास भगत, माजी सरपंच रमेश पाटील, अनेश ढवळे, विलास शेळके, विश्वजित पाटील, महेश पाटील, राजेश माळी, मुकेश फडके, शरद गायकर, प्रशांत गांगुर्डे, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरातून समाजाप्रती असलेली बांधिलकी, सेवा आणि समर्पणाची भावना अधोरेखित झाली. रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमातून अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळणार असून देवाभाऊंच्या वाढदिवसाचे औचित्य समाजसेवेच्या माध्यमातून साजरे करण्याचा हा उपक्रम विशेष ठरला.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply