मुंबई ः रामप्रहर वृत्त
मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील विविध प्रश्न, अडचणी आणि प्रलंबित मागण्यांबाबत राज्याचे मत्स्य व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्यासमवेत भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या पुढाकारातून महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
मुंबईत झालेल्या या बैठकीस आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्यासह रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर उपस्थित होते. बैठकीत मच्छीमार बांधवांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः डिझेल अनुदानात वाढ करणे, मच्छीमारांसाठी विशेष विमा योजना अधिक प्रभावीपणे राबविणे, आधुनिक जेट्टी व कोल्ड स्टोरेज सुविधा उभारणे, बेकायदेशीर मासेमारीवर कठोर कारवाई करणे, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई देणे तसेच मत्स्यव्यवसायाला पूरक उद्योगांना चालना देण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याबाबत सकारात्मक विचारविनिमय करण्यात आला.
यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी रायगडसह किनारपट्टी भागातील मच्छीमारांच्या अडचणी मंत्री नितेश राणे यांच्या निदर्शनास आणून देत त्यांच्या न्याय्य मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. मंत्री राणे यांनी मच्छीमारांच्या हिताला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट करत बैठकीत मांडण्यात आलेल्या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करून शासन स्तरावर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
या बैठकीमुळे मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यास गती मिळणार असून मच्छीमारांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल पडणार आहे.
Check Also
पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …
RamPrahar – The Panvel Daily Paper