राष्ट्रवादीचे मधुकर पाटील उपाध्यक्षपदी
अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे मंगेश रामचंद्र वाकडीकर आणि उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर मारूती पाटील बिनविरोध निवडून आले. राजिपच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष निवडून आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आदी मान्यवरांनी अध्यक्ष, उपाध्यक्षांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला 15, राष्ट्रवादी काँग्रेसला 16, शिवसेना शिंदे गटाला 21, शिवसेना ठाकरे गट पाच आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्या होत्या. यानंतर गुरुवारी (दि. 12) भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेनेने मिळून सत्ता स्थापन केली. त्यामुळे राजिपवर महायुतीची सत्ता आली आहे.
जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झाले होते, परंतु अध्यक्ष व उपाध्यक्षपदी कुणाची निवड होते याबाबत सर्वांना उत्सुकता होती. भाजपने अध्यक्षपदासाठी पनवेलचे मंगेश वाकडीकर यांना, तर राष्ट्रवादीने उपाध्यक्षपदासाठी रोह्यातील मधुकर पाटील यांना उमेदवारी दिली.
राजिप अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात गुरुवारी सभा आयोजित करण्यात आली होती. मंगेश वाकडीकर यांनी अध्यक्षपदाचा आणि मधुकर पाटील यांनी उपाध्यक्षपदाचा अर्ज भरला. यावेळी राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे, भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार धैर्यशील पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अॅड. आस्वाद पाटील, भाजपचे गटनेते वैकुंठ पाटील, महिला मोर्चा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष चित्रा पाटील, शिवसेनेच्या गटनेत्या मानसी दळवी, दिलीप भोईर, अनंत गोंधळी, विकास गोगावले, चंद्रकांत कळंबे आदी उपस्थित होते.
दुपारी 2 वाजता झालेल्या सभेत अपर जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी सुनील थोरवे यांनी राजिपच्या अध्यक्षपदी मंगेश वाकडीकर आणि उपाध्यक्षपदी मधुकर पाटील यांची निवड झाल्याचे जाहीर केले. यानंतर कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
दरम्यान, भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे, विक्रांत पाटील, ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, बाळासाहेब पाटील, वाय.टी. देशमुख, पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, नगरसेवक परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्यासह जि.प. सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही अलिबाग येथे उपस्थित राहून जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर आणि उपाध्यक्ष मधुकर पाटील यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

RamPrahar – The Panvel Daily Paper