Breaking News

बीसीटी लॉ कॉलेजमध्ये मूट कोर्ट आणि जजमेंट रायटिंग स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त
तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गोपनीयतेचा अधिकार या विषयावरील कायदेशीर गुंतागुंत समजून घेण्यासाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील भागुबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयात शास्त्रार्थ 2.0 मूट कोर्ट आणि जजमेंट रायटिंग स्पर्धा 2026चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून भावी कायदेतज्ज्ञांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि मूलभूत अधिकार यांच्यातील संघर्षावर प्रकाश टाकला.
या स्पर्धेसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती गोविंद सानप आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासह व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, सचिव डॉ.एस.टी. गडदे, सदस्य अर्चना ठाकूर, राहुल घरत उपस्थित होते.
स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रभावी युक्तिवादाने आणि सखोल कायदेशीर विश्लेषणाने उपस्थितांची मने जिंकली. विशेषतः मूट कोर्ट फेर्‍यांमध्ये विद्यार्थ्यांनी मांडलेले कायदेशीर मुद्दे आणि जजमेंट रायटिंगमधील त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे होते.
स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी विधी क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांचे पॅनेल उपस्थित होते, ज्यामध्ये अ‍ॅड. चंद्रकांत निकम, अ‍ॅड. स्वप्नील पाटील, अ‍ॅड. डॉ. अश्विनी सिंह, अ‍ॅड. संदीप सिंह, अ‍ॅड. अश्विन अडवाणी, अ‍ॅड. कल्याणी मांगवे, अ‍ॅड. निर्मल चोपडा, अ‍ॅड. ध्वनी चोपडा, अ‍ॅड. निलेश बागडे, अ‍ॅड. निनाद शेंडगे आणि अ‍ॅड. महेश स्वामी यांचा समावेश होता.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सानवी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सहाय्यक प्राध्यापिका नेहा काची यांनी निमंत्रक म्हणून, तर बीएएलएलबी समन्वयक सहाय्यक प्राध्यापिका धनश्री कदम यांनी आयोजक म्हणून जबाबदारी सांभाळली.

Check Also

पनवेलमध्ये घरगुती गॅस तुटवडा नाही; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल परिसरात घरगुती गॅस सिलिंडरसंदर्भात विविध अफवा पसरत असल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण …

Leave a Reply