Breaking News

सेलिब्रिटींचे लग्न, नवे नवे विक्रम….

विक्रम हे मोडण्यासाठीच असतात आणि हा अलिखित नियम सगळ्याच क्षेत्रात, सगळ्याच बाबतीत लागू होतात, सेलिब्रिटींच्या शानदार, ग्लॅमरस लग्नाची गोष्टदेखील अशीच. त्यात तर बदलत्या माध्यमानुसार नवीन विक्रम घडत आहेत, आपण फक्त आणि फक्त त्या दृष्टिकोनातून पहायला हवे.
दिलीपकुमार आणि सायरा बानू यांचे त्या काळात फार फार गाजलेले लग्न ते विजय देवरकोडा आणि रश्मिका मंदाना यांचे आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीने भरभरून लाईक्स केलेले लग्न असा हा तब्बल साठ वर्षांचा प्रवास आहे.
मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांच्या प्रेम प्रकरण, अफेअर (गुपचूप गुपचूप चालतं त्याला अफेअर म्हणतात. कोणी सोप्या भाषेत लफडे असेही म्हणतात), लग्न (ते धुमधडाक्यात असेल तर फार फार वाजते, गाजते), विवाहबाह्य संबंध/हितसंबंध (ते कोणी उगाच ठेवत नाहीत. त्यातही काही गणित असते, व्यवहार असतोच. मात्र धोका असतो की नाही माहित नाही), घटस्फोट (सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या गंभीर गोष्ट. आजचे बरेचसे सेलिब्रिटीज, त्याचंही सेलिब्रेशन करतात), मग एकटीने राहणे, त्याला ’सोलो ट्रॅव्हलर्स’ असा आजकाल गोड शब्द वापरला जातो. प्रगती म्हणतात ती कदाचित हीच असावी. कदाचित त्याच अथवा तिचं दुसरं लग्न अथवा अगदी तिसरं लग्न अशा अनेक गोष्टींना भरपूर वाचक आणि दर्शक नक्कीच आहे. याचा चित्रपट, नाटक, मालिका, वेबसिरीज, जाहिरातपट याच्याशी दुरान्वयानेही संबंध नाही. अर्थात, अभिनयाशीही नाही. पण तरीही ते फार फार महत्त्वाचे झाले आहे.
त्यात एक फॅक्टर लग्नाचा! ते लग्न फक्त आणि फक्त त्यांच्यापुरतेच राहत नाही तर तळागाळातील चित्रपट रसिकांपर्यंत ते पोहचते. त्यांनाही अशा बातमीत विशेष रस असतोच. हा चित्रपटाच्या लोकप्रियतेचा परिणाम असावा.
लग्नापूर्वी दिलीपकुमार आणि सायरा बानू यांनी कधीही एकत्र काम केले नव्हते, म्हणून तर त्यांचे जमलं कसं याची विलक्षण उत्सुकता होती. तो मुद्रित माध्यमाचा काळ होता आणि वृत्तपत्र, साप्ताहिक, पाक्षिक यातून या लग्नाची आलेली बातमी, मग एकादा लेख वा स्फूट हे अधिकाधिक वाचकांनी वाचले. जणू एक विक्रम घडला.
राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्या लग्नाच्या ग्लॅमरस रिसेप्शनचे रिळ शक्ती सामंता दिग्दर्शित ’अनुराग’ (1973) या चित्रपटासोबत दाखवलं जाई आणि ते पाहण्यासाठी या चित्रपटाला गर्दी होई. हा चित्रपटही मनोरंजक होता. पहिल्यांदा असे झाले की, कायमच मुद्रित माध्यमातून येणारी कलाकारांच्या लग्नाची गोष्ट थाटामाटात पडद्यावर दिसली आणि त्याला विक्रमी प्रतिसाद मिळाला. हा एक नवीन उच्चांक गाठला.
म्हटलं ना, विक्रम हे मोडण्यासाठीच असतात. असाच एक नवीन विक्रम माधुरी दीक्षितने अमेरिकेतील डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले या ब्रेकिंग न्यूजला असाच भन्नाट रिस्पॉन्स मिळाला आणि आज तक या वृत्तवाहिनीने या लग्नाच्या रिसेप्शनचे ’अवघे काही मिनिटे’ केलेल्या लाईव्ह कव्हरेजलाही विक्रमी टीआरपी मिळाला. आपल्या माधुरी दीक्षितचा नवरा दिसतो गं कसा याचं त्या विक्रमी टीआरपीमागे कुतूहल होते. स्टोरीत काही दम असेल तर कुतुहल वाढतं हे सोपे गणित सेलिब्रिटींच्या लग्नाच्या गोष्टीतही असते.ते पाहण्याचा दृष्टिकोन हवा.
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा सुपुत्र आणि विश्व सुंदरी ऐश्वर्या रॉय यांच्या लग्नामागची ’स्टोरी’ अनेक वळणे घेत घेत लग्नमंडपापर्यंत पोहचली. हाय प्रोफाईल लग्नाची गोष्ट म्हणून याची ओळख. मोठ्या लग्नाच्या गोष्टी मोठ्याच असतात आणि जुहू येथील दहाव्या रस्त्यावरील प्रतीक्षा बंगला ते जलसा बंगला असं हा लग्नसोहळा पार पडताना मीडियाचा विक्रमी प्रतिसाद मिळाला यात आश्चर्य ते काय? बरं हे सगळे कव्हरेज बाहेरचे होते. आतल्या लग्न सोहळ्यासाठी खासगी कॅमेरामन होते. ऐश्वर्या रॉय सलमान खानची होऊ ना शकली आणि अभिषेक बच्चन करिश्मा कपूरचा होवू ना शकला असा या लग्नामागचा फ्लॅशबॅक. सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील हिंदी चित्रपटात असं काहीसं घडत आणि बिघडत असे. आणखी काही वर्षांनी याच सगळ्या गोष्टीत मसाला मिक्स करून चित्रपट निर्माण होऊ शकेल. आपल्या मनोरंजन क्षेत्रातच केवढ्या तरी रंजक आणि एक्सलुझिव्ह गोष्टी आहेत, त्या पटकथा आणि संवाद लेखनात आणल्या तर रूपेरी पडद्यावर चित्रपट येईल.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे लग्न म्हणजे आपल्या देशातील चित्रपट आणि क्रिकेट यांच्या जबरदस्त क्रेझला पुरती सपोर्ट सिस्टीम. आपल्या देशातील अगदी खालच्या माणसापर्यंत पोहचलेल्या चित्रपट आणि क्रिकेटला लोकप्रियता आणि फॉलोअर्स भरपूर. दोघेही भारतीय परंपरा, संस्कृती, सभ्यता आणि मूल्ये यांची जपणूक करणारे. आपल्या दोन्ही मुलांच्या पालनपोषणात रमणारे, आपले खासगी आयुष्य जपणारे, आपल्या देशातील विविध भागांतील तीर्थक्षेत्राना आवर्जून भेटीगाठी देणारे. दोघांही आयुष्याच्या आणि कारकिर्दीच्या योग्य वयात लग्न करून आजच्या डिजिटल पिढीसमोर उत्तम आदर्श ठेवला. दोघेही आपापल्या क्षेत्रात सेलिब्रिटीज, त्यामुळे त्यांच्याभोवती तरुणाईचा गराडा जास्त. अनेक जण, अनेक जणी यांना आपल्या मोहात पाडण्याचा प्रयत्न करू शकतात अथवा यांच्याकडूनही बेसावधपणे चूक होऊ शकते, पण ते टाळण्यात ते यशस्वी. विराट कोहली मैदानावर तुफान आणि चौफेर फटकेबाजी करत असताना अनुष्का शर्माची स्टेडियमवरची उपस्थिती कायमच लक्षवेधक. त्याची रिल सोशल मीडियात भरभरून लाईक्स मिळवणारी.
मन्सूर अली खान पतौडी आणि शर्मिला टागोर यांच्या लग्नाच्या वेळी मुद्रित माध्यमे फॉर्मात होती. त्या काळातील क्रीडाविषयक आणि चित्रपटविषयक साप्ताहिक पाक्षिक यातून या लग्नाची गोष्ट भरपूर वाचनीय ठरली. गंमत म्हणजे, कपिल शर्मा शोमध्ये एकदा शर्मिला टागोरने आपल्याला मन्सूर अली खान पतौडी यांचे हायफाय इंग्रजी कसे समजत नसे आणि ते आपल्या विनोदावर आपणच कसे हसत हे तिने सांगितले. हे सांगताना आपली मुलं आपणावर रागावणार नाहीत असाही एक विश्वास दाखवला. या गोष्टीचे रिळही भरपूर प्रमाणात लाईक्स मिळवणारे. काळ कितीही पुढे सरकू देत, सेलिब्रिटींच्या लग्नाच्या गोष्टीतील गंमत जंमत कायमच लाईक्स मिळवणारी.
’विरोश’ विवाहाने हे सगळे विक्रम मोडले. विजय देवरकोडा आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रेम प्रकरणापासूनच सोशल मीडियात लाईक्स वाढल्या. पॅन इंडिया चित्रपट युगात साऊथचे हे स्टार हिंदी भाषिक पट्ट्यात पोहचले आणि जगभरातील अनेक देशांमध्ये आपले चित्रपट पोहचत असल्याने हे सेलिब्रिटीही दूरवर पोहचले. सोशल मीडियाने त्यांचे चित्रपटांचे प्रगती पुस्तक, त्यातील त्यांची गीते संगीत नृत्याची बहारदार फोडणीही अधिकाधिक प्रमाणात पोहचली. हा सगळा हाईप त्यांच्या लग्नाच्या गोष्टीत सतत वाढत वाढत गेला आणि मग उदयपूर येथील लग्न सोहळा, त्याचा प्रचंड झगमगाट, त्याचं ग्लॅमर, लग्नातील संगीत, लग्नानंतर रक्ष्मिका मन्दानाच्या गावाला भेट देणं, विविध तीर्थक्षेत्रांना भेटी देणं या सगळ्यात नुकतंच लग्न झालं त्या पतीची रश्मिका मंदानाने सतत काळजी घेणे, ते सगळे कॅमेरात येत राहणं या सगळ्यातील या नवदाम्पत्याचे आऊट फिट्स, त्यातून सतत दिसत आलेली त्यांची केमिस्ट्री, त्यांच्या रिसेप्शनला आलेले पाहुणे या सगळ्या सगळ्या गोष्टींची छोटी छोटी रिल सोशल मीडियात पोस्ट झाली आणि त्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आणि विक्रमी लाईक्स मिळवल्या. जवळपास नऊ मिलियन इतका तो आकडा आहे. अनेक देशांतून हा विक्रमी प्रतिसाद मिळाला आहे. आणि हा विक्रम घडताना लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्या आयनॉक्स कॅम्पेन पोस्टरच्या सोशल मीडियातील रिल लाईक्सचा विक्रम मोडला जाऊन एक नवीन उच्चांक गाठला आहे. सेलिब्रिटीजचं लग्न म्हणजे चहुबाजूंनी प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल असते, त्यात हीदेखील एक रंजक गोष्ट आहे. सेलिब्रिटीजचे लग्न लावणारा भटजीही मुलाखत देताना दिसला तर त्यात अजिबात आश्चर्य नको.
चित्रपट कलाकारांच्या लग्नाची गोष्ट म्हणजे त्यांचे व्यक्तिगत अथवा खासगी आयुष्य राहिलेले नाही. तेवढेच ते वेळोवेळी अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचले आहे. प्रसार माध्यमे बदलत राहिली आणि विक्रम घडत राहिला आहे. उगाच नाही या लग्नाच्या लाईव्ह कव्हरेज प्रक्षेपणाच्या हक्काची किंमत काही कोटी रुपये द्यायची तयारी असते… सेलिब्रिटीज मॅरेज मॅनेजमेंट असा
एक नवीन फंडा विकसित होणे हे कॉर्पोरेट युगाचे मोठेच देणं आहे. सेलिब्रिटीजची प्रत्येक लहान मोठी गोष्ट बातमी असते, सोशल मीडियात रिल असते आणि लाईक्सही असतात…

  • दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)

Check Also

पनवेलमध्ये घरगुती गॅस तुटवडा नाही; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल परिसरात घरगुती गॅस सिलिंडरसंदर्भात विविध अफवा पसरत असल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण …

Leave a Reply