विद्यालयासाठी ४० लाखांची घोषणा
पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, थोर देणगीदार, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पनवेल तालुक्यातील रिटघर येथील श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सवी वर्ष शुभचिंतन समारंभ अत्यंत उत्साहात आणि भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झाला.
या सोहळ्याला संबोधित करताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाची भव्यता आणि प्रेम पाहून जे काही काम मी आजवर करत आलो आहे, त्यापेक्षा दुपटीने काम करण्याची नवी स्फूर्ती मला मिळाली आहे, असे प्रतिपादन केले तसेच कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे मनापासून आभार मानले. याचवेळी त्यांनी विद्यालयाच्या प्रगतीसाठी मोठी घोषणा करताना विद्यालयाचा सभामंडप बांधण्यासाठी आणि फरशी बसवण्यासाठी ४० लाख रुपये देण्यात येतील तसेच गरज भासल्यास आणखीही आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे जाहीर केले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याला रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य जे.एम. म्हात्रे, भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर, उपसभापती भूपेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य आत्माराम भस्मा, पंचायत समिती सदस्य वर्षा केवारे व राज पाटील, रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी एम.के. कोंगरे, सरपंच सुभाष भोपी, उपसरपंच महेश पाटील, संस्थेचे सहाय्यक विभागीय अधिकारी व्ही.यू. जगताप, लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल कामोठेच्या प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच स्थानिक स्कूल कमिटी सदस्य राजेश भोपी, विलास भोपी, बाळाराम भोपी, संजय पाटील, बळीराम भोपी, नवनाथ भोपी, वंदना भोपी, विष्णू भगत, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भारत भोपी, उपाध्यक्ष रमेश पाटील, प्रल्हाद भोपी, वासुदेव भोपी, विष्णू भगत, राजन भगत, गोपीनाथ भोपी, विश्वनाथ भोपी, नवनाथ भोपी, ग्रामपंचायत सदस्या कमळाबाई वाघमारे, नाना चौधरी, पोलीस पाटील दीपक पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.बी. कारंडे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर नव्या जांभळे व रूद्र शेळके या विद्यार्थ्यांनी आपली मते मांडली, तर माजी विद्यार्थी यशवंत उलवेकर आणि संजय पाटील यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारी प्रभावी भाषणे केली. समारंभात विद्यालयातील सर्व महिला शिक्षिकांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे औक्षण करून त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यालयामार्फत मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मानपत्र अर्पण करून लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा हृदय सत्कार केला.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल कामोठे व श्री भैरवदेव विद्यालय रिटघरच्या विद्यार्थ्यांनी रामशेठ ठाकूर यांचा जीवनपट नृत्यातून अत्यंत प्रभावीपणे सादर केला. या नृत्याचे दिग्दर्शन व नेपथ्य शिक्षक भोईर, शिक्षिका खुटले व गोंधळी यांनी केले होते. या मंगलसमयी वारकरी संप्रदायातील ७५ जणांना सन्मानपूर्वक भगवद्गीता प्रदान करण्यात आली.
या सोहळ्याला रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य डी.बी. पाटील, जनरल बॉडी सदस्य व्ही.व्ही. पाटील, संजीवनी म्हात्रे, विविध शाखांमधील मुख्याध्यापक, वारकरी मंडळी, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित पाटील यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शिक्षिका गावंड यांनी मानले.
RamPrahar – The Panvel Daily Paper