- पाणी नियोजनासंदर्भात परिषद घेणार -महापौर नितीन पाटील
- लघुकाळासोबत दीर्घकालीन उपाययोजनांवर भर दिला जाणार
पनवेल : रामप्रहर वृत्त
सभागृहात नगरसेवक-नगरसेविकांना आपले विषय मांडण्याचा आणि चर्चेत सहभागी होण्याचा अधिकार असतो, मात्र पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात बुधवारी झालेल्या महापालिकेच्या महासभेत विरोधी पक्षाने स्वतः बोलण्याऐवजी कुटील रणनीती आखून प्रेक्षक गॅलरीत नागरिकांना फलकासह बसवले होते. विशेष म्हणजे या सर्व नागरिकांसाठी विशेष बसची व्यवस्था करण्यात आली होती. विरोधी पक्षाने आपली निष्क्रियता झाकून टाकण्यासाठी नागरिकांना आणल्याचीही चर्चा रंगली.
प्रेक्षक गॅलरीतून गोंधळ होण्याची शक्यता लक्षात आल्याने महापौर नितीन पाटील यांनी तत्काळ सभागृहाच्या कामकाजाला छेद घालण्याच्या आणि हीन राजकारणाबद्दल विरोधकांवर ताशेरे ओढले. सभागृहात शिस्तबद्ध योग्य प्रकारे कामकाज होणे अपेक्षित आहे. या ठिकाणी लोकप्रतिनिधींना आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार असतो. त्यामुळे नागरिकांनी आपले काही म्हणणे असेल, तर महापालिका प्रशासन कार्यालयात निवेदन द्यावे. ही महासभा असल्याने फलक दाखवणे, निदर्शने करणे, घोषणाबाजी करणे संयुक्तिक नाही; अन्यथा कारवाई करण्यात येईल असे निर्देश दिले. त्यामुळे विरोधकांकडून आलेल्या नागरिकांनी हळहळू प्रेक्षक गॅलरीतून पाय काढला.
तीन वर्षांच्या प्रशासकीय कालावधीनंतर झालेल्या या महासभेत नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्याच्या भूमिकेतून वाटचाल करण्याची गरज असताना विरोधी पक्षाकडून पाणी प्रश्नाचे स्वार्थी राजकारण करण्यात आले. महासभेत गोंधळ घालण्याचा हा कुटील डाव महापौर नितीन पाटील यांनी उधळून लावला. त्याचबरोबर पाणी प्रश्न हा आमच्या जिव्हाळ्याचा आहे, त्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला देऊन येत्या पंधरा दिवसात विशेष सभेतून पाणी परिषद घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले तसेच पाणीपुरवठा योग्य होईपर्यंत बिल्डरांचे पाणी कनेक्शन बंद करण्याच्याही सूचना त्यांनी यावेळी प्रशासनाला केली.
महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला उपमहापौर प्रमिला पाटील, आयुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्ये, नगरविकास सचिव, सभागृह नेते ॲड. प्रकाश बिनेदार, विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, महिला व बालकल्याण सभापती ममता म्हात्रे, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, अर्धा तास चर्चेत पाणी प्रश्नावर चर्चा झाली. नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, ॲड. मनोज भुजबळ, प्रवीण पाटील, रामदास शेवाळे, अजय बहिरा, अमर पाटील, विजय खानावकर, लतीफ शेख व इतर नगरसेवकांनी या चर्चेत सहभाग घेतला. त्यांनी आपापल्या भागातील पाण्याची स्थिती मांडतानाच उपाययोजनासंदर्भात चर्चा केली. डॉ. अरुणकुमार भगत यांनी, पनवेलच्या पाणीपुरवठ्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी न्हावाशेवा टप्पा ३ योजनेचा सातत्याने पाठपुरावा केल्याचे नमूद करून दरमहा त्याचा आढावा ते घेत असल्याचे स्पष्ट केले.
सभागृहनेते ॲड. प्रकाश बिनेदार यांनी यावेळी सभागृहात माहिती देताना सांगितले की, पनवेल महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक २०१७ साली झाली. त्यानंतर मुदत संपल्यावर गेली तीन वर्षे प्रशासक होते. येथील महापालिका हद्दीतील पाणीपुरवठ्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य शासन आणि प्रशासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. संबंधित विभागाचे मंत्री, अधिकारी यांच्यासमवेत नियमित बैठका घेतल्या आहेत. पाण्याचे स्रोत देहरंग धरण, एमजेपी, सिडकोकडून आपल्याकडे पाणीपुरवठा होत असतो. पुढील २५ वर्षांचा विचार करून आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. त्या अनुषंगाने शिलार धरण प्रकल्प उभारला जाणार आहे तसेच या प्रकल्पाचा भूर्दंड महापालिकेवर येऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे फक्त शॉर्ट टर्म नाही, तर लॉन्ग टर्मचा विचार करून उपाययोजना केली जात आहे, असेही ॲड. बिनेदार यांनी अधोरेखित केले.
आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितले की, पनवेल महापालिकेला दरदिवशी २५८ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. सध्या २१८ एमएलडी पाण्याचा पुरवठा होत आहे. पाणीपुरवठ्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी वारंवार शासन स्तरावर बैठका घेऊन योग्य त्या उपाययोजनांच्या बाबतीत पुढाकार घेतला आहे. सन २०५१मध्ये प्रतिदिन ५०० एमएलडी पाणी लागेल, त्या अनुषंगाने शिलार धरणाचे नियोजन करण्यात आले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाणीपुरवठ्यासंदर्भात ऑटोमेशन करण्यासाठी पाठपुरावा केला असून त्या अनुषंगाने सिडकोने टेंडर काढले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
पाणीपुरवठ्यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन सकारात्मक सहकार्य करणे गरजेचे आहे. एकूणच पाणीपुरवठा हा महत्त्वाचा प्रश्न मानून सत्ताधारी पक्ष काम करत आहे आणि त्या अनुषंगाने उपाययोजना करत असल्याचे जाहीर आहे. त्यास सहकार्य करण्याऐवजी त्यामध्ये खोडा घालण्याच्या दृष्टीने विरोधी पक्ष युक्त्या करत आहे असेच चित्र या महासभेच्या अनुषंगाने पहायला मिळाले.
RamPrahar – The Panvel Daily Paper