पनवेल : रामप्रहर वृत्त
मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या अटल सेतूजवळ रायगडच्या दिशेला असलेल्या एका मोठ्या खडकावर भव्य ‘शिवमुद्रा’ आणि ‘शिवस्मारक’ उभारण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाबाबत राज्याचे मंत्री आशिष शेलार आणि उरणचे आमदार महेश बालदी यांची मंत्रालयातील दालनात बुधवारी (१ एप्रिल) विशेष बैठक झाली.
या बैठकीत संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या दोन्ही प्रकल्पांचा सविस्तर अहवाल येत्या महिनाभरात सादर करण्याचे निर्देशमंत्री आशिष शेलार यांनी दिले आहेत. शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणारे हे स्मारक पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे ठरणार आहे. याच बैठकीत नवी मुंबई येथे जागतिक दर्जाचे अत्याधुनिक स्टेडियम उभारण्यासंदर्भातही सविस्तर आढावा घेण्यात आला. हे स्टेडियम उभारताना कनेक्टिव्हिटी, वाहतूक व्यवस्था, पार्किंग आणि पायाभूत सुविधांचा सर्वंकष विचार करूनच योग्य जागेची निवड करण्यावर मंत्री शेलार यांनी भर दिला.
नवी मुंबईतील ‘स्पोर्ट्स सिटी’च्या प्रस्तावित क्षेत्रामध्ये हे स्टेडियम उभारण्याचा पर्याय सध्या विचाराधीन असून, तेथील ५० टक्के जमीन आधीच संपादित झालेली आहे. उर्वरित जमीन टप्प्याटप्प्याने संपादित करून या कामाला गती देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या नियोजित स्टेडियमसाठी सुमारे ४० एकर जागा आणि इतर पूरक सुविधांसाठी अतिरिक्त ३० एकर अशा एकूण ७० एकर जागेची आवश्यकता भासणार आहे.
हा प्रकल्प दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करणे गरजेचे असल्याचे सांगत, मंत्री आशिष शेलार यांनी या प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या बैठकीस आमदार महेश बालदी यांच्यासह सिडको आणि संबंधित विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.
Check Also
पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …
RamPrahar – The Panvel Daily Paper