Breaking News

महाराष्ट्रात प्रथमच ‌‘स्मार्ट पे किऑस्क‌’द्वारे मालमत्ता कर भरण्याची सुविधा

पनवेल महापालिकेचा पुढाकार; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त
नागरिकाभिमुख डिजिटल सेवांच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत पनवेल महापालिकेने स्मार्ट पे किऑस्क सिस्टीम या अत्याधुनिक स्व-सेवा सुविधेचा शुभारंभ केला आहे. या स्मार्ट किऑस्क मशीनचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि.२) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत नाट्यगृह येथे करण्यात आले. ही अत्याधुनिक डिजिटल सेवा सुरू करणारी पनवेल ही महाराष्ट्रातील पहिली महापालिका ठरली आहे.
या कार्यक्रमास महापौर नितीन पाटील, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, महिला बालकल्याण सभापती ममता म्हात्रे, महापालिका सदस्य, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे,परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त स्वरूप खारगे, बँक ऑफ महाराष्ट्रचे अधिकारी, महापालिका अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्मार्ट पे किऑस्क सिस्टीममुळे पनवेलमधील नागरिकांना मालमत्ता कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक झाली आहे. नागरिक आता केवळ बिल स्कॅन करून काही क्षणांत कर भरू शकतात तसेच मालमत्ता उतारा, थकबाकी नसल्याचा दाखला, अर्ज नोंदणी यांसारख्या विविध नागरी सेवा देखील या किऑस्कच्या माध्यमातून सहज उपलब्ध होणार आहेत.
या प्रणालीमध्ये टॅप ॲड पे यासारख्या डिजिटल पेमेंट पर्यायांचा समावेश असून व्यवहारानंतर त्वरित पावती मिळते. त्यामुळे नागरिकांना रांगेत उभे राहण्याची गरज भासत नाही आणि वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होते.
पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने सेवांचे आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला असून भविष्यात व्हॉइस इंटरॅक्शनसारख्या तंत्रज्ञानाचाही समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिक किऑस्कशी थेट संवाद साधून विविध सेवा सहज मिळवू शकतील.
अत्याधुनिक स्मार्ट पे किऑस्क मशीन ही मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त स्वरूप खारगे यांच्या पुढाकाराने व स्थापत्य कन्सल्टंट या संस्थेमार्फत विकसित करण्यात आली असून खास करून स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी विशेष तंत्रज्ञानाधारित, पारदर्शक आणि अधिक कार्यक्षम सेवा प्रणाली निर्माण करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. या मशीनसाठी येणारा सर्व खर्च बँक ऑफ महाराष्ट्रकडून करण्यात येणार असून यासाठी पनवेल महापालिकेचा एकही रुपया खर्च होणार नाही. स्मार्ट पे कियॉस्क हे मुख्यालय व प्रभाग कार्यालयात बसवले जाणार आहे.
यावेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, पनवेल शहर झपाट्याने विकसित होत असून नागरिकांना आधुनिक व दर्जेदार सुविधा देणे ही काळाची गरज आहे. स्मार्ट पे किऑस्क सिस्टीम ही त्या दिशेने एक महत्त्वाची पायरी आहे.
स्थायी समिती अध्यक्ष बबन मुकादम यांच्या हस्ते किऑस्कद्वारे पहिला मालमत्ता कर भरणा करण्यात आला. यावेळी त्यांनी महापालिकेने सुरू केलेल्या अत्यंत सुलभ अशा अत्याधुनिक उपक्रमाची प्रशंसा करून या उपक्रमाची औपचारिक सुरुवात झाली.
दरम्यान, विकास, नवकल्पना आणि पारदर्शकतेच्या या प्रवासात नागरिकांचा सहभाग आणि सहकार्य महत्त्वाचे असून या नव्या उपक्रमामुळे शहराच्या स्मार्ट विकासाला निश्चितच गती मिळणार आहे. नागरिकाभिमुख आणि तंत्रज्ञानाधारित सेवा देण्याचा निर्धार प्रशासनाने केला असून या उपक्रमामुळे शहराच्या स्मार्ट विकासाला निश्चितच गती मिळणार आहे, असा विश्वास आयुक्त मंगेश चितळे यांनी व्यक्त केला आहे.

Check Also

विद्यालयाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाचा प्रस्ताव महासभेत येणार

पनवेल : रामप्रहर वृत्तमहानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील विरुपाक्ष सभागृहाजवळ असलेल्या अंतिम भूखंड क्रमांक १२२ वर उभारण्यात …

Leave a Reply