Breaking News

पनवेल जॉब ड्राईव्हला उत्स्फूर्त प्रतिसाद

युवक-युवतींना मिळाल्या रोजगाराच्या संधी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित विविध सामाजिक उपक्रमांच्या मालिकेंतर्गत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एकलव्य फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला पनवेल जॉब ड्राईव्ह २०२६ हा भव्य रोजगार मेळावा आज उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वी झाला. शेकडो युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्यात सहभाग नोंदवून रोजगाराच्या संधींचा लाभ घेतला.
पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या रोजगार मेळाव्याला सकाळपासूनच युवक-युवतींची मोठी गर्दी झाली होती. रोजगाराच्या शोधात असलेल्या उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि अनुभव यानुसार विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधत मुलाखती दिल्या.
या मेळाव्यात बँकिंग, माहिती तंत्रज्ञान (आयटी), आयटीईएस, रिटेल, ग्राहक सेवा, फायनान्स, विमा, बॅक ऑफिस, मानव संसाधन (एचआर) आदी विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला. अनेक कंपन्यांनी जागेवरच प्राथमिक मुलाखती घेत पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे सहभागी युवक-युवतींना रोजगारासाठी थेट व्यासपीठ उपलब्ध झाले. तरुणाईला रोजगाराच्या संधी त्यांच्या परिसरातच उपलब्ध करून देणे, उद्योग क्षेत्र आणि रोजगार शोधणारे युवक यांच्यातील दरी कमी करणे तसेच कौशल्याधारित रोजगाराला चालना देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. त्यास प्रतिसाद देत शेकडो युवक-युवतींनी उत्साहाने सहभाग घेतला.
या रोजगार मेळाव्यात ३आय इन्फोटेक लि., रिलायन्स, टीमलीज सर्व्हिस, ओटू बीज सर्व्हिसेस, यशस्वी ग्रुप, एस.एच. केळकर लि., सुधरलँड, महिंद्रा इंटर्ग्रेटेड बिझनेस सोल्युशन, एचडीएफसी बँक, एनआयआयटी फाऊंडेशन, टाटा कन्स्लटी सर्व्हिसेस, डिजीटाईड सोल्युशन, एचडीबी फायनान्शल सर्व्हिसेस, टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स, भारती एअरटेल, वेस्टसाईड ट्रेंट लि., एसबीआय कॅप सिक्युरिटीज आदी कंपन्यांचा सहभाग होता. कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता, संवाद कौशल्य, तांत्रिक ज्ञान आणि अनुभवाच्या आधारे मुलाखती घेतल्या.
या उपक्रमामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये धावपळ करण्याची गरज भासली नाही. एकाच छताखाली विविध क्षेत्रांतील कंपन्यांशी संपर्क साधण्याची संधी उपलब्ध झाल्याने सहभागी युवक-युवतींनी समाधान व्यक्त केले. रोजगाराभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून युवकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या आयोजकांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
रोजगार मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी सहभागी कंपन्या, एकलव्य फाउंडेशनचे पदाधिकारी, स्वयंसेवक, कार्यकर्ते आणि सर्व सहकाऱ्यांनी मेहनत घेतली. त्यांच्या योगदानाबद्दल आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

Check Also

कान्स चित्रपट महोत्सव

कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देश विदेशातील अनेक भाषेतील चित्रपट दाखविण्यात आले. त्यातून जगभरातील अनेक देशांतील …

Leave a Reply