Breaking News

विजेच्या समस्या मार्गी लावा; आमदार महेश बालदी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल, उरण आणि खालापूर तालुक्यातील वीज समस्यांबाबत आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने शुक्रवारी (दि.१९) आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी त्यांनी परिसरातील वीज समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून या कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही दिली.
सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात बैठक झाली. त्यावेळी आमदार महेश बालदी बोलत होते.
या बैठकीत विविध भागांतील वीज समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली, तर उपस्थित सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी वीज कंपनीच्या कारभाराविषयीच्या तक्रारी व अडचणी थेट मांडल्या. यावेळी खालापूर पंचायत समितीचे सभापती कृष्णा पारंगे यांनी प्रामुख्याने आदिवासी भागातील वीज समस्या तातडीने दूर करण्याची मागणी केली. बैठकीत वीजपुरवठा खंडित होण्यामागे अपुरे कर्मचारी हेही एक मुख्य कारण असल्याचे समोर आले तसेच प्रीपेड व स्मार्ट मीटरच्या विषयावरही चर्चा झाली.
आमदार महेश बालदी यांनी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचे प्रश्न ऐकून घेत उपस्थित महावितरणच्या अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करत कामे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.
या बैठकीला रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर, खालापूर पंचायत समितीचे सभापती कृष्णा पारंगे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, पनवेल पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील, भाजपचे खालापूर तालुका मंडळ अध्यक्ष प्रवीण मोरे, उरण ग्रामीण अध्यक्ष धनेश गावंड, शहर अध्यक्ष कौशिक शाह, उरण नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष रवी भोईर, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष राणी म्हात्रे, भाजपचे केळवणे जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष विद्याधर जोशी, वडगाव जिल्हा परिषद अध्यक्ष महादेव गडगे, अतुल घरत, सदाशिव वास्कर, महेश कडू, चौकचे माजी उपसरपंच गणेश कदम, विजय ठोसर, महावितरणच्या भांडुप विभागाचे मुख्य अभियंता संजय पाटील, कार्यकारी अभियंता दिवाकर देशमुख, उपकार्यकारी अभियंता अमित कुरुंगळे यांच्यासह सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

Check Also

नैना क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हरकतींवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्या

प्रधान सचिव लोकेश चंद्रा यांचे आदेश; प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यास गती मुंबई : रामप्रहर वृत्तनवी …

Leave a Reply