Breaking News

प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना युवाशक्तीला नवी दिशा देणारी

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन

पनवेल : रामप्रहर वृत्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेली प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातील युवकांना रोजगार, सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक स्थैर्य प्रदान करणारी महत्त्वपूर्ण योजना असल्याचे प्रतिपादन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे केले.
पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ईपीएफओ वाशी कार्यालयाच्या वतीने प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना लाभ वितरण कार्यक्रम शुक्र्रवारी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते.
या कार्यक्र्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महापौर नितीन पाटील, प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त डॉ. रामकृष्ण त्रिपाठी, मनोज माने, सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त एस.एच. संघानी, सुश्री आकांक्षा पटेल यांच्यासह ईपीएफओ अधिकारी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, नियोक्ते, कर्मचारी आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोजगारनिर्मिती, आर्थिक समृद्धी आणि सामाजिक सुरक्षा मजबूत करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेंतर्गत कर्मचारी भविष्य निधी संघटना प्रोत्साहन वितरण समारंभ दिल्लीतील विज्ञान भवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपणही दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले होते. या मार्गदर्शनाचा लाभ उपस्थितांनी घेतला.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, विकसित भारत २०४७ या संकल्पनेची पूर्तता करण्यासाठी केंद्र सरकार रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास, उद्योजकता आणि सामाजिक सुरक्षा या क्षेत्रात अभूतपूर्व कार्य करत आहे. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही युवकांना औपचारिक रोजगाराशी जोडणारी आणि उद्योगांना नवीन रोजगारनिर्मितीसाठी प्रोत्साहन देणारी महत्त्वाची योजना आहे. ईपीएफओ वाशी क्षेत्रातील ११ हजार ८२७ प्रतिष्ठाने या योजनेच्या कक्षेत येतात. त्यापैकी सात हजार ३९१ प्रतिष्ठानांनी या योजनेत नोंदणी केली असून एक लाख १४ हजार ८८०हून अधिक नव्या कर्मचाऱ्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. हा केवळ आकडा नसून हजारो कुटुंबांच्या जीवनात आशा, सन्मान आणि आर्थिक सुरक्षितता निर्माण करणारा टप्पा आहे.
देशभरातील लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुमारे २४०० कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान थेट लाभ हस्तांतरणद्वारे वितरित करण्यात येत असल्याचे सांगून ही रक्कम युवकांच्या उज्ज्वल भविष्यातील गुंतवणूक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
नवी मुंबई आणि पनवेल परिसरात वेगाने होत असलेल्या विकासकामांमुळे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. विमानतळ, वाढती औद्योगिक गुंतवणूक, लॉजिस्टिक्स आणि सेवा क्षेत्राचा विस्तार यामुळे हजारो युवकांना रोजगार मिळणार असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींना अधिकाधिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे, तर युवकांनी कौशल्य विकास, आधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या संधींचा स्वीकार करून विकसित भारताच्या निर्मितीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल ईपीएफओ वाशी कार्यालय, श्रम व रोजगार मंत्रालय तसेच सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

Check Also

विजेच्या समस्या मार्गी लावा; आमदार महेश बालदी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल, उरण आणि खालापूर तालुक्यातील वीज समस्यांबाबत आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने …

Leave a Reply