Breaking News

चित्रपट स्टूडिओतील मिनी थिएटर्स… एक वेगळं विश्व

आज मी जेव्हा परेल येथील राजकमल कला मंदिर स्टुडिओत जातो, तेव्हा अनेक गोष्टीसह तेथील मिनी थिएटरमध्ये ‘समिक्षक म्हणून पाहिलेले’ अनेक चित्रपट आठवतात…
राजकमल कलामंदिर स्टुडिओ म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीचे गौरवशाली वैभव. चित्रपट संस्कृतीतील एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट. चित्रपती व्ही. शांताराम यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची सतत आठवण करून देणारी आदर्श अशी वास्तू. तेथे प्रवेश करताच आज व्ही. शांताराम यांच्या अतिशय भव्य तैलचित्राचे होणारं दर्शन अवर्णनीय.
माझ्या या स्टुडिओबाबत आठवणी अनेक. येथील मिनी थिएटरमध्ये ‘चित्रपट समिक्षक’ म्हणून अनेक चित्रपट पाहिले. यश चोप्रा यांच्या यशराज फिल्म्सचे कार्यालय राजकमल स्टुडिओत असल्याने त्यांच्या चित्रपटाचे प्रेस शो येथेच होत. सकाळी अकरा वाजता अशी ते वेळ ठेवत आणि संपल्यावर स्टुडिओच्या गार्डनमध्ये उंची खाना असे. यशजीच्या ‘फासले’चा आम्हा समिक्षकांसाठीचा शो संपल्यावर आम्ही गार्डनमध्ये येताच आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण यशराज फिल्म्सने चक्क बिअर ठेवली होती. चित्रपती व्ही. शांताराम यांच्या कडक शिस्तीत हे बसत नव्हते. म्हणून तर ‘पेज थ्री’वर याची बातमी झाली. ‘फासले’मध्ये रोहन कपूर आणि फराह असे नवीन चेहरे होते. यशजीचे मशाल, विजय हे चित्रपटही याच मिनी थिएटरमध्ये पाहिले.
सुभाष घई दिग्दर्शित बहुचर्चित ‘खलनायक’ (१९९३)ची प्रिंट तब्बल दीड तास उशिरा आली (याचे श्रेय मुंबईतील ट्रॅफिक जॅमला), त्यामुळे चोली के पीछे क्या है या नृत्यातील माधुरी दीक्षितच्या ग्लॅमर, शैली, मोहकता आणि क्षमता याबद्दलची उत्सुकता वाढली. राजकमल स्टुडिओतील मिनी थिएटरमधील भव्य दिव्य पडद्यावर माधुरी दीक्षितचे नृत्य अतिशय ग्रेसफुल ठरलं.
आपल्या चित्रपटाच्या प्रेस शोच्या वेळी तो संपल्यावर आम्हा समिक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याची देव आनंदला फार फार हौस होती. खरंतर, ‘लुटमार’ नंतरचे त्याचे चित्रपट केवळ आणि केवळ त्याच्यावरील अतूट प्रेमाखातर मी पाहिले. याच स्टुडिओतील मिनी थिएटरमध्ये ‘गॅन्गस्टर’ संपल्यावर बाहेर पडत असतानाच समोर साक्षात देव आनंद उभा. या चित्रपटापेक्षा त्याचे दर्शन प्रसन्न आणि दिलखुलास होते. तेच लक्षात राहिले, पण अख्खा चित्रपट विसरलो. आपला पुत्र केतन देसाई दिग्दर्शित ‘अनमोल’च्या शोच्या वेळी मनमोहन देसाई असेच आम्हा सिनेपत्रकारांना भेटायला आले, पण या चित्रपटावर व्यक्त करण्यासारखे काही नव्हतंच. अरविंद सामंत निर्मित आणि महेश कोठारे दिग्दर्शित ‘जिवलगा’च्या खेळाला तुषार दळवी, रेशम आवर्जून हजर होते. यांचा हा पहिलाच चित्रपट. त्यामुळे त्यांना असा अनुभव नवीनच आणि वेगळा.
दादासाहेब फाळके चित्रनगरीतील मिनी थिएटरमधील अनुभवही अनेक. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हम दिल दे चुके सनम’ (१९९९) हा तेथे पाहिलेला पहिला चित्रपट. नाट्यमय पटकथेवरील भव्य पडद्यावरील गीत संगीत नृत्याची बहारदार मेजवानी अधिकच खुलली. चित्रपट पाहत असतानाच येत असलेला ‘सकारात्मक फिल’ हा चित्रपट रसिकांनाही आवडेल याचा जणू सिग्नल देतो. ‘जोधा अकबर’ चा ट्रेलर संपताच दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आम्हा समिक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास उत्सुक दिसला. मी पटकन म्हणालो, पुन्हा एकदा पहायची इच्छा आहे (प्लीज रिपीट). यावर आशुतोष गोवारीकरचा खुललेला चेहरा आजही आठवतोय. काही दिवसांनी येथेच ‌‘जोधा अकबर‌’ पाहिला. तेव्हाही आशुतोष गोवारीकर आवर्जून हजर.
करण जोहर दिग्दर्शित ‘माय नेम इज खान’ हा चित्रपट वादग्रस्त ठरल्याने त्याचे प्रदर्शन अडचणीत सापडले होते. त्यामुळे त्याच्या समिक्षकांसाठीच्या खेळाला अधिक काळजी घेण्यात आली. एक वेगळाच अनुभव. योगायोगाने म्हणा किंवा अन्य कारणांमुळे म्हणा, या विशेष खेळाला मराठीतील मी एकमेव समिक्षक होतो आणि त्याचा मला या चित्रपटावर एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना फायदा झाला. चित्रनगरीत शिरतानाच असलेले हे मिनी थिएटर कालांतराने पाडण्यात आले. हे मिनी थिएटर आधुनिक तंत्रज्ञानयुक्त आणि ऐसपैस असे होते.
नटराज स्टुडिओतील मिनी थिएटरमधील प्रोजेक्शन ऑपरेटर विलास जोशी आणि इतरांशी माझे अतिशय मित्रत्वाचे संबंध होते. त्यामुळे नटराज स्टुडिओतील चित्रीकरण आणि मिनी थिएटरमधील अनेक एक्सलुझिव्ह गोष्टी समजत. राजेश खन्नाच्या अतिशय पडत्या काळात याच मिनी थिएटरमध्ये मेहमूद दिग्दर्शित ‘जनता हवालदार’ मधील हमसे क्या भूल हुई यह सजा हमको मिली या एकमेव गाण्याचे स्क्रिनिंग
येथे होते. विशेष उपस्थिती राजेश खन्ना आणि अन्जू महेंद्र‍. गाणं एकदा दाखवून झाले, परत एकदा झाले आणि परत एकदा दाखवले. राजेश खन्ना पुन्हा पुन्हा तेच गाणे दाखवायला सांगत होता. त्याच्या पडत्या काळाला ते सुसंगत होते. रात्र बरीच होत गेली. एकवीस वेळा स्क्रिनिंग झाले आणि आपल्या पतीचा शोध घेत घेत डिंपल कपाडिया नटराज स्टुडिओत पोहचली. मोबाईलच्या खूपच अगोदरचा हा काळ.
त्या काळात फिल्मवाल्यांचे काही हुकमी अड्डे असत. तो वेगळा माहितीपूर्ण आणि रंजक विषय) डिंपलने राजेश खन्नाला गाडीत बसवून घेतले तेव्हा हे स्क्रिनिंग थांबले.
फिल्मालय स्टुडिओतील मिनी थिएटरमध्ये अनेक चित्रपट पाहिले. मकरंद अनासपुरेची भूमिका असलेला पहिला हिंदी चित्रपट ‘यशवंत’ येथेच पाहिला. सलिम अख्तर निर्मित आणि अशोक गायकवाड दिग्दर्शित ‘राजा की आयेगी बारात’च्या ट्रायल शोला राणी मुखर्जी आवर्जून आली होती. तिचा हा पहिलाच चित्रपट आणि तिच्या वावरण्यात, एकूणच देहबोलीत नवखेपण आणि उत्सुकता जाणवत होती. मिनी थिएटरमध्ये असे अनुभव
प्रामुख्याने येतात.
आर.के. स्टुडिओतील मिनी थिएटर माझ्यासाठी वेगळी आठवण. या स्टुडिओत आपल्याला जायला मिळावे हा स्टुडिओ आपल्याला आतून पाह्यला मिळावा ही माझी अनेक वर्षांपासूनची तीव्र इच्छा, एक मोठं स्वप्नच. लहानपणापासूनच चेंबूर येथून एसटीने चौल (अलिबाग) गावी जाता येताना एसटी बसमधून हा स्टुडिओ पाहत पाहत मोठा झालो. मीडियात आल्यावर अनेक चित्रपट स्टूडिओप्रमाणेच याही स्टुडिओत जायचे सुखद योग आले. अशातच एकदा आर. के. फिल्म निर्मित आणि रणधीर कपूर दिग्दर्शित ‘हीना’ या चित्रपटाचा आम्हा चित्रपट समीक्षकांसाठीचा खेळ याच आर.के. स्टुडिओतील मिनी थिएटरमध्ये असताना मी शहारून गेलो. अतिशय उत्तम आणि देखणं असं हे मिनी थिएटर माझ्यासाठी वेगळी आठवण ठरले. ज्या वास्तूत आपण बसलोय त्या वास्तूला एकूणच भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात मोलाचे स्थान आहे याची जाणीव मला संतत होत होती. माझ्या कारकिर्दीतील हादेखील एक वैशिष्ट्यपूर्ण क्षण. राज कपूर आपल्या दिग्दर्शनातील चित्रपटांचे काही भाग, गाणी असं करत करत संपूर्ण चित्रपट याच मिनी थिएटरमध्ये पहात असे ही गोष्ट अतुलनीय आहे आणि त्याच वास्तूत आपण बसलोय हे किती आनंदाचे झाले असेल हे सांगता येणार नाही. तो एक उत्कट अनुभव होता.
फेमस स्टुडिओतील मिनी थिएटरमध्ये अनेक वर्षे जवळपास प्रत्येक आठवड्यात चित्रपट पाहिला (अपवाद अर्थात कोरोना काळ). एखाद्या चित्रपटाच्या खेळाच्या वेळी त्याचा निर्माता दिग्दर्शक आणि कलाकार उपस्थित राहत असे. त्यात एखादा चित्रपट आवडला नसेल तर ‘काय बरे बोलायचे, कसं बरं बोलायचे’ असा अवघड प्रश्न पडे. फार छान चित्रपट आहे असे म्हणायचे (अर्थात औपचारिकता म्हणून) आणि समिक्षा करताना त्यावर उलटसुलट मते व्यक्त करावी असे कसं हो चालेल? याच स्टुडिओतील मिनी थिएटरमध्ये प्रियांका चोप्राने आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘व्हॉटस युवर राशी’ या चित्रपटाचा तिचे पाहुणे आणि आम्ही निवडक सिनेपत्रकारांसाठी आयोजित केलेल्या खेळाला ती स्वतः हजर राहिली, आम्हा प्रत्येकाचे छान हसून स्वागत केले, पण चित्रपटात आवडावे असं फार काही नव्हतंच. मग लक्षात आलं की तिने या खेळाचे आयोजन तिचा तेव्हाचा खास मित्र हरमन बवेजा याच्या प्रमोशनसाठी ठेवला होते.
कालांतराने अंधेरी पश्चिमेकडील यशराज स्टुडिओतील मिनी थिएटरमध्ये यशराज फिल्म्स आणि धर्मा प्रॉडक्शन निर्मित अनेक चित्रपट पहायचा सुखद योग येत आहे. हे मिनी थिएटर अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त आणि उत्तम साऊंड सिस्टीम असणारे असे आहे. अनुष्का शर्माने आपली भूमिका असलेल्या अली अब्बास जाफर दिग्दर्शित ‘सुल्तान’ (२०१६) या चित्रपटाचा भारतीय क्रिकेट संघासाठीचा विशेष खेळ येथेच आयोजित केला.
चित्रपट स्टूडिओतील मिनी थिएटरमधील एक अतिशय संवेदनशील आठवण म्हणजे, चित्रपती व्ही. शांताराम यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी या मिनी थिएटरमध्ये ठेवण्यात आले होते. मला आठवतंय, मी तेव्हा रिपोर्टिंगसाठी येथे गेलो असता हा दुःखदायक क्षण मी अनुभवला.
चित्रपट स्टुडिओतील मिनी थिएटर माझ्यासाठी अशा विविध प्रकारच्या आठवणीचे क्षण. मीडियात आल्यावर मी कायमच चौफेर वाटचाल सुरू केली आणि तसाच दृष्टिकोन ठेवून ‌‘स्टुडिओतील मुशाफिरी करताना‌’ असं बरेच अवतीभवती पाहिले, त्यात स्टुडिओतील मिनी थिएटरचे विश्व अनुभवले, त्यातील हे काही क्षण. चित्रपट स्टूडिओत चित्रीकरणासह अनेक गोष्टी. त्यात अशी काही मिनी थिएटर्स. कुठे तीस आसन क्षमता असलेली, तर कुठे त्यापेक्षा कमी जास्त आसन क्षमता असलेली. तसं पाहिलं तर, कुलाबा येथील ब्लेझ मिनी थिएटरपासून मुंबईत अनेक मिनी थिएटर आहेत. त्यातील अनेक आज काळाच्या पडद्याआड गेली आहेत…

  • दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)

Check Also

अनुसूचित जमातीच्या विशेष पदभरतीचा प्रश्न विधिमंडळात!

प्रलंबित भरती तातडीने पूर्ण करण्याची आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणी मुंबई …

Leave a Reply