Breaking News

न्हावाशेवा टप्पा ३ पाणीपुरवठा योजनेसंदर्भात मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत बैठक

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती; कामांचा आढावा

मुंबई : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या न्हावाशेवा टप्पा ३ योजनेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि.२९) मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी योजनेच्या सद्यस्थितीचा सखोल आढावा घेत नागरिकांना मुबलक व नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला.
या बैठकीला महापौर नितीन पाटील, स्थायी समिती सभापती बबन मुकादम यांच्यासह संबंधित पाणीपुरवठा व नगरविकास विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान न्हावाशेवा टप्पा ३ योजनेंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांची प्रगती, प्रत्यक्ष अंमलबजावणीतील तांत्रिक व प्रशासकीय बाबी तसेच उद्भवणाऱ्या अडचणींवर चर्चा झाली. त्याचप्रमाणे नागरिकांना शुद्ध, पुरेसा आणि अखंडित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी तातडीने कोणत्या उपाययोजना आखल्या पाहिजेत यावरही चर्चा करण्यात आली.
राज्य शासन नागरिकांना गुणवत्तापूर्ण व नियोजनबद्ध पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले तसेच वाढत्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागवण्यासाठी या योजनेतील सर्व प्रलंबित कामे ठरवून दिलेल्या मुदतीत आणि उच्च दर्जा राखून पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

Check Also

कर्जमाफीमुळे बळीराजाला मोठा दिलासा -मंत्री ॲड. आशिष शेलार

रायगड जिल्हा किसान मोर्चातर्फे पनवेलमध्ये कृतज्ञता मेळावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार पनवेल : …

Leave a Reply