पनवेल : रामप्रहर वृत्त
मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे यंदाच्या ६५व्या राज्य नाट्य स्पर्धेसाठी ‘ही परी अस्मानीची’ या नाटकाची निवड करण्यात आली आहे. या नाटकाच्या संहितेचे पूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पत्रकार संघाच्या सभागृहात करण्यात आले.
मुंबई मराठी पत्रकार संघाने राज्य नाट्य स्पर्धेच्या माध्यमातून रंगभूमीवरील आपला प्रवास पुढे सुरू ठेवला असून यंदा संघाचे हे दुसरे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत सादर होणार आहे. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, विश्वस्त व नाटकातील अभिनेते देवदास मटाले, उपाध्यक्ष व अभिनेत्री स्वाती घोसाळकर, नाट्यदिग्दर्शक गुरुदत्त लाड, उपाध्यक्ष राजेंद्र हुंजे, कार्यकारिणी सदस्य रजनीश राणे आणि विनोद साळवी उपस्थित होते.
यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पहिल्या नाटकाच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पहिल्या नाटकाच्या संहितेचे पूजनही माझ्या हस्ते झाले होते आणि त्या नाटकाने राज्य नाट्य स्पर्धेत दोन पुरस्कार मिळवले होते. त्यामुळे त्या नाटकाच्या यशस्वी वाटचालीच्या आठवणी आजही कायम आहेत. यंदाच्या ‘ही परी अस्मानीची’ या नाटकाकडून आणि त्यातील कलाकारांकडून त्याहून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
रंगभूमी हे समाजमनाशी संवाद साधणारे प्रभावी माध्यम असून पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्न आणि घडामोडी मांडणाऱ्या पत्रकारांनी सांस्कृतिक क्षेत्रातही आपला ठसा उमटविणे ही कौतुकाची बाब असल्याचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नमूद केले. नाटकाच्या माध्यमातून कलाकारांना आपल्या कलागुणांना वाव देण्याची संधी मिळते. राज्य नाट्य स्पर्धेसारख्या प्रतिष्ठेच्या व्यासपीठावर मुंबई मराठी पत्रकार संघाने आपले नाटक सादर करावे, ही आनंदाची बाब आहे, असे सांगत या नाटकातील सर्व कलाकार, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
पत्रकारिता आणि सांस्कृतिक चळवळ यांची सांगड घालत मुंबई मराठी पत्रकार संघ विविध उपक्रम राबवत असल्याचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी सांगितले. राज्य नाट्य स्पर्धेतील मुंबई मराठी पत्रकार संघाचे हे दुसरे नाटक आहे. पहिल्या नाटकाला मिळालेल्या यशाची परंपरा कायम राखत ‘ही परी अस्मानीची’ हे नाटकही सर्व कलाकार तितक्याच ताकदीने सादर करतील, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.
Check Also
सेवा संकल्प अभियानांतर्गत वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper