‘३:३०’ लघुपटाची प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हल्समध्ये निवड; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून कौतुक व शुभेच्छा
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलमधील युवा कलाकार श्लोक शैलेश चौधरी याने ‘३:३०’ या लघुपटाच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी करत भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हल्समध्ये आपल्या कलेची दाद मिळवली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी श्लोकचे व त्याच्या पालकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
‘३:३०’ या लघुपटाची निवड अमेरिकेतील तस्वीर फिल्म फेस्टीव्हल सिॲटल, डीसी साऊथ एशियन फिल्म फेस्टीव्हल वॉशिंग्टन डीसी आणि साऊथ एशियन फिल्म फेस्टीव्हल शिकागो या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल्ससाठी झाली आहे. त्याचप्रमाणे या लघुपटाचा वर्ल्ड प्रीमियर ऑगस्ट २०२६मध्ये झालेल्या बेंगळुरू इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टीव्हल (बीआयएसएफएफ) येथे झाला.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी श्लोकशी संवाद साधत त्याच्या कलाप्रवासाबद्दल तसेच भविष्यातील वाटचालीबद्दल जाणून घेतले. पनवेलच्या युवा कलाकाराने आपल्या कर्तृत्वातून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर स्थान मिळवल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करत श्लोकला पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. ही भेट मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य व भाजप जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी घडवून दिली.
RamPrahar – The Panvel Daily Paper