रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्त
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघाने दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा केवळ जपली नाही, तर ती अधिक व्यापक आणि समृद्ध करण्याचे काम केले आहे. साहित्य क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी गेली २५ वर्षे सातत्याने विविध उपक्रमांची मालिका आयोजित करून या क्षेत्राला मोठी उंची देण्याचे कार्य या संस्थांनी केले आहे, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी प्रमुख मान्यवर म्हणून बोलताना येथे केले.
मराठी साहित्य, पत्रकारिता, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिवाळी अंकांच्या समृद्ध परंपरेला गेली २५ वर्षे सातत्याने प्रोत्साहन देणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा भव्य पारितोषिक वितरण सोहळा पनवेलमध्ये मंगळवारी (दि.६) उत्साहपूर्ण वातावरणात झाला. मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्या दिवाळी अंकांना तसेच विविध साहित्यिक व कलात्मक विभागांतील पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या रौप्य महोत्सवी सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर होते, तर ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याचबरोबर श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सचिव व नगरसेवक परेश ठाकूर, माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, महापौर नितीन पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, विश्वस्त राही भिडे, देवदास मटाले, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर, उपमहापौर प्रमिला पाटील, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, माजी नगरसेवक अनिल भगत, प्रभाग समिती सभापती रवींद्र भगत, स्पर्धा समन्वयक दीपक म्हात्रे यांच्यासह साहित्य, पत्रकारिता, कला, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, संपादक, लेखक, साहित्यिक तसेच रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री आशिष शेलार यांनी पुढे बोलताना म्हटले की, दिवाळी अंक ही मराठी साहित्य आणि संस्कृतीची प्रदीर्घ परंपरा असून या परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या २५ वर्षांपासून आयोजित करण्यात येणारी दिवाळी अंक स्पर्धा ही केवळ स्पर्धा न राहता साहित्यिक, लेखक, संपादक आणि कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारी चळवळ ठरली आहे. या सातत्यपूर्ण उपक्रमातून अनेक साहित्यिकांना प्रोत्साहन मिळाले असून दिवाळी अंकांच्या माध्यमातून मराठी साहित्यविश्व अधिक समृद्ध झाले आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघाने रौप्य महोत्सवी वर्षापर्यंत ही परंपरा अखंडपणे पुढे नेल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. साहित्य, पत्रकारिता आणि संस्कृतीच्या क्षेत्राला प्रोत्साहन देणारे असे उपक्रम भविष्यातही सातत्याने सुरू राहावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
अक्षरांमध्ये मोठी ताकद असते. अक्षरांच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण होते, संस्कारांची जडणघडण होते आणि शुद्ध मन घडत जाते. दिवाळी अंक हे केवळ मनोरंजनाचे माध्यम न राहता त्यांनी साहित्याची आणि विचारांची चळवळ उभी केली आहे. या चळवळीच्या माध्यमातून समाजाला ज्ञान, संस्कार आणि वैचारिक समृद्धीची दिशा मिळत आहे. या विचारांच्या आणि संस्कारांच्या वाटचालीत समाजासाठी सर्वस्व अर्पण करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. समाजाच्या गरजा ओळखून शिक्षण, सामाजिक कार्य, क्रीडा आणि विविध क्षेत्रांत त्यांनी केलेले दान हे केवळ आर्थिक मदत नसून समाज घडविण्याची एक व्यापक भूमिका आहे. म्हणूनच त्यांना ‘दानहृदयसम्राट’ ही उपाधी दिली आहे. शुद्ध ज्ञानाची निर्मिती ही केवळ शब्दांतून होत नाही; त्यासाठी अंतःकरणाची शुद्धता, सेवाभाव आणि भक्तीभाव आवश्यक असतो.त्यामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्यातून हाच सेवाभाव सातत्याने प्रकट होताना दिसतो, असेही ना. शेलार यांनी नमूद केले.
साहित्य-संस्कृतीची चळवळ अखंडपणे सुरू राहील -लोकनेते रामशेठ ठाकूर
अध्यक्षीय भाषणात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की, १९९६ साली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. दिवाळी अंक स्पर्धेलाही यंदा २५ वर्षे पूर्ण झाली असून साहित्य आणि संस्कृतीची ही चळवळ यापुढेही अखंडपणे सुरू राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी त्यांनी पुढील वर्षापासून दिवाळी अंक स्पर्धेतील बक्षिसांच्या रकमेत तब्बल ५० टक्के वाढ करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. साहित्य क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा अधिक व्यापक आणि भव्य स्वरूपात पुढे नेण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, साहित्य, संस्कृती आणि कला क्षेत्राला सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांचा सातत्याने पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या सहकार्यामुळे या क्षेत्रातील विविध उपक्रमांना मोठी चालना मिळत आहे. मराठी साहित्य क्षेत्राला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहतील, असा विश्वासही रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला. साहित्य, संस्कृती आणि कला ही आपल्या समाजाची समृद्ध परंपरा आहे. या क्षेत्रावर आपण सर्वांनी मनापासून प्रेम करत राहिले पाहिजे आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहचवणे गरजेचे -विश्वास पाटील
प्रमुख पाहुणे म्हणून पानिपतकार विश्वास पाटील यांनी आपल्या भाषणात म्हटले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या श्वासातून आणि ध्यासातून लोकनेते रामशेठ ठाकूर कार्यरत आहेत. दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी कर्मवीरांचा वारसा केवळ जपला नाही, तर तो पुढे नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. रायगड जिल्ह्याचे नाव घेतले की मला विशेष आनंद होतो; कारण या जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मला लाभली आहे. रायगडच्या प्रत्येक कार्यामागे इतिहासाचा एक धागा जोडलेला आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
दिवाळी अंकांच्या समृद्ध परंपरेचा संदर्भ देताना विश्वास पाटील म्हणाले की, ‘मनोरंजन’ मासिकाच्या माध्यमातून दिवाळी अंकाची सुरुवात झाली आणि त्या पहिल्या अंकाला आता ११७ वर्षे पूर्ण झाली आहेत. ही परंपरा केवळ टिकवणे नव्हे, तर नव्या पिढीपर्यंत पोहचवणे ही आजची गरज आहे. गेली २५ वर्षे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून दिवाळी अंक स्पर्धा अखंडपणे सुरू आहे, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. दिवाळी अंक काढणे हे सोपे काम नाही. त्यासाठी लेखक, संपादक, मुद्रक आणि प्रकाशक यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असतात. या साहित्यिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण काम श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ संयुक्तपणे करत आहेत. त्यामुळे दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा जपण्याबरोबरच साहित्यनिर्मितीला आणि नव्या लेखकांना व्यासपीठ मिळत आहे. भाषा कोणतीही असो, संस्कारांच्या दृष्टीने मातृभाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मातृभाषेतून विचार, संस्कार आणि मूल्यांची जडणघडण होत असते. लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून साहित्यिक ऊर्जा निर्माण करण्याचे आणि ती समाजापर्यंत पोहचवण्याचे कार्य होतेय ही अभिमानाची बाब आहे. सार्वजनिक वाचनालय हे केवळ पुस्तके उपलब्ध करून देणारे ठिकाण नसून ते संस्कारांची पाणपोई आहे. वाचनातून विचार समृद्ध होतात, संस्कार दृढ होतात आणि समाजाची वैचारिक जडणघडण होते. त्यामुळे साहित्य, वाचन आणि संस्कृतीची ही चळवळ अधिक व्यापक करण्याची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले.
दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहचविण्याचा संकल्प -आमदार प्रशांत ठाकूर
यावेळी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले की, आजच्या या रौप्य महोत्सवी सोहळ्याला महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांच्यासह साहित्य, कला, पत्रकारिता आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची लाभलेली उपस्थिती आमच्यासाठी अत्यंत आनंददायी आणि प्रेरणादायी आहे. या सर्व मान्यवरांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढविली, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार! महाराष्ट्राला दिवाळी अंकांची शंभर वर्षांहून अधिक काळाची समृद्ध आणि वैभवशाली परंपरा लाभली आहे. साहित्य, विचार, ज्ञान आणि संस्कृतीचा प्रकाश घराघरांत पोहचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य दिवाळी अंकांनी सातत्याने केले आहे. या समृद्ध परंपरेचा एक छोटासा भाग होण्याची आणि तिच्या संवर्धनासह अधिक समृद्धीसाठी योगदान देण्याची संधी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाला मिळाली, ही आमच्यासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सहकार्यामुळे या उपक्रमाला व्यापक आणि प्रतिष्ठित राज्यस्तरीय व्यासपीठ प्राप्त झाले.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रकाशित होणाऱ्या दर्जेदार दिवाळी अंकांना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्या साहित्यिक, वैचारिक, सामाजिक आणि संपादकीय योगदानाचा गौरव करण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळाली. त्यामुळे ही स्पर्धा केवळ पुरस्कार देणारी स्पर्धा न राहता महाराष्ट्राच्या साहित्यिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्राला दिशा देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला आहे. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाने सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य आणि सांस्कृतिक क्षेत्रांत सातत्याने भरीव योगदान दिले आहे, मात्र दिवाळी अंक स्पर्धेला आमच्या दृष्टीने विशेष आणि भावनिक स्थान आहे, कारण ही केवळ एक स्पर्धा नाही; तर वाचनसंस्कृती जोपासणारी, लेखनकौशल्याला प्रोत्साहन देणारी, साहित्यनिर्मितीला चालना देणारी आणि संपादकीय सर्जनशीलतेचा गौरव करणारी एक व्यापक साहित्यिक चळवळ आहे. या स्पर्धेचा २५ वर्षांचा प्रवास निश्चितच अभिमानास्पद आहे. कोणताही उपक्रम सुरू करणे सोपे असते, मात्र तो सातत्याने २५ वर्षे सुरू ठेवणे, त्याचा दर्जा कायम राखणे आणि प्रत्येक वर्षी संपादक, लेखक, साहित्यिक, पत्रकार व वाचकांना नव्या उत्साहाने या प्रवाहाशी जोडून ठेवणे, ही खरी कसोटी असते. या कसोटीवर ही स्पर्धा यशस्वी ठरली आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले
२५ वर्षांचा हा प्रवास म्हणजे केवळ काळाचा टप्पा नसून साहित्य, पत्रकारिता आणि वाचनसंस्कृतीवरील सातत्यपूर्ण विश्वासाची साक्ष आहे. या रौप्य महोत्सवी प्रवासात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, परीक्षकांचे, संपादकांचे, लेखकांचे, पत्रकारांचे, साहित्यिकांचे, सहकाऱ्यांचे तसेच या उपक्रमाला सातत्याने प्रतिसाद देणाऱ्या वाचकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. दिवाळी अंकांची ही समृद्ध परंपरा केवळ पुढे चालू राहू नये, तर नव्या पिढीपर्यंत अधिक व्यापक स्वरूपात पोहोचावी, नव्या लेखकांना व्यासपीठ मिळावे, वाचनाची गोडी वाढावी आणि साहित्यनिर्मितीचा हा प्रवाह अधिक समृद्ध व्हावा हाच या रौप्य महोत्सवी वर्षाचा खरा संकल्प आहे. या संकल्पासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघाची ही साहित्यिक वाटचाल भविष्यातही अशीच अखंड सुरू राहील, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला.
देशातील सर्वाधिक बक्षीस रकमेची ही दिवाळी अंक स्पर्धा असून गेली २५ वर्षे लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी भरघोस बक्षिसांच्या माध्यमातून दिवाळी अंकांच्या समृद्ध परंपरेला सातत्याने प्रोत्साहन दिले आहे. या स्पर्धेच्या यशस्वी आणि अखंड वाटचालीचे संपूर्ण श्रेय लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या साहित्यप्रेमाला व प्रोत्साहनाला जाते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शंभरावा वाढदिवस साजरा होईल, त्यावेळी या दिवाळी अंक स्पर्धेचेही ५०वे वर्ष असेल. हा दुर्मिळ आणि ऐतिहासिक योगायोग ठरेल. त्यामुळे या दोन्ही सोहळ्यांचा भव्य संगम साधत हे दोन्ही सोहळे मोठ्या मैदानावर रसिकांच्या उपस्थितीत दिमाखात साजरे व्हावेत, अशी माझी मनापासून इच्छा आहे.
-संदीप चव्हाण, अध्यक्ष, मुंबई मराठी पत्रकार संघ
‘दीपावली’ला राज्यस्तरीय प्रथम क्रमांक
राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत ‘दीपावली’ या अंकाने प्रथम क्रमांक पटकावत एक लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळविले. या अंकाचे संपादक अशोक कोठावळे आहेत. ‘मुक्त संवाद’ या अंकाने द्वितीय क्रमांक मिळवित ५० हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले असून या अंकाचे संपादक विवेक कोरडे आहेत. तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला. ‘वसा’ आणि ‘अक्षरलिपी’ या दोन्ही अंकांना संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळाला असून त्यांना एकत्रित ३० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. ‘वसा’च्या संपादक सई पवार, तर ‘अक्षरलिपी’च्या संपादिका सौ. शर्मिष्ठा भोसले आहेत. राज्यस्तरीय स्पर्धेत विविध साहित्यिक आणि कलात्मक विभागांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अंकांचा आणि साहित्यिकांचाही यावेळी गौरव करण्यात आला. ‘बाईमाणूस’ या अंकाला लक्षवेधी उत्कृष्ट अंकाचा पुरस्कार मिळाला असून संपादक प्रशांत पवार यांना १५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. ‘धनंजय’ अंकातील ‘आवाज’ या कथेसाठी लेखिका मनस्विनी लता रवींद्र यांना उत्कृष्ट कथा पुरस्कार म्हणून ७ हजार रुपये, तर ‘ललित’ अंकातील ‘टॉलस्टॉयची सायकल’ या लेखासाठी डॉ. नंदू मुलमुळे यांना उत्कृष्ट लेख पुरस्कार म्हणून पाच हजार रुपये देण्यात आले. ‘युगांतर’ अंकातील ‘त्याने तिरंगा पाहिला’ या कवितेसाठी कवी सतीश लोले यांना उत्कृष्ट कविता पुरस्कार मिळाला. ‘नवभारत’ या अंकाला उत्कृष्ट विशेषांक पुरस्कार देण्यात आला असून संपादक निरंजन हातेकर यांना १५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले. बालसाहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ‘मुलांचे मासिक’ या अंकाला उत्कृष्ट बाल दिवाळी अंक पुरस्कार देण्यात आला असून संपादक जयंत मोडक यांना सात हजार ५०० रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. ‘अक्षर’ अंकातील ‘युद्धकांड’ या परिसंवादासाठी मीना कर्णिक आणि हेमंत कर्णिक यांना लक्षवेधी परिसंवाद पुरस्कार, तर ‘शब्दांगण’ अंकातील आसाराम लोमटे यांच्या मुलाखतीसाठी मुलाखतकार मनिषा उगले यांना लक्षवेधी मुलाखत पुरस्कार देण्यात आला. तर साप्ताहिक विवेक’च्या मुखपृष्ठासाठी चित्रकार विनायक खरात यांना सर्वोत्कृष्ट मुखपृष्ठ पुरस्कार, तर ज्ञानेश बेलेकर यांना सर्वोत्कृष्ट व्यंगचित्र पुरस्कार देण्यात आला.
रायगड जिल्ह्यात ‘इंद्रधनू’ प्रथम
रायगड जिल्ह्यातील दिवाळी अंकांना प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत ‘इंद्रधनू’ या दिवाळी अंकाने प्रथम क्रमांक पटकावत ४० हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले. या अंकाचे संपादक विजय पवार आहेत. ‘आगरी दर्पण’ने द्वितीय क्रमांक मिळवित २० हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले असून, या अंकाचे संपादक दीपक राजाराम म्हात्रे आहेत. ‘शब्दसंवाद’ने तृतीय क्रमांक मिळवित १० हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले. या अंकाचे संपादक विनोद बाबुराव साळवी आहेत. ‘रसायनी टाइम्स’ आणि ‘पनवेल टाइम्स’ या अंकांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला. अनुक्रमे संपादक अनिल भोळे आणि गणेश कोळी यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. रायगड जिल्हास्तरीय साहित्य पुरस्कारांमध्ये ‘आगरी दर्पण’ अंकातील ‘गॉटर’ या कथेसाठी किरण शेले यांना उत्कृष्ट कथा पुरस्कार, ‘श्री समर्थ विचार’मधील ‘ग्रामीण आरोग्य व्यवस्थेची दुर्दशा’ या लेखासाठी अरविंद पाशिलकर यांना उत्कृष्ट लेख पुरस्कार, तर ‘म्हसळा टाइम्स’मधील ‘चाळ’ या कवितेसाठी कविता झुंजारराव यांना उत्कृष्ट कविता पुरस्कार देण्यात आला.
साहित्यिक गुणवत्ता आणि सर्जनशीलतेचा कस
राज्यभरातून प्राप्त झालेल्या दिवाळी अंकांचे परीक्षण साहित्यिक गुणवत्ता, आशय, विषयाची निवड, मांडणी, पत्रकारितेचा दर्जा, सामाजिक भान, कलात्मकता, सर्जनशीलता आणि वाचनीयता या विविध निकषांच्या आधारे करण्यात आले. या स्पर्धेसाठी विणा सानेकर, रेखा देशपांडे आणि सुप्रसिद्ध सुलेखनकार सुनील धोपावकर यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. तर स्पर्धा समन्वयक म्हणून दीपक म्हात्रे यांनी काम पाहिले.
यंदापासून डिजिटल दिवाळी अंकांनाही प्रोत्साहन
बदलत्या काळानुसार दिवाळी अंकांच्या स्वरूपात होत असलेल्या परिवर्तनाची दखल घेत यंदापासून डिजिटल दिवाळी अंकांचाही या स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. डिजिटल माध्यमातून साहित्य, कला आणि वैचारिक लेखन सादर करणाऱ्या निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पारितोषिके निश्चित करण्यात आली आहेत. मुद्रित दिवाळी अंकांच्या प्रदीर्घ परंपरेसोबतच डिजिटल माध्यमातून मराठी साहित्याचा विस्तार व्हावा, नव्या पिढीतील लेखक आणि सर्जकांना व्यासपीठ मिळावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
२५ वर्षांचा प्रवास ठरला प्रेरणादायी
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या २५ वर्षांपासून दिवाळी अंक स्पर्धेचे सातत्याने आयोजन केले जात आहे. या प्रदीर्घ प्रवासात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील दिवाळी अंकांना व्यासपीठ, प्रोत्साहन आणि सन्मान मिळाला असून, अनेक लेखक, साहित्यिक, संपादक, चित्रकार आणि कलावंतांच्या सर्जनशीलतेचा गौरव या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादित न राहता, दिवाळी अंकांच्या २५ वर्षांच्या समृद्ध साहित्यिक, सांस्कृतिक आणि पत्रकारितेच्या प्रवासाचा गौरव करणारा ऐतिहासिक टप्पा ठरला. या निमित्ताने मराठी साहित्य आणि पत्रकारितेच्या समृद्ध परंपरेला पुढे नेण्याचा संकल्प अधिक दृढ करण्यात आला.साहित्यिकांचा सन्मान, विजेत्या दिवाळी अंकांचा गौरव, नव्या प्रतिभेला प्रोत्साहन तसेच बदलत्या काळानुरूप डिजिटल माध्यमांना मिळालेले नवे व्यासपीठ यामुळे रौप्य महोत्सवी वर्षाचा हा सोहळा संस्मरणीय ठरला. गेल्या २५ वर्षांचा हा प्रवास केवळ एका स्पर्धेचा प्रवास नसून, मराठी साहित्य, पत्रकारिता आणि सर्जनशीलतेला सातत्याने समृद्ध करणाऱ्या एका प्रेरणादायी साहित्यिक चळवळीचा प्रवास आहे. काळ बदलला, माध्यमे बदलली, अभिव्यक्तीची साधने बदलली; मात्र दर्जेदार साहित्याला प्रोत्साहन देण्याची आणि प्रतिभेला सन्मान देण्याची या उपक्रमाची भूमिका आजही तितकीच भक्कम आहे. रौप्य महोत्सवी वर्षाने या समृद्ध परंपरेला नव्या उंचीवर नेऊन, पुढील वाटचालीसाठी नवी ऊर्जा आणि नवा संकल्प दिला आहे.
पुढील वर्षापासून बक्षिसांच्या रकमेत तब्बल ५० टक्के वाढ
दिवाळी अंक स्पर्धेने यंदा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून गेल्या २५ वर्षांत या स्पर्धेच्या माध्यमातून साहित्य, संस्कृती, विचार आणि पत्रकारितेच्या क्षेत्राला सातत्याने प्रोत्साहन देण्याचे कार्य झाले आहे. अक्षरांची ही समृद्ध परंपरा केवळ स्पर्धेपुरती मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. साहित्य आणि संस्कृतीची ही चळवळ यापुढेही तितक्याच उत्साहाने आणि व्यापकतेने अखंड सुरू ठेवण्याची ग्वाही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी दिली. दिवाळी अंकांच्या माध्यमातून दर्जेदार साहित्यनिर्मितीला आणि लेखक-संपादकांच्या सर्जनशीलतेला अधिक बळ मिळावे हा या उपक्रमामागील मूलभूत हेतू आहे. त्यामुळेच पुढील वर्षापासून दिवाळी अंक स्पर्धेतील बक्षिसांच्या रकमेत तब्बल ५० टक्के वाढ करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी केली. साहित्यविश्वाला प्रोत्साहन देणाऱ्या या निर्णयातून लोकनेते रामशेठ ठाकूर यांची साहित्याविषयीची आस्था, सांस्कृतिक चळवळीप्रती असलेली बांधिलकी आणि नव्या पिढीतील लेखकांच्या प्रतिभेला व्यासपीठ देण्याची त्यांची दानशूर वृत्ती पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
RamPrahar – The Panvel Daily Paper